डॉ. नीलिमा गुंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रामायण, महाभारत, तसेच पुराणे हे प्राचीन ग्रंथ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. त्यांचा संदर्भ असलेले काही वाक्प्रचार आजही आपल्या जगण्याचा भाग झालेले दिसतात. शिवधनुष्य उचलणे, हा वाक्प्रचार रामायणाशी निगडित आहे. जनक राजाची कन्या सीता हिच्या स्वयंवरातील पण होता तो असा, की जो शिवधनुष्य उचलेल, त्याला सीता वरमाला घालील! जनकाकडे असलेले शिवधनुष्य अतिशय अवजड होते. त्याला दोरी लावण्याचे काम अनेक राजपुत्रांना जमले नव्हते. रामाने मात्र सहजपणे ते धनुष्य उचलले. त्यामुळे या वाक्प्रचाराचा लक्ष्यार्थ आहे- अवघड जबाबदारी लीलया पेलणे.

‘हा सूर्य, हा जयद्रथ’ हा वाक्प्रचार महाभारतातील एका घटनेशी संबंधित आहे. चक्रव्यूहात वीरमरण आलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली होती. त्यामुळे चिडलेल्या अर्जुनाने दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली होती. ते शक्य न झाल्यास तो स्वत: अग्निकाष्ठ भक्षण करणार होता. दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होत आला, तरी जयद्रथ दृष्टीस न पडल्यामुळे त्याने स्वत:साठी चिता रचली होती. तेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र वापरून सूर्याला झाकून काळोख पाडला होता. त्यासरशी बाहेर आलेल्या जयद्रथाला पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रतिज्ञापूर्तीसाठी म्हटले होते, ‘हा सूर्य, हा जयद्रथ!’ याचा अर्थ असा आहे : दोन्ही गोष्टी समोरासमोर आणणे, पुराव्यानिशी सिद्ध करणे.

यादवी माजणे, हा वाक्प्रचारदेखील महाभारतातील एका कथाभागाशी जोडलेला आहे. श्रीकृष्ण हा यदु वंशातील होता. यदुवंशात जन्मलेले ते यादव. श्रीकृष्णाच्या वंशजांचा- म्हणजेच यादवांचा- अंत त्यांनी मद्यधुंद अवस्थेत आपापसात केलेल्या युद्धामुळे झाला होता. त्यामुळे यादवीचा अर्थ आहे, गृहकलह.

सूतोवाच करणे, हा वाक्प्रचारही आपण वापरतो. सर्व पुराणे सूताने शौनकाला सांगितली आहेत. त्यांची सुरुवात ‘सूत: उवाच’ अशी आहे. त्यांचा संधी होऊन मराठीत ‘सूतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे/ कानावर घालणे’ हा वाक्प्रचार रूढ आहे. हे आणि असे इतर वाक्प्रचार वाचताना भाषा ही ‘सांस्कृतिक स्मृती’ असल्याची प्रचीती येते.