डॉ. नीलिमा गुंडी
बोलणे आणि लिहिणे या भाषाव्यवहाराचा संदर्भ असलेले अनेक वाक्प्रचार आढळतात. ‘बोल लावणे’ म्हणजे नावे ठेवणे, दोष देणे. ‘बोलबाला होणे’ म्हणजे प्रसिद्धी मिळणे. ‘बोलाचालीवर येणे’ म्हणजे भांडणे, वर्दळीवर येणे, असे नेहमी कानावर पडणारे वाक्प्रचार बोलबोलता आठवतात!
‘शब्द झेलणे’ म्हणजे आज्ञेप्रमाणे वागणे. ‘शब्द टाकणे’ म्हणजे विनंती करणे. ‘तोंडाची टकळी चालणे’ म्हणजे सारखी बडबड करणे. टकळी हे हाताने सूत कातण्याचे यंत्र असते. ते चालू केले की सतत सुताचा धागा निघत राहतो. त्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.
‘शालजोडीतील मारणे/ देणे’, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे ‘दोन शालींमध्ये गुंडाळून (जोडय़ाने) मारणे’ म्हणजे वरवर सभ्य सुरात टोमणे मारणे; कारण शाल हे उंची मुलायम वस्त्र असते. त्यातून मारलेला फटका उघडपणे दिसणार नाही; मात्र त्यात लपलेला फटका आहेच! मंगेश वि. राजाध्यक्ष यांनी आपल्या एका पुस्तकाचे शीर्षक ‘शालजोडी’ (१९८३) असे ठेवले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन वाङ्मय क्षेत्रातील संकेतांची खिल्ली उडविली आहे. त्यातील मिश्कीलपणे केलेली टीका शीर्षकाला शोभून दिसते.
‘अक्षरशत्रू’ असणे म्हणजे निरक्षर असणे. ‘बत्तिशी वठणे’ म्हणजे बोललेले खरे होणे. जाहीर कार्यक्रमात कानी पडणाऱ्या ‘चार शब्द बोलणे’, या वाक्प्रचारात ‘चार’ या शब्दाचा अर्थ काटेकोरपणे घ्यायचा नसतो. येथे ‘चार’ याचा अर्थ मर्यादित संख्या असा अभिप्रेत आहे. त्यामुळे चार शब्द बोलणे म्हणजे थोडक्यात बोलणे होय.
मुद्रणकला अस्तित्वात आल्यावर नव्याने रूढ झालेला वाक्प्रचार म्हणजे ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ हा होय. यात छापील लेखनात, मुख्यत: मुद्रितशोधन करताना राहिलेल्या चुका अभिप्रेत असतात. पूर्वी ‘अमृत’ या मासिकामध्ये या शीर्षकाचे सदर असे. त्यात वाचक आपल्या वाचनात आलेल्या हास्यकारक चुकांच्या नोंदी पाठवत. ते सदर खूप लोकप्रिय होते. चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणरावचे चऱ्हाट’ मध्ये मुद्राराक्षस विनोद करणार, हे गृहीत धरून लेखकाने केलेले शब्दनिष्ठ विनोद आहेत. असे इतरही वाक्प्रचार आठवत राहतील.