आपल्याकडे विविध धर्म आणि संप्रदाय आहेत. त्यांच्या विविध प्रथांना लोकजीवनात स्थान असते. त्यातील काही प्रथांचे संदर्भ वाक्प्रचारांमध्येही आढळतात. ‘ओनामा करणे’ हा वाक्प्रचार आपण ‘सुरुवात करणे’ या अर्थी वापरतो. ‘ॐ नम: सिद्धम’ या जैनांच्या मंत्राशी त्याचा संबंध असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पूर्वी ‘ओनामासिधं’ असे लिहून शिक्षणाची सुरुवात होत असे. वसंत बापट यांनी ‘छडी लागे छमछम’ या गीतात या मंत्राचा मार्मिक वापर केला आहे, तो असा- ‘म्हणा सारे एकदम, ओनामासिधं / छडी लागे छमछम’. संत ज्ञानेश्वर यांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये सुरुवातीला ‘ॐ नमो जी आद्या’ असे नमन आहे. एकंदरीत ‘ॐ नम:’वरून ओनामा हा शब्द रूढ झाला आहे. हैदोसहुल्ला हा वाक्प्रचार मुसलमानांच्या मोहरमशी निगडित आहे. हसन आणि हुसेन यांचा मृत्यू त्यांच्या लग्नानंतर एका लढाईत झाला. त्यामुळे मोहरमच्या वेळी ताबुतांच्या मिरवणुकीत ‘हाय दोस्त, हाय दुल्हा’ (म्हणजे नवरदेव) असा शोक केला जातो. यातून हैदोसहुल्ला असा शब्द तयार झाला आणि पुढे त्याला आरडाओरडा, गोंधळ असा अर्थ चिकटला.  तारांबळ उडणे म्हणजे गडबड गोंधळ उडणे. या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती मजेशीर आहे. हिंदुंमध्ये लग्नविधीनुसार लग्नमुहूर्ताची घटिका नेमकी साधण्यासाठी मंगलाष्टकातील ‘ताराबलं चंद्रबलं तदेव’ हे शब्द फार घाईने म्हटले जातात. त्यातून हा वाक्प्रचार रूढ झाला. ‘ताराबलं’चे ‘तारांबळ’ हे रूप झाल्यामुळे, अनुस्वार देताना अक्षरांची अदलाबदल करून हा वाक्प्रचार गडबडीचे दर्शन घडवतो!  तिलांजली देणे हा वाक्प्रचार हिंदुंच्या एका विधीशी संबंधित आहे. श्राद्धाच्या वेळी मृत व्यक्तीला उद्देशून तीळयुक्त जल वाहतात. त्यातून ‘तिलांजली देणे’ म्हणजे संबंध संपणे, असा वाक्प्रचार रूढ झाला. गोविंदाग्रज लिहितात-  ‘दिली तिलांजली अश्रूंची ही त्या प्रेमाच्या नावा, परतायाचे नाही आता त्या प्रेमाच्या गावा.’  येळकोट करणे (जयजयकार करणे), पारणे फिटणे (तृप्त होणे), हे वाक्प्रचारही येथे  आठवतात. आपल्या जगण्यातील सुखदु:खाचे संदर्भ त्यांना लगडलेले असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा