भानू काळे
मराठीप्रमाणे हिंदीतही ‘भंगार’ हा शब्द ‘फेकून द्यायच्या बिनकामाच्या वस्तू’ याच अर्थाने वापरला जातो. नाशवंत या अर्थाच्या ‘भंगुर’ या संस्कृत शब्दावरून तो आला असावा. जसे की, क्षणभंगुर म्हणजे क्षणात भंग पावणारे. तशा गोष्टी विकत घेणारा तो ‘भंगारवाला’ हाही शब्द रूढ आहे. पण ‘भंगार’ शब्दाचा संस्कृतमधील दुसरा अर्थ ‘सोने’ असाही आहे; ‘भू+अंगार’ अशीही त्या शब्दाची फोड केली गेली आहे. म्हणजे आपल्याकडे प्रचलित असलेल्या अर्थाच्या अगदी विरुद्ध अर्थ! कन्नड भाषेतही सोने याच अर्थाने भंगार शब्द वापरला जातो.
एखादा शब्द एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना अर्थबदल अनेकदा होत असतो. जसे की, ‘चेष्टा’ या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ ‘प्रयत्न’ असा आहे आणि हिंदीत तो त्याच अर्थाने वापरतात. मराठीत मात्र ‘चेष्टा’ म्हणजे ‘थट्टा’ किंवा ‘मस्करी’. हिंदीतील ‘चाराघोटाला’ या वृत्तपत्रीय शब्दप्रयोगात ‘चारा’ शब्दाचा अर्थ मराठीप्रमाणेच ‘गाईगुरांनी खायचे गवत’ हाच आहे; परंतु सामान्यत: ‘चारा’ शब्द हिंदीत ‘उपाय’ या अर्थाने वापरला जातो. जसे, ‘उस के सामने और कोई चारा नही था.’ मराठीत मात्र ‘गाईगुरांनी खायचे गवत’ याच एका अर्थाने ‘चारा’ शब्द वापरतात. किंवा ‘कामात व्यग्र’ या अर्थान हल्ली वापरल्या जाणाऱ्या ‘व्यस्त’ या हिंदी शब्दाचा मराठीतील अर्थ मात्र ‘विषम’ असा आहे. तसा अर्थबदल अनेकदा होतो; पण ‘भंगार’ शब्दाच्या संदर्भात सोन्याचे रूपांतर केरकचऱ्यात होणे हे मात्र अर्थबदलाचे अगदी टोकाचे उदाहरण मानता येईल!
कोहिनूर हा अत्यंत तेजस्वी हिरा गोवळकोंडा येथील खाणीत सापडला होता आणि पुढे बऱ्याच हस्तांतरांनंतर तो इंग्लंडच्या तत्कालीन राणीकडे दिला गेला. मध्यंतरी जेव्हा राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले त्यावेळी तो कोहिनूर ब्रिटिश सरकारने भारताला परत करावा, अशी मागणी काही जणांनी केली होती. कोहिनूर या मूळ फार्सी शब्दाची फोड कोह् इ नूर अशी असून त्याचा अर्थ ‘तेजाचा किंवा प्रकाशाचा पर्वत’ असा आहे. खोदलेल्या खाणीत सापडलेल्या हिऱ्याला पर्वताची उपमा दिली जाणे हीदेखील एक गंमत आहे!