भानू काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कथा किंवा कहाणी या दोन्ही शब्दांचा अर्थ गोष्ट किंवा कथानक असा आहे. दोन्ही शब्दांचे मूळ ‘कथिका’ या संस्कृत शब्दात आहे. ‘कथिका’वरून ‘कथा’ शब्द बनला आणि‘कथिका’चेच अपभ्रष्ट रूप ‘कहिआ’ या शब्दाला ‘णी’ हा प्राकृत प्रत्यय लागून ‘कहाणी’ शब्द तयार झाला. ‘कथणे’ म्हणजे ‘सांगणे’ या शब्दापासूनही ‘कथा’ शब्द बनला असेल असे कृ. पां. कुलकर्णी यांचा ‘मराठी व्युत्पत्ति कोश’ सांगतो. साहित्यात मात्र ‘कथा’ हा एक विशिष्ट प्रकार आहे. संपादक लेखकाकडे मागतो ती ‘कथा’. ‘साठा उत्तरांची कहाणी’अशा काहीशा पारंपरिक संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘कहाणी’ शब्दाला ती विशिष्ट वाङ्मयीन अर्थच्छटा नाही.

‘किस्सा’ शब्दाचे मूळ मात्र अगदी वेगळे आहे. डॉ. यू. म. पठाण यांच्या ‘फार्सी-मराठी अनुबंध’ या ग्रंथानुसार ‘किस्सा’ हा शब्द ‘भांडण’ या अर्थाने फार्सीत रूढ आहे. ‘किस्सा होणे’म्हणजे भांडण होणे, ‘किस्सा सांगणे’ म्हणजे आपली बाजू मांडणे, ‘किस्सा घालणे’ म्हणजे वाद होणे आणि ‘किस्सा तुटणे’ म्हणजे वाद मिटणे असे त्या शब्दाचे चार प्रयोग त्यांनी दिलेले आहेत. मराठीत मात्र त्यांपैकी कुठल्याच अर्थाने आपण ‘किस्सा’ शब्द वापरत नाही. हा शब्द छोटीशी रंजक कथा किंवा विनोद या अर्थाने आपण वापरतो. जसे की,‘पुलंचे अनेक किस्से सांगून मिरासदारांनी भाषणात मजा आणली.’ हिंदीत मात्र किस्सा शब्द फार्सी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील अर्थच्छटांनी वापरला जातो. जसे की ‘किस्सा कुर्सी का’. ‘काण्ड’ शब्द मूळ संस्कृतात ‘खंड’ किंवा ‘तुकडा’ या अर्थाने आहे. उसाचे ‘कांड’ हा त्याच अर्थाचा प्रयोग. पण ग्रंथाचे एक प्रकरण किंवा एखादा विशिष्ट कालखंड हाही अर्थ संस्कृतात आहे. उदाहरणार्थ, रामायणातील अरण्यकाण्ड किंवा बालकाण्ड. आज मात्र त्या शब्दाला ‘फार मोठा गैरव्यवहार’ असा अर्थ प्राप्त झाला आहे. कदाचित हिंदी पत्रकारितेच्या प्रभावामुळे. पण त्याच अर्थाने आज ‘काण्ड’ शब्द अधिक वापरला जातो. जसे की,‘वासनाकाण्ड’ किंवा ‘त्या व्यापाऱ्याने तिथेही मोठे काण्ड केले.’ साधारण सारख्याच अर्थाचे शब्द असले तरी त्यांच्या प्रत्यक्ष वापरात अशाप्रकारे बराच फरक पडतो.