डॉ. माधवी वैद्य
आज स्नेहाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला. ती या पुरस्काराला काय उत्तर देणार याकडे अर्थातच सगळय़ांचे लक्ष लागलेले होते. डॉ. स्नेहा हे ज्ञानक्षेत्रातील एक ज्ञानी, अनुभवसंपन्न आणि शहाणे व्यक्तिमत्त्व होते याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नव्हते. स्नेहाने आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपल्याला ज्ञान देणाऱ्या सर्वच गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करून ती म्हणाली, ‘‘आज हा पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या आजीचे आभार मानायचे आहेत. कारण तिने माझे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले. ज्ञान संपादन करताना मला जी ‘माहिती’ मिळाली ती मी आस्थापूर्वक वापरली. जे ‘ज्ञान’ मिळाले ते योग्य प्रकारे वापरले त्यामुळेच मला आजचा पुरस्कार प्राप्त झाला. पण या साऱ्यासाठी जे शहाणपण मला लाभले, ते मात्र आजीकडून. माझ्या आजीने ऐकवलेल्या कहाण्यांतून, गोष्टींमधून, म्हणींतून, अनुभवाच्या बोलांमधून मी सुसंस्कृत झाले. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रयत्नांती परमेश्वर’, ‘पुराणातली वांगी पुराणात’, ‘तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे’, ‘दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ’ अशा अनेक म्हणी आणि गोष्टी ऐकवताना तिने मला शहाणपणाचा वसा दिला. ‘ज्ञान धावते पण शहाणपण रांगते’, असे ती मला नेहमी सांगायची. तू ज्ञानी होशीलच पण शहाणीसुद्धा हो. जगण्याच्या अनुभवातून आपल्याला शहाणपण येत असते. ज्ञान तुम्हाला समृद्धी, संपन्नता मिळवून देईल, पण शहाणपण त्याचा उपयोग, विनियोग चांगल्याप्रकारे कसा करावा याचे भान देईल. आज मला मिळालेला हा पुरस्कार मी माझ्या जाणत्या आजीला समर्पित करीत आहे. तिने मला कोणत्याही पुस्तकात न लिहिलेले ज्ञान सहजगत्या दिले. मी सुशिक्षित होतेच पण तिच्यामुळे सुसंस्कृतही झाले.’’ स्नेहाचे हे भाषण ऐकल्यावर सर्वानी टाळय़ांचा कडकडाट केला.
स्नेहाचे भाषण ऐकून समारंभासाठी आलेली आजी भारावून गेली. व्यासपीठावरून खाली भेटीसाठी आलेल्या आपल्या ज्ञानी आणि शहाण्या नातीला आशीर्वाद देत ती म्हणाली, ‘‘आज तुझ्यासारख्या सुसंस्कृत, शहाण्या व्यक्तींची देशाला खूप गरज आहे.’’