डॉ. माधवी वैद्य
माझी एक आजी होती. मनाने स्वस्थ, आरोग्य मस्त. घरात सुनांचा सहभाग. घर नांदते होते. कसली काळजी नाही. घरात कामही जास्त नाही. आपले सारे आवरले की आजी एकदम मोकळी. मग हातात जपाची माळ घेऊन बसायची खिडकीत. खिडकी रस्त्याला लागूनच. रस्ता वाहता असायचा. बरेच दिवस आजीचा तिथेच संसार झाल्यामुळे त्या गल्लीतले घर अन् घर आणि माणूस अन् माणूस माहितीचे. आजीचे खिडकीत बसणे म्हणजे टोल नाकाच जणू. चार- दोन वाक्यांचा टोल दिल्याशिवाय आजीच्या तावडीतून कोणी सुटत नसे. सारे तिला ‘खिडकीतली आज्जी’ म्हणत.
येईल जाईल त्याच्याशी मनमुराद गप्पा. त्या बरोबरच प्रश्नांची सरबत्ती. एखादा माणूस समोर आला की आज्जी त्याला विचारी, ‘काय ठकूताई! खूप दिवस दिसला नाहीत? कुठे गेला होतात? बरं आहे ना? घरची सगळी ठीक ना? शेजारचे अरुणभाऊ ठीक आहेत ना? त्यांना बरं नव्हतं म्हणे मध्यंतरी? नाही त्यांचंही तसं वयच झालंय म्हणा! काही त्रास न होता सुटका झालेली बरी असते हो! पण मरण का कोणाच्या हातात असतं? असो. असू देत. सांगा त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत होते.’ ठकूबाई आजीच्या तावडीतून कधी सुटका होते, त्याची वाटच पाहत होत्या. जरा या चौकशीला कुठेतरी खबदाड पडले आहे, हे पाहून त्या सटकल्या आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काही व्यक्ती अशा असतात. या खिडकीतल्या आजीसारख्या. ना घेणे ना देणे, नुसते घालायचे उखाणे! खणत खणत त्या व्यक्तीची माहिती गोळा करायची आणि मग आपल्या खासगी वाहिनीवरून ती प्रसारित करीत बसायचं! जपाचा पडे विसर आणि सांगावे लागे ‘अगं आजी, तुझे प्रश्न आता आवर!’ या लोकांच्या स्वभावासाठी ही म्हण.. ‘सारव भिंती तर म्हणते घराला कोपरे किती?’