माणसांमध्ये दडलेले आदिम ‘प्राणी’ हे रूप युद्धामध्ये प्रकट होत असते. युद्धविषयक वाक्प्रचारांमधून युद्धाची रौद्र, भयानक आणि करुणरसपूर्ण दर्शने घडतात. काही वाक्प्रचार खास बखरींमध्ये आढळतात. आज ते प्रचलित नाहीत. ‘झोंटधरणी होणे’ हा त्यापैकी एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एकमेकांचे केस ओढून युद्ध करणे. हा युद्धाचा काहीसा ग्राम्य अवतार असावा! ‘पानिपतची बखर’मध्ये वाक्य येते : ‘तेथे मोठी झोंटधरणी होऊन वरकड हत्यारांची लढाई व तिरंदाजीही राहिली.’ (‘झोंटधरणी होणे’ हा वाक्प्रचार कवी मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील रचनेतही आढळतो.) ‘जुम्मस न खाणे’ हा वाक्प्रचारदेखील बखरीत आढळतो. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, हार न मानणे, हिंमत न हारता आत्मविश्वासाने लढणे.
युद्ध सुरू झाले की वीरश्रीयुक्त वातावरण तयार होते. त्या वातावरणाचे वर्णन ‘रणधुमाळी माजणे’ या वाक्प्रचारातून केलेले आढळते. धुमाळी या शब्दाचा अर्थ आहे क्षोभ, संताप आणि माजणे म्हणजे कैफ चढणे. (हल्ली ‘निवडणुकांची रणधुमाळी माजली,’ असे वाचायला मिळते.) खडे चारणे (बेजार करणे), नामोहरम करणे (पराभूत करणे), नेस्तनाबूत करणे (निर्मूलन करणे) असेही काही वाक्प्रचार आढळतात. खडाजंगी होणे या वाक्प्रचारातील ‘जंग’ या फारसी शब्दाचा अर्थ आहे युद्ध. यात वाणीने केलेले युद्ध- भांडण अभिप्रेत आहे. युद्धामुळे काही नवे वाक्प्रचार रूढ होतात. पानिपतचे युद्ध हे मराठय़ांच्या इतिहासातील एक मोठे युद्ध होते. या युद्धामुळे ‘भाऊगर्दी होणे’ आणि ‘पानिपत होणे’ हे दोन वाक्प्रचार रूढ झाले. सदाशिवराव भाऊ पेशवे हे युद्धात लढता लढता नाहीसे झाले होते. त्यामुळे फौज सैरावैरा पळू लागली. या घटनेचा संदर्भ असलेला वाक्प्रचार आहे, ‘भाऊगर्दी होणे’. यातील भाऊगर्दी हा शब्द निरुपयोगी ठरणारी गर्दी अशा अर्थाने रूढ झाला. तसेच पानिपतच्या युद्धात मराठय़ांची मोठी हानी झाली होती. त्यामुळे ‘पानिपत होणे’ हा वाक्प्रचार ‘विनाश होणे’ या अर्थी रूढ झाला. असे हे वाक्प्रचार युद्धाचे वर्णन करतात, तसेच युद्धाच्या जखमा जिवंतही ठेवतात!
– डॉ. नीलिमा गुंडी
nmgundi@gmail.com