यास्मिन शेख
‘त्या लेखकाच्या नव्या पुस्तकाचा ग्रंथविमोचन समारंभ एका श्रेष्ठ साहित्यिकाच्या हस्ते पार पडला.’ या वाक्यातील ‘ग्रंथविमोचन समारंभ’ ही शब्दयोजना सदोष आहे.
या शब्दातील मोचन (नाम, नपुसकलिंगी) हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे- स्वतंत्रता, मोकळीक, मुक्तता, सुटका, मुक्ती. ‘मोचन’ या नामातील मूळ धातू आहे- मोच (सं)- मुच्- मोचणे. या क्रियापदाचा अर्थ आहे- मोकळा करणे, सोडणे, मुक्त करणे. मोचन या शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लागला की, सिद्ध होतो शब्द- विमोचन. विमोचन (नाम, नपुसकलिंगी) अर्थ- सुटका, मोकळीक, मुक्ती, मुक्तता. ‘वि.’ हा उपसर्ग लागल्याने ‘मोचन’ या शब्दाच्या अर्थात काहीही वेगळेपण नाही, हे आपल्या लक्षात येईल. उलट, मोचन या शब्दाच्या अर्थात भर पडते. ग्रंथविमोचन समारंभ या वरील वाक्यातील शब्दाचा अर्थ होईल- ग्रंथाची मुक्तता किंवा सुटका करण्याचा समारंभ. हा समारंभ नव्या पुस्तकाची सुटका किंवा मुक्तता करण्यासाठी नाही, तर या नव्या ग्रंथाचे (पुस्तकाचे) प्रकाशन करण्यासाठी आहे. ‘ग्रंथविमोचन’ हा शब्द अत्यंत दोषपूर्ण आहे.
प्रकाशन (संस्कृत नाम, नपुं.) अर्थ- प्रसिद्ध करणे, प्रकाशित करणे. प्रकाशक (नाम, पुल्लिंगी) अर्थ- प्रसिद्ध करणारा, पुस्तके, ग्रंथ इ. लिखित साहित्य प्रसिद्ध करणारा. एखाद्या भाषेत प्रकाशनऐवजी विमोचन, ‘ग्रंथप्रकाशन’ ऐवजी ग्रंथविमोचन असा शब्द रूढ असला, तरी मराठी भाषेत ‘ग्रंथप्रकाशन’ हेच योग्य रूप आहे. परभाषेतील शब्दांचे मराठीत (संस्कृताप्रमाणे) वेगळेच अर्थ असतील, तर रूढ असलेले योग्य शब्द मराठी भाषकांनी, लेखकांनी का नाकारावेत?
‘वि’ हा उपसर्ग लागून मराठीत अनेक शब्द उपलब्ध आहेत. मात्र ‘वि’ या उपसर्गामुळे प्रत्येक शब्दाचा विरुद्ध अर्थ होतोच असे नाही.
काही शब्द पाहा-
विरुद्धार्थी शब्द- विसंगत, विरस, विरूप, विवस्त्र, विवर्ण, विसंवाद, विस्मरण, वियोग, विधर्मी, विषम इ.
शब्दाला ‘वि’ उपसर्ग लागून त्याचा अर्थ थोडा अधिक व्यक्त करणारे- विविध, विशुद्ध, विकास, विख्यात, विनाश, विश्रुत, विजय, विघातक, विनम्र इ.