भानू काळे
अनेक रूढ शब्दांची व्युत्पत्ती साहित्यातून झालेली आहे. उदाहरणार्थ, ‘श्रीमंत पण लोभी आणि दुष्ट माणूस’ या अर्थाने ‘शायलॉक’ किंवा ‘संभ्रमावस्थेत असलेला माणूस’ या अर्थाने ‘हॅम्लेट’ हे शेक्सपियरचे शब्द आजही वापरले जातात. ‘शूर, शक्तिमान’ माणसाला ‘टारझन’ म्हटले जाते. हा शब्द आला एडगर राइज बरो या इंग्लिश लेखकाच्या प्रचंड लोकप्रिय पात्रावरून. ‘दिवसा सर्वसामान्य डॉक्टर पण रात्री भयानक खुनी’ असे एक पात्र रॉबर्ट लुईस स्टीव्हनसन या लेखकाने ‘डॉक्टर जेकिल अँड हाइड’ या कादंबरीत रंगवले होते. तोच शब्दप्रयोग दोन अगदी भिन्न रूपे धारण करणाऱ्या ढोंगी माणसाला उद्देशून आजही केला जातो. ‘जुलुमी श्रीमंतांना लुटून त्यांचे पैसे गोरगरिबांना वाटून देणारा लढाऊ पुरुष’ या अर्थाने ‘रॉबिन हूड’ हा शब्द रूढ आहे. हे देखील असेच एक लोकसाहित्यातून आलेले पात्र.
आपल्याकडेही महाभारतातील ‘कवचकुंडले काढून देणारा उदार कर्ण’ किंवा ‘दुष्ट दुर्योधन’ आणि रामायणातील ‘जीवाला जीव देणारी राम-लक्ष्मण जोडी’ किंवा ‘कुटिल मंथरा’ ही अशीच काही पात्रे; ते-ते गुणविशेष असलेल्या व्यक्तीला उद्देशून वापरली जाणारी. राम गणेश गडकरी यांनी ‘एकच प्याला’ नाटकात एका दारुडय़ाचे नाव ‘तळीराम’ ठेवले होते. आजही दारुडय़ाला उद्देशून तो शब्द वापरला जातो. आचार्य अत्रे यांच्या ‘कवडीचुंबक’ नाटकात एक ‘श्रीमंत पण अतिशय कंजूष’ पात्र आहे. आजही त्याच अर्थाने ‘कवडीचुंबक’ शब्द वापरला जातो. पु. ल. देशपांडे यांचा बेरकी ‘अंतू बरवा’ किंवा भाबडा ‘सखाराम गटणे’ ही अशीच दोन पात्रे.
‘चांदरात’ हा असाच एक साहित्यातील शब्द. ‘चांदरात पसरिते पांढरी, माया धरणीवरी, लागली ओढ कशी अंतरी’ या अनंत काणेकरांच्या त्याच शीर्षकाच्या कवितेतील गूढरम्य ओळी. किंवा ‘तुझे विजेचे चांदपाखरू दीपराग गात, रचित होते शयनमहाली निळी चांदरात’ या बोरकरांच्या नादमधुर ओळी. ‘चंद्रप्रकाश’ या अर्थाने इथे ‘चांदरात’ शब्द योजलेला आहे. पण प्रत्यक्षात ‘चांदरात’ या फारसी शब्दाचा अर्थ अगदी वेगळा आहे. मुस्लीम राजवटीत महिन्याचा पगार ज्या दिवशी चंद्र दिसे त्या दिवशी, म्हणजे द्वितीयेला, वाटत. त्या पगाराच्या दिवसाला ‘चांदरात’ म्हणत! त्याच्यात गूढरम्य काव्यात्मकता अजिबात नाही!