कैखुश्रो बेगम नंतर भोपाळमध्ये तिचा मुलगा नवाब हमीदुल्लाखान याची नवाबपदाची कारकीर्द १९२६ ते १९४९ अशी झाली. भारतीय नरेश मंडळाचा अधिपती म्हणजेच ‘चेंबर ऑफ प्रिन्स’ चा चान्सलर म्हणून त्याने अनेक वष्रे काम पाहिले.
तुलनेने धनिक असलेल्या भोपाळ संस्थानच्या या नवाबाचे मोहम्मद अली जिना आणि गव्हर्नर जनरल माऊंटबॅटन यांच्याशी जवळचे संबंध होते. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळून पाकिस्तान स्थापन होणार हे ठरले त्या वेळी, मध्य भारतातील भोपाळ संस्थान पाकिस्तानात विलीन करावे म्हणून जिनांनी नवाबावर मोठा दबाव आणला होता. परंतु नवाबाने अखेरीस आपले राज्य भारतातच विलीन केले.
नवाब हमीदुल्लाची मोठी मुलगी आणि संस्थानाची वारस अबिदा सुलतान हिने मात्र, आपले सर्व हक्क सोडून १९५० साली पाकमध्ये आश्रय घेऊन पाकच्या परराष्ट्र व्यवहार खात्यात नोकरी केली. तिचा मुलगा शाहरियार खान हा पाकीस्तानचा परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष होता.
अबिदा सुलतान पाकिस्तानात स्थायिक झाल्यामुळे भारत सरकारने तिची बहीण साजिदा बेगम हिला भोपाळच्या गादीचे वारस ठरवून नवाबपदाचे लाभ त्या वेळच्या कायद्यांप्रमाणे दिले. पुढे साजिदा बेगमशी पतौडी संस्थानचा नवाब इफ्तिकार अली खानचा निका झाला.
भोपाळ गादीला दुसरा वारस नसल्यामुळे साजिदाचा एकुलता एक मुलगा आणि नवाब ऑफ पतौडी, मन्सूर अली खान हाच भोपाळच्या गादीचाही वारस ठरला!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा