‘केवळ सजीवच दुसऱ्या सजीवाला निर्माण करतो’, हा सिद्धांत म्हणजे बायोजेनिसीस. ज्या काळात प्रयोगावर आधारलेली विचारपद्धती अस्तित्वात नव्हती, त्या काळात उत्पत्ती ही उत्स्फूर्तपणे होत असल्याचा गरसमज होता. ओंडक्यापासून मगरीची, गटारापासून उंदरांची आणि मृतांच्या शरीरातून किडय़ांची निर्मिती होते, अशा समजुती प्रचलित होत्या. इ.स.पूर्व चौथ्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता, अ‍ॅरिस्टॉटल यानेदेखील असेच विचार मांडले होते. सतराव्या शतकात मात्र, फ्रॅन्सिस्को रेडी या इटालियन वैद्यकतज्ज्ञाने, निर्जीव वस्तूंपासून सजीव आकस्मिकरीत्या तयार होत नसल्याचे सिद्ध केले. ज्या डब्यात माश्या शिरू शकतात, त्याच डब्यातील मांसात माश्यांच्या अळ्या निर्माण होतात; बंद डब्यातील मांसात अळ्या निर्माण होत नाहीत, हे त्याने दाखवून दिले.

लाझारो स्पालानझानी या इटालियन जीवशास्त्रज्ञाने अठराव्या शतकात केलेल्या एका प्रयोगातून, निर्वात भांडय़ात ठेवलेल्या मांसात सूक्ष्मजीव निर्माण होत नसल्याचे दिसून आले. इ.स. १८५८ सालात रुडॉल्फ विर्शाव या जर्मन वैद्यकतज्ज्ञाने उत्स्फूर्त उत्पत्तीच्या सिद्धांताला आव्हान देऊन, ‘जिवंत पेशींपासूनच नव्या पेशी निर्माण होऊ शकतात’ हा बायोजेनिसीसचा सिद्धांत मांडला. त्याच सुमारास, फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ लुई पाश्चर यानेही ‘सर्व सजीव केवळ सजीवांपासूनच प्रजननाने तयार होतात,’ असे प्रतिपादन केले आणि इ.स. १८६० सालाच्या सुमारास केलेल्या आपल्या प्रयोगांद्वारे बायोजेनिसीसचा हा सिद्धांत सिद्धही करून दाखवला.

लुई पाश्चरने आपल्या प्रयोगात काचेच्या चंबूत मांसाचे सूप घेतले व ते उकळवून त्यातील सजीव नष्ट केले. त्यानंतर लगेच त्याने या चंबूचे तोंड काच मऊ होईल इतक्या तापमानापर्यंत तापवले व चंबूच्या या तोंडाचे बारीक नळीत रूपांतर करून ती इंग्रजी ‘एस्’ आकारात वळवली. या वक्राकारामुळे हवा चंबूच्या आत शिरू शकत होती, परंतु सजीवांचा वाहक ठरू शकणारी बाहेरील धूळ मात्र चंबूत न शिरता या वक्राकार नळीच्या आतच अडकून बसत होती. काही दिवसांनी चंबूतील सुपाचे निरीक्षण केल्यानंतर, या सुपावर कोणताच परिणाम झालेला दिसला नाही. परंतु जेव्हा त्याने हा चंबू तिरका करून आतील सूप नळीत अडकलेल्या धुळीच्या संपर्कात आणले, त्यानंतर मात्र अल्पकाळातच त्या चंबूतील सूप खराब झाले. पाश्चरच्या या प्रयोगांनी सजीवांच्या उत्स्फूर्त उत्पत्तीच्या सिद्धांताला संपूर्णपणे नेस्तनाबूत केले.

– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Story img Loader