हास्य आरोग्यदायी असले तरी, वास्तवाचे भान विसरून एखादी व्यक्ती हसत असेल तर ते मानसिक आजाराचे लक्षण असते. काही माणसे प्रत्यक्ष हसत नसली तरी सतत उत्तेजित राहतात. त्यांना ‘बायपोलर’ विकार असू शकतो. माणसांना काही वेळा आनंद आणि काही वेळ उदास वाटणे नैसर्गिक आहे. ‘बायपोलर’ विकारात माणसाच्या आनंद व दु:ख यांच्या लाटा खूप मोठय़ा असतात; उत्तेजित अवस्था आणि उदासी तीव्र असते.
खूप मोठी अवास्तव स्वप्ने पाहणे, आपण खूप श्रीमंत आहोत वा होणार असे वाटणे, त्यामुळे खूप खर्च करणे, त्यासाठी कर्ज काढणे, कुणी तरी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या प्रेमात पडली आहे असे वाटणे, ही द्विध्रुवीय विकारातील उत्तेजित अवस्थेत दिसणारी लक्षणे आहेत. एखाद्या महत्त्वाकांक्षी व्यक्तीमध्येही अशा भावना असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे असलेली व्यक्ती उपचार घेण्यासाठी जात नाही. भारतात तर अशा व्यक्तीने तपासून घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या व्यक्तीस या स्थितीत कोणताही त्रास होत नसल्याने तिला स्वत:ला काही आजार असल्याचे मान्यच नसते.
या द्विध्रुवीय आजाराच्या दुसऱ्या ध्रुवावर तीव्र औदासीन्य असते आणि त्या वेळी ती व्यक्ती डॉक्टरकडे जाते. त्याच वेळी या आजाराचे निदान होते. मात्र काही व्यक्ती औदासीन्य येत असले तरी ते नाकारतात. आजूबाजूची माणसे खूप सामान्य व खुजी असल्याने त्यांना माझे मोठेपण समजत नाही, अशी स्वत:ची समजूत घालीत राहतात. पण त्यामुळे त्यांच्या नातेवाईकान्ांा त्रास सहन करीत राहावे लागते. मात्र काही मानसशास्त्रीय चाचण्या या आजाराचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात.
उत्साही मानसिकता ही चांगलीच असली तरी, हा आजार असेल तर अशा स्थितीत स्वत:च्या इच्छेने ठरावीक ठिकाणी लक्ष देणे आणि काही काळ तेथे लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यांच्या मनात एकाच वेळी असंख्य कल्पना घोंघावत असतात. झोप लागत नाही. भुकेचीही जाणीव होत नाही. बोलणे वेगाने आणि असंबद्ध होऊ लागते. या रुग्णांच्या मेंदूचे परीक्षण केले असता ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’मधील ‘ऑर्बिटोफ्रण्टल’ भाग सक्रियता दाखवीत नाही. विचारांचे योग्य संयोजन त्याचमुळे होत नाही. मग सैराट कृती घडून येतात. योग्य औषधे, समुपदेशन, विचारांची सजगता यांच्या एकत्रित उपयोगाने हा त्रास आटोक्यात ठेवता येतो.
डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com