स्कविरग झाल्यानंतरची प्रक्रिया म्हणजे विरंजन (ब्लीचिंग) प्रक्रिया. ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे स्कविरग व्यवस्थित झालेले असायला हवे. तसेच कापडावर कुठेही पिवळे डाग असायला नकोत. असल्यास विरंजन प्रक्रियेत विरंजकाचे प्रमाण कमी-जास्त केले जाते. पूर्वी विरंजनासाठी कॅल्शिअम हायपोक्लोराईट हे पावडर स्वरूपात उपलब्ध असलेले रसायन वापरले जात होते. ही पावडर ब्लीचिंग पावडर म्हणून ओळखली जाते. विरंजनासाठी आता सोडिअम हायपोक्लोराईडचा उपयोग केला जातो. हे रसायन द्रव स्वरूपात वापरले जाते. या रसायनाचे विघटन होते, तेव्हा मोकळा होणारा (ड) या स्वरूपातील ऑक्सिजन अतिशय प्रभावी असतो. त्याची रंगावर प्रक्रिया होऊन कापड सफेद होते. सोडिअम हायपोक्लोराईटचे १२० ग्रॅम/लीटर या प्रमाणातील द्रावण वापरले जाते. कापडावर प्रक्रिया करताना द्रावणात ३ ग्रॅम प्रतिलिटर क्लोरीनचे प्रमाण ठेवून सामू १२ आणि तापमान ३० अंश सेल्सिअस एवढे ठेवले जाते. कापड द्रावणात ठेवण्याचा अवधी १ ते २ तास एवढाच असतो, म्हणजे विरंजन प्रक्रियेचे कापडावर विपरीत परिणाम होत नाहीत. विरंजन प्रक्रियेनंतर सोडिअम थायो सल्फेटच्या किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाच्या द्रावणातून बुडवून काढले जाते. त्यामुळे उर्वरित क्लोरिनचे पूर्ण उच्चाटन केले जाते. पहिली धुलाई सोडिअम बायकाबरेनेटच्या द्रावणातून करतात तर नंतरची धुलाई साध्या पाण्यातून केली जाते. विरंजन प्रक्रियेसाठी हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापरही केला जातो. कापडाच्या वजनाच्या प्रमाणात हायड्रोजन पेरॉक्साईड (५०%), सोडिअम सिलिकेट आणि सोडा अॅश याचे द्रावण वापरले जाते. भट्टीत केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत प्रथम कापड भरून मग पाणी भरतात आणि नंतर रसायने घातली जातात. झाकण उघडे ठेवून भट्टीचे तापमान ९५ अंश सेल्सिअसपर्यंत गरम करून सहा तास कापड बुडवून ठेवतात. नंतर थंड पाण्याने कापडाची धुलाई केली जाते. ही दुसरी प्रक्रिया खर्चीक आहे. पण ही अधिक परिणामकारक असून टिकाऊ पण आहे. रंगीत धाग्यावर ह्य़ा प्रक्रियेत काहीही परिणाम होत नाही. नवीन आस्थापनामध्ये धुलाई, कांजी काढणे, स्कवरिंग आणि विरंजन या सर्व प्रक्रिया एकाच सलग यंत्रात एकामागोमाग एक केल्या जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा