कुंडीमध्ये झाडाला, त्याच्या मुळांना वाढीस पुरेशी जागा आणि पोषण मिळते. बॉनसाय ट्रे उथळ असल्यामुळे झाडास पुरेशी जागा आणि पोषण मिळू शकत नाही. त्यामुळे कुंडीमधून बॉनसाय ट्रे मध्ये हलवल्यावर झाडे काळजीपूर्वक हाताळावी लागतात.
बॉनसाय ट्रेमध्ये भरण्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले सेंद्रिय खत किंवा गांडूळखत १:१:२ या प्रमाणात एकत्र करतात. बॉनसाय ट्रेच्या तळाशी जादा पाणी वाहून जाण्यासाठी चार-पाच छिद्रे असतात. त्यावर प्लॅस्टिकची जाळी पसरतात. प्लॅस्टिकच्या जाळीवर एकदम जाडसर वाळूचा थर पसरतात. त्यावर दोनतृतीयांश ट्रे भरेपर्यंत माती, वाळू आणि खत यांचे मिश्रण पसरतात. पाण्याने हे थर चांगले भिजवतात. नंतर झाड ट्रेमध्ये ठेवले जाते आणि खालच्या छिद्रातून, जाळीतून आणि नंतर मातीच्या थरांतून ओढून घेतलेल्या तांब्याच्या तारेने बुंध्याजवळ बांधतात, जेणेकरून झाडास ट्रेमध्ये उभे राहाण्यास आधार मिळेल. नंतर वरील एक इंच जागा सोडून ट्रेचा उर्वरित भाग अगदी बारीक मातीने भरतात.
हा ट्रे पाणी असलेल्या टबमध्ये साधारण एक आठवडय़ापर्यंत ठेवतात आणि नंतर बाहेर काढून सूर्यप्रकाशात ठेवतात. अशा प्रकारे बॉनसाय तयार होते. एकदा बॉनसाय तयार झाले म्हणजे त्याची कुंडीतील इतर झाडांप्रमाणे काळजी घ्यावी लागते. तसेच बॉनसायची रचना, त्याचा आकार आहे तसा राहावा यासाठी दक्ष राहावे लागते.
उथळ ट्रे आणि मोजकीच पोषणमूल्ये मिळत असल्यामुळे बॉनसाय ताजेतवाने, सशक्त राहाण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर नियमितपणे खते घालावी लागतात. सर्वसाधारणपणे बॉनसायना ताबडतोब विरघळणारी आणि त्वरित उपलब्ध होणारी खते म्हणजे युरिया, डायअमोनियम फॉस्फेट, पोटॅश इत्यादी घालू नयेत. त्याऐवजी सावकाश उपलब्ध होणारी, मातीमध्ये दीर्घकाळ राहाणारी अशी सेंद्रिय खते म्हणजे कंपोस्ट, गांडूळखत, नीमकेक, बोनमिल इत्यादी खते साधारण प्रत्येक महिन्याला एकदा घालतात. बॉनसायवर कीड, रोग होऊ नयेत म्हणून ठरावीक वेळेस औषध फवारणी करावी लागते.
– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
आजचे महाराष्ट्रसारस्वत ७ डिसेंबर
१९४१ > ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचे निधन. हिंदी काव्य, ऊर्दू नज्म्म आणि गज्मल यांच्याशी झालेला परिचय तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन त्यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. नीती, सत्य आणि सौंदर्य हे गुण त्यांच्या काव्यात अंगभूत आहेत आणि त्यामुळेच हे काव्य आजतागायत टिकलेही आहे. राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता हा त्यांचा काव्यग्रंथ १९३५ साली प्रथम प्रकाशित झाला, तेव्हापासून त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.
१९५९ > लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे यांचे निधन. ‘प्रभात’मधील त्यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
१९९३ > नाटय़सिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन. स्नेहांकिता हे त्यांचे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले व त्यावरून सर्वस्वी तुझाच हे नाटकही त्यांनी लिहिले. पळसाला पानं तीन हा ललित लेखसंग्रह आणि रसिक प्रेक्षकांस सप्रेम हे त्यांनी केलेल्या भूमिकांचे विश्लेषण करणाऱ्या लेखांचे पुस्तकही त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर
वॉर अँड पीस सकारात्मक कामजीवन व आयुर्वेद (भाग-२)
जगभरच्या विविध देशांत आधुनिक वैद्यकातील ‘सिल्डेनाफिल’ या औषधाची ‘वृष्य’ म्हणजे कामवासना पूर्ण करण्याकरिता मोठीच मदत; मोठय़ा संख्येने पुरुष घेत असतात. पुरुषाला जेव्हा कामवासना त्रास देते तेव्हा विशिष्ट संवेदना मेंदूतून लिंगाकडे पोहोचतात. काही पुरुष मंडळींना भावना होते, मेंदूकडून मागणी होते पण लिंगाकडे तसेच दोन अंडांकडे पुरेसा शुक्राचा, विर्याचा, विषयोपभोगाचा पुरेपूर आनंद घेण्याकरिता पुरवठा होत नाही. काही मंडळींना महिन्यातून एखादवेळा थोडे सुख लाभते, पण ते तात्पुरत्या औषधांमुळे अल्पायू ठरते. कोणी त्याकरिता मांसाहार, सुकामेवा, मिठाई वा खुळ्यासारखा तात्पुरता इलाज म्हणून मधाचीही मदत घेतात. सुदैवाने आयुर्वेदीय शास्त्रकारांनी आपल्या थोर ग्रंथांमध्ये रसायन व वाजीकरण अशा दोन दृष्टिकोनातून खूप सखोल चिंतन केलेले आहे. रसायनचिकित्सा टिकावू स्वरुपाचे शुक्र किंवा ओजोवृद्धीचे बल देते. वाजीकरण किंवा वृष्यचिकित्सा तात्पुरत्या पुरेशा कामवासना पूर्तीकरिता असते.
या रसायन वा वृष्यचिकित्सेमध्ये सुवर्ण, रौप्य, लोह या धातूंपासून तयार होत असलेल्या भस्मांना व त्यांचा समावेश असलेल्या विविध औषधांना टिकाऊ स्वरूपाचे बल देण्याचे श्रेय दिले जाते. सुवर्णमालिनीवसंत, बृहतवातचिंतामणी, लक्ष्मीविलास चंद्रप्रभा, नवायसलोह, सुवर्णमाक्षिकादिवटी यांचा प्रमाणित वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा, काही पथ्य पाळावे. त्यांच्या जोडीला च्यवनप्राश, कुष्मांडपाक, शतावरीकल्प, शतावरीघृत, धात्रीरसायन यांचा रसायनकाली म्हणजे सकाळी स्नान झाल्यावर योग्य प्रमाणात वापर करावा. नैराश्य येत नाही. ज्यांना सकाळची टिकावू स्वरुपाची दीर्घकाळची योजना परवडत नाही त्यांना आस्कंद, उडीद, चिकणा, बला, हरणखुरी अशा वनस्पतींचे चूर्ण सायंकाळी अवश्य घ्यावे. पुरुषांच्या लिंग ताठरपणाकरिता ब्राह्य़ोपचारार्थ ‘रतिवल्लभ तेल’ योगदान देते. मद्यपान, तंबाखू, विडी, सिगारेट यांनी लैंगिक दुर्बलता येते, हे मी सुबुद्ध वाचकांना सांगावयास नकोच.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. सुघटन शल्य चिकित्सा
प्लास्टिक सर्जरी या नावाने माहीत असलेल्या या शास्त्रातला प्लास्टिक हा शब्द प्लास्टिकॉस या लॅटिन शब्दाचा अवतार आहे आणि त्याचा अर्थ आकार देणे असा आहे. प्लास्टिकचे अनेक प्रकार असतात, कारण निरनिराळ्या साच्यामधून निरनिराळे आकार बनविता येतात. सुघटन या शब्दाला तत्त्वज्ञानाचा स्पर्श आहे. डोंगरात असतो तो घाट, त्यात राहणारा तो घाटी, पण त्या डोंगरातला तो घाट नागमोडी किंवा वर्तुळाकार असतो. निसर्गात निरनिराळ्या आकाराच्या गोष्टी असतात, पण आकार देण्यात आलेली फार जुनी गोष्ट म्हणजे घट किंवा कुंभ किंवा मडके. ती गोष्ट घडली मातीतून तेव्हापासून घट घटना हे शब्द रूढ झाले. इथली क्रिया कृत्रिम आहे आणि त्याचे मूळ निसर्ग (माती) आहे. जर निसर्गातून विकृतीयुक्त व्यक्ती रुग्ण म्हणून आली तर तिला चांगला घाट देण्याच्या प्रयत्नाला सुघटन म्हणतात.
म्हणून या वैद्यकीय विज्ञानाच्या शाखेला सुघटन शल्य चिकित्सा म्हणतात. ही शाखा व्यंगावर उपचार करते (व्यंगविशेष किंवा विकृत अंग) आणि व्यंगामुळे आलेल्या मानसिकतेला दिलासा देते. याउलट मनच व्याधिग्रस्त असेल तर ते मन नसलेले व्यंग बघू लागते आणि उपाय शोधते. अशा रुग्णांना अचूक टिपावे लागते नाहीतर मनामधली मूळ व्याधी न गेलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली तर मग असा मनोरुग्ण आणखीनच निराश होतो. दोरीला साप समजून धुपाटण्याने मारल्यामुळे फायदा काहीच होत नाही. व्यंगामुळे नुसतेच मानसिक किंवा तेवढय़ापुरते शारीरिक परिणाम होतात किंवा दिसत नाहीत तर इतर तऱ्हेने कार्यक्षमता कमी होऊ शकते.
जन्मत: दुभंगलेल्या ओठ आणि टाळू या विकृतीत दातावर दात बसत नाहीत, चावणे अवघड होते, द्रव पदार्थ नाकावाटे वाहतात. नाकाचे कार्य बिघडते. गिळायला त्रास होऊ शकतो. तोंडात वायू बंदिस्त करता येत नाही त्यामुळे वाचेची फेक सदोष आणि गेंगाणी होते. टाळूच्या मागचा घसा आणि कानाची पोकळी यात एका सूक्ष्म छिद्रातून संबंध असतो. टाळू उघडा राहिला तर त्या छिद्रातून कानात जंतू प्रवेश होतो, मग पू होतो, कान फुटतो तेव्हा कानाचा पडदा निकामी होऊन बहिरेपण येते. आधीच बोलायची मारामार त्यात हे बहिरेपण त्यामुळे डबल धमाका होतो. सर्वात महत्त्वाचे माणूस आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या दोषामुळे लज्जित होतो. मूल चिडवतात म्हणून बुजतो आणि आत्मविश्वास हरवून बसतो आणि स्वत:च्या कार्यक्षमतेला पारखा होतो आणि हरतो. हे वरचे सगळेच्या सगळे वेळेवर बऱ्याच प्रमाणात सुधारता येते. एकाच व्यंगावर एवढे सारे लिहिले. प्लास्टिक सर्जरी ही गोष्ट एका इंग्रजी शब्दानेच वर्णन करता येते.
रविन मायदेव थत्ते