बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे.
बॉनसायसाठी रोप निवडल्यानंतर प्रथम रोपाची, फांद्यांची उंची आपल्याला हवी तेवढी कमी केली जाते. तसेच नको असलेल्या जादा फांद्या मुख्य खोडापासून काढून टाकतात. राहिलेल्या फांद्यांवरील पाने काढून टाकतात. रोपाला दोन प्रकारची मुळे असतात. सोटमूळ जाड असते. ते सरळ खालच्या दिशेने वाढते. तंतूमुळे धाग्यांप्रमाणे असतात. ती जमिनीला समांतर पसरतात. सोटमूळ कापून टाकले जाते. त्यामुळे तंतूमुळे जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. असे रोप मातीच्या कुंडीमध्ये लावले जाते. त्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत समप्रमाणात एकत्र करतात. कुंडीच्या तळाशी विटांचे तुकडे अथवा छोटे दगड टाकतात. त्यावरती दोन-तीन इंच जाडसर वाळूचा थर घालतात.
रोपे लावताना तंतूमुळे रोपाच्या बाजूने पसरतील, हे पाहून रोप कुंडीमध्ये लावतात. या रोपाची बागेतील इतर रोपांप्रमाणेच काळजी घेतात. म्हणजेच, वेळच्या वेळी पाणी, खते, औषधफवारणी हे सर्व सांभाळतात. आपल्याला हव्या त्या जाडीच्या फांद्या, हव्या त्या आकाराचे, रचनेचे झाड तयार होईपर्यंत झाड कुंडीतच वाढवतात. त्यासाठी वेळोवेळी जादा फूट छाटणे, शेंडे कापणे, नवीन वाढणाऱ्या फांद्या काढणे, जादा पाने कापून टाकणे अशी कामे करावी लागतात. तसेच बऱ्याचदा पावसाळ्यात जाड मुळे छाटून झाड परत मोठय़ा कुंडीत लावावे लागते.
आपण ठरवलेल्या रचनेप्रमाणे झाडाचा आकार बनवण्यासाठी वायिरग करतात. त्यासाठी तांबे किंवा अ‍ॅल्युमिनियमची लवचीक तार वापरतात. तार गुंडाळताना बुंध्याच्या खालच्या भागाकडून सुरुवात करून फांदीच्या वरच्या टोकापर्यंत तिरकस पीळ पडेल, या पद्धतीने सर्व फांद्यांना तार गुंडाळतात. तार गुंडाळताना मध्ये येणारी पाने काढून टाकतात. एकदा तार गुंडाळून झाली म्हणजे रचनेप्रमाणे फांद्या वर, खाली, तिरकस हलवता येतात.
आपल्याला हव्या त्या रचनेप्रमाणे झाड तयार झाले म्हणजे ते बॉनसाय ट्रेमध्ये लावले जाते.
– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  –  प्लास्टिक सर्जरी/ सुश्रुत मुनी
या विषयात कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे. बिघडलेली चित्रे किंवा पुतळे दुरुस्त करण्यासाठी Art Restorers असतात तसे आम्ही. मी तरी एखादी विकृती बघितली की, कल्पनाचित्रे रंगवू लागतो. हल्ली खासगी रुग्णालयात Package Deal  असते. अमुक एक शस्त्रक्रियेचा गोळाबेरीज खर्च ठरवितात आणि घेतात. कमी-जास्त झाले तरी अळीमिळी गुपचिळी असते. आम्हाला हा नियम लागू करता येत नाही. कारण प्रत्येक शस्त्रक्रिया निराळी असते. मला आठवते, एक रुग्ण आला होता, भयंकर घोरायचा. दर अध्र्या तासाने जागा व्हायचा. रात्रभर हाच प्रकार. मान आखूड आणि जाडा गोलमटोल होता. इतके जागरण की, हा टॅक्सीचालक गाडी चालविताना डुलक्या घ्यायचा. श्वासोच्छ्वास बिघडलेला तेव्हा रक्तदाब झाला. याला Sleep Disorder  म्हणतात. याचे एक कारण असे असते की, यांची पडजीभ दुप्पट-तिप्पट लांब असते. पडद्यासारखी फडफडते. म्हणून घोरणे आणि प्राणवायू कमी पडला की जाग येते. यावरची शस्त्रक्रिया म्हणजे पडजीभ कापून टाकणे. शस्त्रक्रियेच्या वेळी मनात विचार आला फार कापली तर हा गेंगाणा बोलेल, कमी कापली तर परत कापावी लागेल. त्याऐवजी हिला मी दुमडतो आणि थेट हाडाचा जो टाळू असतो त्याला शिवली तर? बरा झाला तर फार उत्तम. जर गेंगाणा बोलू लागला तर थोडी सोडवून घेता येईल. ही शस्त्रक्रिया पाच मिनिटांत पार पडली. रुग्ण बरा झाला, झोपू लागला, त्याच्या बायकोलाही झोप येऊ लागली. याच्या डुलक्या बंद झाल्या. छायाचित्रे काढलेली होती. मी निबंध लिहिला.  ब्रिटिश जर्नलला पाठवला. परीक्षकाने शेरा मारला की ही खरी कल्पकता. मग निबंध प्रसिद्ध झाला. या असल्या कल्पकतेचा पिता सुश्रुत. वाराणसीचा राजवैद्य. दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीचा. याने संस्कृत कवितेमधून प्लास्टिक सर्जरीवर विस्तृत लिहिले. कापलेली नाके, फाटलेले कान, जन्मत: दुभंगलेले ओठ कसे दुरुस्त करावेत, कोठल्या सुया वापराव्यात, त्यात कशा प्रकारचा दोरा कसा ओवावा, शस्त्रक्रियेनंतर दुरुस्त केलेल्या भागाला कशी विश्रांती घ्यावी आणि त्यावर मध किंवा इतर गुणकारी औषधे कशी लावावीत सगळे पद्धतशीरपणे लिहिले. अनेक शस्त्रक्रियांना लागणारी निरनिराळी आयुधे यांचा तपशील दिला आणि हे शास्त्र शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड कशी करावी याचे मार्मिक विवेचन केले आहे. पुढे हे एवढे प्रगत विज्ञान काळाच्या ओघात आपल्या नाकर्तेपणामुळे लयाला गेले असे वाटले; परंतु जुन्या मौखिक परंपरेत तग धरून होते ते पुढे मध्य पूर्वेत गेले. मग युरोपमध्ये पसरले. तिथून इंग्लंडला आणि अमेरिकेत गेले आणि आपले विद्यार्थी तिथे शिकायला जाऊ लागले. आधुनिक काळात सुश्रुताला नावारूपाला आणले मॅक्डॉवेल नावाच्या अमेरिकन जर्नलच्या संपादकाने. उद्या या विषयाबद्दल थोडे आणखीन.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- कामवासना (भाग-१)
मानवी जीवनात कामवासना ही संपूर्ण मानवी सृष्टीची प्राथमिक स्वरूपाची अत्यावश्यक भावना आहे, हे तुम्ही-आम्ही मनोमन जाणतो. पण व्यवहारात कामवासनेबद्दल अनेक स्तरांवर उगाचच टीकाटिप्पणी चालू असते. स्त्री-पुरुष समागम जणू काही पाप आहे अशी समजूत खासगी व जाहीरपणे थोर थोर मंडळी करून देत असतात. तुमच्या-आमच्या या विश्वाचा इतिहास किमान लाख वर्षांचा तरी असावा. समस्त प्राणिसृष्टीत किडा, मुंगी, घोडे, बैल, शेळ्या, मेंढय़ा ते थेट हत्ती, वाघ, सिंह या सगळ्यांच्या आजच्या अस्तित्वाला संबंधितांच्या स्त्री-पुरुष जातीच्या समागमाची पाश्र्वभूमी आहे. कामवासनेतून उत्पत्ती आहे, हे सत्य विसरून चालणार नाही. क्वचित अपवाद म्हणून कामवासनेच्या अतिरेकाचे वृत्त आपण वाचतो. ती वासना संयमाने हाताळली जावी यातच विचारी मनाचे मोठेपण आहे.
माझ्याकडे आठवडय़ातून एखादे तरी कुटुंब ‘यांना इच्छाच होत नाही’ किंवा ‘हिला संभोगाची किळस वाटते,’ ‘हे मला फार त्रास देतात’ किंवा ‘यांचे माझ्याकडे दुर्लक्ष असते,’ अशा तक्रारी घेऊन येतात. कामवासना लुप्त झाली असल्यास शरीराची अजिबात हानी न करता संबंधित स्त्री-पुरुषांकरिता आयुर्वेदीय औषधी महासागरात अनेकानेक औषधे आहेत. या सर्वामध्ये तुलनेने स्वस्त, सोपे, कमी किमतीचे व तत्काळ गुण देणारे औषध म्हणजे अस्कंदचूर्ण होय. हे चूर्ण घेतल्यास त्याचा परिणाम शरीरातील शुक्र, ओज, वीर्य यांना जागृतावस्था येण्यास होतो. स्त्री-पुरुषांना दोघांनाही याचा निश्चित उपयोग होतो. अश्वगंधाचूर्ण, अश्वगंधापाक, अश्वगंधाघृत, आस्कंद शतावरी संयुक्त कल्प अशा विविध प्रकारे वापर करून कामवासनेला योग्य खाद्य देऊन अपेक्षित सुख स्त्री-पुरुषांना लाभते. या थोर वनस्पतीव्यतिरिक्त शतावरी,  चिकणा, बला, अतिबला, नागबला,  भुईकोहळा, चोपचिनी, अमरकंद, उडिद, कोहळा, आवळा, मदनमस्त अशा विविध वनस्पती कामवासनेच्या वाजवी पूर्तीकरिता मोठेच योगदान देत असतात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – ६ डिसेंबर
१९२३ > ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाटय़ाचे लेखक वसंत सबनीस यांचा जन्म. काव्य, विनोदी लेख, कथा, नाटके, एकांकिका लिहून सबनीसांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यामध्ये पानदान, भारूड, मिरवणूक हे विनोदी लेख. खांदेपालट, थापाडय़ा हे कथासंग्रह. सोबती (व्यक्तिचित्रसंग्रह), माहेश्वरी (आत्मपर) आणि सौजन्याची ऐशी तैशी, कार्टी श्रीदेवी, गेला माधव कुणीकडे ही त्यांची गाजलेली नाटके.
१९५६> भारतीय घटनेचे शिल्पकार, पत्रकार, लेखक, विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. जगातल्या मोजक्या बुद्धिवंतांमध्ये त्यांचा समावेश. प्रॉब्लेम ऑफ दी रूपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, दि अनटचेबल्स, हू वेअर द शूद्राज’ हे ग्रंथ त्यांच्या संशोधकवृत्तीची साक्ष देतात. तर्कशुद्ध विचार, सत्यसेवी वृत्ती आणि नेटकी मांडणी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़.
१९८४ > अनिल सदाशिव बर्वे यांचे निधन.  डोंगर म्हातारा झाला, अकरा कोटी गॅलन पाणी या कादंबऱ्या, तर कोलंबस वाट चुकला, हमिदाबाईची कोठी, मी स्वामी देहाचा या नाटकांच्या लेखनाबरोबर नक्षलवादी चळवळीसंबंधी त्यांनी खळबळजनक लेख लिहिले.
– संजय वझरेकर