बॉनसाय तयार करण्याच्या दोन मुख्य पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे निवडलेले रोप बॉनसाय बनवण्यासाठी तयार करणे आणि दुसरी पायरी म्हणजे बॉनसाय बनवणे.
बॉनसायसाठी रोप निवडल्यानंतर प्रथम रोपाची, फांद्यांची उंची आपल्याला हवी तेवढी कमी केली जाते. तसेच नको असलेल्या जादा फांद्या मुख्य खोडापासून काढून टाकतात. राहिलेल्या फांद्यांवरील पाने काढून टाकतात. रोपाला दोन प्रकारची मुळे असतात. सोटमूळ जाड असते. ते सरळ खालच्या दिशेने वाढते. तंतूमुळे धाग्यांप्रमाणे असतात. ती जमिनीला समांतर पसरतात. सोटमूळ कापून टाकले जाते. त्यामुळे तंतूमुळे जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. असे रोप मातीच्या कुंडीमध्ये लावले जाते. त्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत समप्रमाणात एकत्र करतात. कुंडीच्या तळाशी विटांचे तुकडे अथवा छोटे दगड टाकतात. त्यावरती दोन-तीन इंच जाडसर वाळूचा थर घालतात.
रोपे लावताना तंतूमुळे रोपाच्या बाजूने पसरतील, हे पाहून रोप कुंडीमध्ये लावतात. या रोपाची बागेतील इतर रोपांप्रमाणेच काळजी घेतात. म्हणजेच, वेळच्या वेळी पाणी, खते, औषधफवारणी हे सर्व सांभाळतात. आपल्याला हव्या त्या जाडीच्या फांद्या, हव्या त्या आकाराचे, रचनेचे झाड तयार होईपर्यंत झाड कुंडीतच वाढवतात. त्यासाठी वेळोवेळी जादा फूट छाटणे, शेंडे कापणे, नवीन वाढणाऱ्या फांद्या काढणे, जादा पाने कापून टाकणे अशी कामे करावी लागतात. तसेच बऱ्याचदा पावसाळ्यात जाड मुळे छाटून झाड परत मोठय़ा कुंडीत लावावे लागते.
आपण ठरवलेल्या रचनेप्रमाणे झाडाचा आकार बनवण्यासाठी वायिरग करतात. त्यासाठी तांबे किंवा अॅल्युमिनियमची लवचीक तार वापरतात. तार गुंडाळताना बुंध्याच्या खालच्या भागाकडून सुरुवात करून फांदीच्या वरच्या टोकापर्यंत तिरकस पीळ पडेल, या पद्धतीने सर्व फांद्यांना तार गुंडाळतात. तार गुंडाळताना मध्ये येणारी पाने काढून टाकतात. एकदा तार गुंडाळून झाली म्हणजे रचनेप्रमाणे फांद्या वर, खाली, तिरकस हलवता येतात.
आपल्याला हव्या त्या रचनेप्रमाणे झाड तयार झाले म्हणजे ते बॉनसाय ट्रेमध्ये लावले जाते.
– मानसी भिर्डीकर (कोल्हापूर) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा