फ्रान्समधील बोडरे (Bordeaux) शहरातील द्राक्षांवर या ताम्रयुक्त कवकनाशक मिश्रणाचा प्रथम वापर सुरू झाला. यामुळे या मिश्रणाला बोडरेमिश्रण हे नाव पडले. रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्षांवर प्रथम या मिश्रणाचा वापर सुरू केला गेला. ते विषारी आहे असे समजून वाटसरू सुरुवातीस अशी द्राक्षे खात नसत. फ्रान्समध्ये द्राक्षांवर केवडा रोग पडू लागला होता, त्या वेळेस बोडरेमिश्रण फवारलेली द्राक्षे मात्र या रोगापासून सुरक्षित राहिली. त्यामुळे नंतर बोडरेमिश्रणाचा वापर सर्रास सुरू झाला आणि तो अजूनही चालू आहे.
बोडरेमिश्रणात २.३ किलोग्रॅम कळीचा चुना, २.३ किलोग्रॅम मोरचूद आणि २२५ लिटर पाणी असे घटक असतात. पिकांच्या अवस्थेप्रमाणे ते सौम्य किंवा तीव्र करतात.
बोडरेमिश्रण करण्यासाठी धातूची भांडी वापरत नाहीत. मातीच्या हंडय़ात किंवा लाकडी पिंपातपाणी घेऊन त्यात मोरचूद विरघळवतात. दुसऱ्या एका लाकडी पिंपात किंवा मातीच्या हंडय़ात पाणी घेऊन चुनकळीचे द्रावण तयार करतात. त्यानंतर मोरचुदाचे द्रावण चुनकळीच्या द्रावणात हळूहळू ओतत व ढवळत मिसळून एकजीव करतात किंवा ही दोन्ही द्रावणे तिसऱ्या लाकडी पिंपात एका वेळेस एकत्र ओततात.
बोडरेमिश्रण तयार झाल्यावर ते लगेच त्याच दिवशी फवारावे. फवारण्यापूर्वी ते उदासीन आहे की नाही हे तपासावे. हे मिश्रण अतिशय स्वस्त आणि निर्धोक असते. तंतुभुरी (द्राक्षे), पानांवरील डाग (टोमॅटो, पपई, पानवेल व हळद), बटाटय़ावरील करपा, भुईमुगावरील टिक्का, रोपांची मर, लिंबावरील खैरा, सुपारीची फळगळ या रोगांवर या मिश्रणाचा चांगला उपयोग होतो. सफरचंदावर या मिश्रणाचा काही वेळेला वाईट परिणाम दिसून येतो.
मेसन या शास्त्रज्ञाने १८८७ साली चुन्याची कळी न मिळाल्याने त्याऐवजी धुण्याचा सोडा वापरून हे मिश्रण तयार केले. आर्यलडमध्ये हे मिश्रण बटाटय़ावर वापरले गेले. त्याला सोडा बोडरे असे नाव पडले. हे मिश्रण करण्याची पद्धत बोडरेमिश्रणासारखीच असून त्यासाठी मोरचूद १.८ किलोग्रॅम, धुण्याचा सोडा २.३ किलोग्रॅम आणि पाणी २२५ लिटर वापरतात. बोडरेमिश्रणाप्रमाणे या मिश्रणाचा फळांवर डाग पडणे, कोवळी पाने करपणे असे दुष्परिणाम होत नाहीत.
– अशोक जोशी (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा