जागतिक बुद्धिबळ विश्वातील अग्रगण्य बुद्धिबळपटू म्हणून बोरिस स्पास्कीची ओळख आहे. बोरिस स्पास्कीने दहाव्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धामधील जेतेपद मिळवले आणि पुढे १९६९ ते १९७२ या काळात त्याने हे विश्वविजेतेपद स्वत:कडे राखले. बोरिस बासिलिव्हीच स्पास्कीचा जन्म १९३७ साली लेनिनग्राड म्हणजे सध्याच्या सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षी दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत लेनिनग्राड येथेच रेल्वेत खेळला जात असलेला बुद्धिबळाचा खेळ पाहून त्याची या खेळाविषयी उत्सुकता वाढली. ऊरल येथे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर बोरिस प्रथम बुद्धिबळाच्या प्रदर्शनी सामन्यात खेळू लागला. दहाव्या वर्षी अशाच एका सामन्यात रशियाचा तत्कालीन बुद्धिबळपटू मिखाईल बोटविनीकचा पराभव करून जाणकार प्रेक्षकांना चकित केले. त्या वयात बोरिस रोजचे आठ दहा तास बुद्धिबळ खेळण्यासाठी, शिकण्यासाठी प्रशिक्षक ब्लादिमीर, झाक यांच्याकडे जात असे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी बोरिसने रशियातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूचा ‘सोव्हिएत मास्टर’ हा खिताब पटकावून क्रीडाविश्वाचं लक्ष वेधलं. १८व्या वर्षी त्याने अॅण्टवर्प, बेल्जियम येथे आंतरराष्ट्रीय कुमार विश्वविजेतेपद प्राप्त केलं. त्या पाठोपाठ बोरिसने गॅ्रण्ड मास्टरचा खिताब मिळवून बुद्धिबळाच्या विश्वात अभूतपूर्व असा इतिहास घडवला. १९६९ साली बोरिसने टायग्रन पेट्रोशियन या रशियाच्याच खेळाडूचा पराभव करून बुद्धिबळातील दहावा विश्वविजेता होण्याचा बहुमान प्राप्त केला. त्या काळातल्या बुद्धिबळाच्या क्षेत्रावर रशियाच्या असलेल्या वर्चस्वावर बोरिसने हे विश्वविजेतेपद मिळवून शिक्कामोर्तब केले. १९७२ साली अमेरिकेच्या बॉबी फिशर याने बोरिस स्पास्कीला तुल्यबळ लढत देऊन आइसलॅण्ड येथे झालेला हा ऐतिहासिक सामना जिंकला. या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये चाललेल्या शीतयुद्धामुळे बोरिस स्पास्की आणि फिशरमधल्या लढतीला चांगलीच रंगत भरली होती. हा सामना जिंकून फिशरने स्पास्कीचं विश्वविजेतेपद संपुष्टात आणलं. परंतु त्यानंतर बोरिसने १९७३ मध्ये रशियन जेतेपद पटकावून पुनरागमन केले. सध्या बोरिस स्पास्की उतारवयात बुद्धिबळाच्या प्रसाराचं काम करतो आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वनस्पतींची अंतर्गत संरक्षण फौज
मनुष्य प्राणी ज्याप्रमाणे स्वत:चे संरक्षण करू शकतात, तशी संरक्षण प्रणाली वनस्पतींकडे आहे का? बाह्य़ अंगावर काटे अथवा खाज निर्माण करणारे तंतू असणाऱ्या वनस्पतींसाठी उत्तर होय आहे. पण मोजक्या कुळामधील वनस्पतींनाच हे भाग्य लाभते. ज्याच्याकडे बाह्य़ संरक्षण कवच नसते, तेथे अंतर्गत संरक्षण फौज कार्यरत असते. पण तीसुद्धा ठरावीक कुळांमध्येच. वनस्पतींमधील अंतर्गत संरक्षण फौज ही रासायनिक द्रव्यांच्या रूपात पेशीमध्ये समाविष्ट असते. अनेकदा ही द्रव्ये वनस्पतींमध्ये विखुरलेली असतात. अथवा मूळ, खोड, पाने, फुले, फळे किंवा बीजांपर्यंतच सीमित असतात. त्या भागांची गोड, कडसर, तुरट, आंबट, तिखट चव, उग्र वास हा या संरक्षण प्रणालीचाच एक भाग आहे. हरितद्रव्य असणारी प्रत्येक वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने शर्करा आणि त्यासोबत प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ तयार करीत असते. ही त्यांची मुख्य उत्पादने, पण त्याचबरोबर वनस्पतींच्या काही ठरावीक कुळांमध्ये या मुख्य उत्पादनासोबत अनेक दुय्यम उत्पादनेही तयार होत असतात. वनस्पतींना त्याची वास्तविक तेवढी आवश्यकता नसते. मात्र आणीबाणीच्या काळात ती संरक्षण िभत म्हणून कार्य करतात. त्यांना ‘सेकंडरी मेटॅबोलाइटस्’ असे म्हणतात.
विविध प्रकारची तेलद्रव्ये स्टिरॉइडस्, अल्कलॉइड्स, टॅनिनस्, फ्लावोनॉइड, फिनॉल्स, रेझिन्स, रबर यांसाररख्या शेकडो द्रव्यांची निर्मिती वनस्पती सातत्याने करीत असतात. आणि त्या माध्यमातूनच त्यांचा चराऊ प्राणी, हानिकारक कीटक, बुरशी, जिवाणू, किटाणू यांसारख्या शत्रूंपासून बचाव करून जीवनचक्र यशस्वीपणे पूर्ण करण्याकडेच कल असतो. कुंडीमधील तुळशीला स्पर्श केला असता आपणास सुवास जाणवतो. ही या वनस्पतीची संरक्षण व्यवस्था आहे. झेंडूच्या पानाफुलांचा वास हानिकारक कीटकांना दूर ठेवतो. म्हणून अनेक शेतकरी त्यांच्या शेतात मुख्य पिकाबरोबर थोडा झेंडूसुद्धा लावतात. वनस्पतींमधील पांढरा चीक, रबरासारखे पदार्थ चराऊ प्राण्यांना आवडत नाहीत. मिरचीमधील तिखटपणा, मसाला पिकामधील उग्र वास, पुदिन्याचा वास हे सर्व वनस्पतींची संरक्षण प्रणाली आहे.
‘भारतीय आयुर्वेद औषध प्रणाली’ वनस्पतींच्या अंतर्गत संरक्षण फौजेवरच विकसित झाली आहे. क्यूनोन, मॉरफीन याचबरोबर वनस्पतींनी मानवास ३०० पेक्षा जास्त अल्कोलॉइडस औषधे म्हणून दिली आहेत.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org