पुढची काही वर्षे तंत्रज्ञान क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा वरचष्मा असणार आहे. त्यामुळे नॅनो स्तरावर उपयुक्त गुणधर्म असलेले वेगवेगळे पदार्थ शोधण्यात जगभरातले अनेक शास्त्रज्ञ गुंतले आहेत. याच प्रयत्नांतून कार्बन टय़ूब्ज, ग्राफिन असे आश्चर्यकारक गुणधर्म असलेले पदार्थ शोधण्यात आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात काही प्रमाणात वापर करण्यात शास्त्रज्ञांना यशही आलं आहे.
सुमारे तीस वर्षांपूर्वी चेंडूच्या आकाराचा आणि साठ कार्बन अणूंनी बनलेला ‘कार्बन बकीबॉल’ तयार करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले होते. आता चीनमधल्या ब्राऊन विद्यापीठ, शांक्सी विद्यापीठ आणि त्सिंघुआ विद्यापीठातल्या संशोधकांनी ली शेन्ग वँग यांच्या नेतृत्वाखाली रसायनशास्त्रातला आणखी एक नवीन ‘चेंडू’ नुकताच तयार करून दाखवला आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर चिनी शास्त्रज्ञांनी बोरॉन मूलद्रव्याच्या चाळीस अणूंपासून बोरॉनचा गोलाकार रेणू तयार करण्यात यश मिळवलं आहे. या रेणूला त्यांनी ‘बोरोस्फिअर’ असं नाव दिलं आहे.
बोरोस्फिअरमध्ये बोरॉनच्या तीन अणूंनी बनलेले ४८ त्रिकोण, सात अणूंनी बनलेले चार सप्तकोन आणि तीन अणूंनी तयार झालेले दोन षटकोन यांचा समावेश आहे. अनेक अणू हे गोलाकार रचनेच्या थोडेसे बाहेर आल्यामुळे बोरोस्फिअर हे कार्बन बकीबॉलप्रमाणे पूर्णपणे गोलाकार नाही. या वर्षांच्या सुरुवातीला वँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोरॉनच्या छत्तीस अणूंपासून ग्राफिनशी साधम्र्य दाखवणारं एक अतिसूक्ष्म पटल तयार केलं होतं. या पटलाची जाडी अर्थातच एका अणूच्या व्यासाएवढी होती.
ज्याप्रमाणे कार्बन बकीबॉल, कार्बन नॅनो टय़ुब्ज, ग्राफिन यांचा उपयोग नॅनो तंत्रज्ञानामध्ये भविष्यात मोठय़ा प्रमाणावर केला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे या ‘बोरोस्फिअर’चा उपयोग करता येऊ शकेल का?
खरं म्हणजे या प्रश्नाचं नेमकं उत्तर आजमितीस चिनी संशोधकांकडेही नाही, पण कार्बनच्या वेगवगेळ्या बहुरूपांप्रमाणे ‘बोरोस्फिअर’चाही उपयोग नॅनो तंत्रज्ञानामध्ये होऊ शकेल, असा दावा मात्र त्यांनी केला आहे. अर्थात त्यासाठी ह्य़ा रेणूंची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करण्याचं आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे.
हेमंत लागवणकर (डोंबिवली)  मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – माझ्याच वाटय़ाला का?
इतकी र्वष आपल्याच मताशी संवाद करायला मी उगीचच टाळाटाळ केली. स्वत:शी बोललं की जुनी, काळाच्या मातीत गाडलेली आपल्या चुकांची भुतं समोर उभी राहून आपल्याला भेडसावतील असं वाटायचं रे! अशा तऱ्हेनं पुरून टाकलेलं भय आणि दु:ख जणू काही मातीत पेरलेल्या वाईट बियांसारखं असतं ना? कधी तरी उगवून ते नकळत विषारी वेलीसारखं आपल्याला जखडून टाकतं! जाऊ दे. तुझ्याशी आज बोलावंसं वाटलं कारण गेले काही दिवस (आठवडे की महिने?) राहून राहून एकच प्रश्न मला सतावतोय. जणू काही लहान-मोठय़ा अडचणींची मालिकाच आपल्यामागे लागलीये. अडचणी म्हणजे लहान सहानच रे. अपेक्षाभंग होताहेत. अगदी क्षुल्लक गोष्टींपासून ते मित्रमैत्रिणींकडून काहीसा धोका खाल्लाय. मोठा घपला नाही, फ्रॅक्चर नाही पण सारखी सारखी ठेच लागल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मन नाही म्हटलं तरी वैतागलंय. उद्विग्न झालंय म्हण ना! मनात एकच प्रश्न सतत ठसठसत राहतो, माझ्याच बाबतीत असं का घडतं? मलाच का सारख्या ठेचा लागतात? नशिबाला खेळ करायला मीच का सापडतो? मीच का? मलाच का? हैराण होतो मी या प्रश्नांमुळे.
यावर तू काय उपाय सुचवणार म्हणा! अशा अनुभवांवर फार तर शेरोशायरी, कविता नाही पण चारोळ्या ठोकता येतात. व्हॉटसॅपवर टाकल्या की बरेच लाइक्स, उभे अंगठे, टाळ्या मिळतात. भोगावं लागतं ते मला! मलाच का? माझ्याच वाटय़ाला का?
क्षणभर विचार केला आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद वरवरचा असला तरी हा अनुभव सगळ्यांनाच कधी कधी भोगावा लागतो; हे लक्षात आलं. दु:खाच्या भोवऱ्यात फिरायला लागलं की मनाला उगीच एकटं एकटं , बाजूला पडल्यासारखं वाटतं. इकडेतिकडे पाहिलं की आपल्यासारखे बरेच जण आपापल्या भोवऱ्यात गटांगळ्या खाताना दिसतात. सगळे बरोबर दिसत असले तरी मीच एकटा, कमनशिबी, असं सगळे म्हणतात. अरे, मीही त्यातलाच एक!!
तेव्हा ठरवलं, अशा रीतीने उद्विग्न होण्यात, वैतागून चिडचिडण्यात काही अर्थ नाही. स्वत:ची समजूत काढण्यासारखा मूर्खपणा करायचा नाहीये. मी काय लहान आहे? मनाची समजूत काढायला जायचं नाही, आपल्या मनाची समज वाढवायची. मन अधिक समजदार झालं की स्वत:ला बाबापुता करावं लागत नाही.
थोडं निवळल्यावर मग मनात तीन प्रश्न उभे राहिले.
पहिला प्रश्न : ओके, मनाविरुद्ध काही घडलं, अपेक्षाभंग झाला. ठिकाय. त्याबद्दल वाईट वाटलं, ठिकाय. आपल्या अपेक्षाभंगाच्या दु:ख/संतापाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडलं, ठीक नाही! स्वत:च्या डोक्यावर फोडलंस, स्वत:ला दोष दिलास ठीक नाही. मग प्रश्न काय? त्या अनुभवातून मी काय शिकलो? पराभूत-सिनिकल मनोवृत्ती निर्माण झाली? पूर्णपणे अयोग्य. शहाणपणा शिकलो. योग्य. माझ्या अपेक्षा रास्त नसल्यामुळे माझी फसगत झाली, हे कळलं!! स्वत:च्या अपेक्षांची फेरतपासणी केली, त्यांना वास्तवाच्या पातळीवर कसं आणायचं हे शिकलो.. एकदम उत्तम.
दुसरा प्रश्न : सर्वानाच अपेक्षाभंगाचं दु:ख आणि राग सोसावा लागतो. लोकांचं लोक बघून घेतील. भोवतालची माणसं चुकीची वागतात म्हणून आपण चुकीचं वागावं? हे सर्वस्वी चूक आहे. दु:ख सामाईक असलं तरी ज्याला त्याला आपापल्या सुटकेचा मार्ग शोधावा लागतो. उगीच काय?
तिसरा प्रश्न : अपेक्षाभंगातून निर्माण होणाऱ्या दु:ख नि संतापाचा. त्याचा प्रत्यक्ष या क्षणाशी काय संबंध? जुन्या गोष्टी मला घोळवत बसायच्या नाहीयेत आणि कोणासमोर रडगाणं गात बसायचं नाहीये. स्वत:च्या मनावर रास्त विचारांची, व्यावहारिक सत्याची पकड घट्ट ठेवून वर्तमानात जगायचंय!! मित्रा, मस्त वाटतंय रे, तुझ्यावर फारच खूश आहे.. एक माणूस.. .
तुझा मी
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – ‘शेतीवर कितीही लोक जगतील’, ही फसवणूक
‘‘सुमारे २०० वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध विचारवंत माल्थस यांनी मानवापुढील अन्नधान्याचा प्रश्न क्रमश: बिकट बनत जाईल असा इशारा दिलेला होता. अन्नधान्य उत्पादनात गणिती श्रेणीने वाढ होईल, लोकसंख्या मात्र भूमिती श्रेणीने वाढत जाईल. १७९८ साली प्रसिद्ध केलेल्या लोकसंख्येवरील प्रबंधात माल्थसने हा विचार प्रामुख्याने माडंला. दरम्यान कृषिशास्त्राच्या क्षेत्रात नवीन नवीन शोध लागले. औद्योगिक क्रांतीच्या युगाचा जन्म झाला. पिके, फळबागा, प्रजननशास्त्र इत्यादींबाबत तंत्रविज्ञानाचे आधुनिक प्रकार अस्तित्वात आले आणि गेल्या दोन दशकांत लोकसंख्या वेगाने वाढली तरी अन्नधान्याच्या वाढीचा वेग त्याहीपेक्षा अधिक राहिला. दुष्काळाचे व उपासमारीचे जगातून समूळ उच्चाटन झाले नसले तरी अन्नधान्याचा प्रश्न सोडविणे मानवाच्या आवाक्यात आहे, असा भास निर्माण होऊ लागला. पण आज २१व्या शतकात प्रवेश करताना लोकसंख्यावाढीला इतका वेग येऊ पाहात आहे की मानवाचा हा आनंद क्षणभंगूर ठरण्याचा संभव आहे.’’ वाढती लोकसंख्या आणि तिचे शेतीवरील अवलंबित्व याबाबतीत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतापुढील प्रश्न कसे बिकट आहेत आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात याविषयी अण्णासाहेब शिंदे लिहितात –
‘‘भारतातील लोकसंख्येपैकी ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून शेतीवर अवलंबून असलेल्यांचे प्रमाण हेच आहे. तथापि याचा अर्थही अभ्यासकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. १९५० साली ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून होते. म्हणजे ३५ कोटी लोकसंख्येपैकी २५ कोटी लोक असे होते. आता भारताची लोकसंख्या ७५ कोटींवर गेली आहे. त्याचे ७० टक्के म्हणजे सुमारे ५० कोटी लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचे नियोजन करण्यात यश न आल्यामुळे शेतीवरील हा बोजा कमी होऊ शकला नाही. जगातील पुढारलेल्या देशात हे प्रमाण केवळ ३ ते १० टक्क्य़ांच्या आसपास आहे. शेतीवर कितीही लोक जगू शकतील असे मानून चालणे म्हणजे आपली आपण फसवणूक करून घेण्यासारखे आहे.’’

Story img Loader