निसर्गाने माणसाला त्याच्या मनातील विचार नोंदवून ठेवण्यास भोजपत्राची पांढरी पातळ साल दिली. त्यावर लिखाण करण्यासाठी ‘बोरू’च्या रूपात लेखनसाहित्यसुद्धा निसर्गानेच दिले. थोडक्यात ‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीप्रमाणे आम्ही निसर्गाकडून भोजपत्र मिळविले आणि त्यावर लिहिण्यासाठी शाई आणि लेखणीसुद्धा मिळवली. भोजपत्राचा वापर कागदाचा शोध लागल्यानंतर खूपच सीमित झाला, मात्र बॉलपेनच्या शोधासाठी १८८८ साल उजाडावे लागले. या पेनामध्ये घट्ट शाई वापरली जाते, तर १८१९मध्ये शोध लागलेल्या शाईच्या पेनामध्ये ती पातळ असते. बॉलपेन हे शाईपेनाचे सुधारित विज्ञानरूप आहे, मात्र या दोन्ही शोधांची जननी बोरू ही निसर्गातून मिळवलेली लेखणीच होती.
बोरू ही एक गवत कुळातील मोठी वनस्पती आहे. तिचे खोड पेन्सिल अथवा लहान बोटाच्या आकाराच्या कांडय़ाच्या रूपात असते. या कांडय़ाचा बाह्य भाग पिवळसर चकाकणारा असतो. बोरूचे खोड पेरापासून कापून तिच्या एका टोकास धारदार चाकूने आपणास हवे तसे तिरकस टोकदार केले जाते. या पेरामध्ये मूलऊती या सरल स्थायी ऊती असतात. बोरूचे टोक शाईमध्ये बुडवले की केशाकर्षणाने शाई वर चढते आणि नंतर बोरूचे टोक कागदावर स्थिर ठेवून किंचित दाब दिला की गुरुत्वाकर्षणाने शाई खाली उतरते आणि कागदावर हवी तशी अक्षरे उमटू लागतात. बोरूच्या बाहेरच्या गोलाकार चकाकणाऱ्या भागामुळे बोटांची पकड त्यावर व्यवस्थित बसते आणि बोटांना शाई लागत नाही. काही ओळी लिहिल्यानंतर टोक पुन्हा शाईपात्रात बुडवावे लागते. मानवाने या निसर्ग पद्धतीचा अभ्यास करून पुढच्या टप्प्यात टाक, त्यानंतर शाईपेन व बॉलपेनची निर्मिती केली, मात्र या नावीन्यपूर्ण संशोधनामागे बोरू या लेखणीचेच मूलभूत तत्त्व होते. भोजपत्रावरील जवळपास सर्व लिखाण बोरूच्या साहाय्यानेच झाले आहे. बोरूच्या लिखाणाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या टोकाला लहान-मोठा वेगळा आकार देऊन हवी तशी अक्षरे काढता येतात. बोरूच्या लिखाणामुळे अक्षर वळणदार होत असे त्यामागचे कारण म्हणजे बोरूवर दिला जाणारा ठरावीक सौम्य दाब. निसर्गाने आपणास दिलेली ही नदीकाठची, पाणथळ जागेवरील लेखणी आज कालबाह्य झाली असली तरी आजच्या या लेखन विश्वामध्ये तिचे योगदान आपल्या कायम स्मरणात राहील.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org