ईस्ट इंडिया कंपनीचे कलकत्त्यातील टांकसाळ प्रमुख जेम्स प्रिन्सेप हे स्वत: धातुशास्त्रतज्ज्ञ होतेच; पण त्यांना भारतातील शिलालेख, ताम्रलेख, नाणी, मूर्ती यांबद्दलही कुतूहल होते आणि ते स्वत: उत्तम चित्रकारही होते. टांकसाळीतील धातूच्या भट्टीमधील तापमान अचूक सांगण्याचे तंत्रही त्यांनी विकसित केले होते. या तंत्रज्ञानाविषयी त्यांचा लेख ‘फिलॉलॉजिकल ट्रान्झॅक्शन ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ लंडन’मध्ये प्रसिद्ध झाला. आपण ज्या प्रदेशात आलो आहोत तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आवड असणाऱ्या जेम्सनी बनारसला असताना तेथील वास्तू आणि विविध उत्सवांची चित्रे काढली आणि सर्वेक्षण करून शहराचा नकाशा तयार केला.

त्या काळात भारतात विखुरलेले शिलालेख, ताम्रपट वाचून ऐतिहासिक माहिती मिळवण्याचे काम चालू होते. पण त्यापकी अनेक लेख ब्राह्मी लिपीत होते. ब्राह्मी लिपी कोणालाही वाचता येत नसल्याने ते शिलालेख गूढ बनून राहिले होते. जेम्स एकदा कलकत्त्याच्या टांकसाळीत वेगवेगळ्या नाण्यांचे निरीक्षण करीत असताना त्यांच्या हातात बॅसिलिऑस या ग्रीक राजाचे नाणे आले. त्या नाण्यावर एका बाजूला ग्रीक आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मी लिपीत काही अक्षरे होती. दोन्ही बाजूंना ‘रजने पतलवष’ ही अक्षरेच होती पण ग्रीक आणि ब्राह्मीमध्ये. या अक्षरांच्या अभ्यासातून जेम्स प्रिन्सेपनी पुढच्या दोन वर्षांमध्ये ब्राह्मीची संपूर्ण वर्णमाला शोधून काढली. जेम्स यांच्या शोधामुळे सम्राट अशोकाच्या शिलालेखांचे अर्थ लागले, त्यातून अशोक, सातवाहन राजे यांची शासकीय व्यवस्था, जीवनपद्धती, लेण्यांमधील आलेख तसेच नाण्यांवरील माहिती उजेडात आली. जेम्सचा ब्राह्मी लिपीचा अभ्यास, त्यांचे नकाशे, चित्रे या सर्व गोष्टी पुढे भारतीय प्राचीन इतिहासाच्या अभ्यासासाठी मोलाच्या ठरल्या. त्यांनी काही काळ ‘जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी’चे संपादनही केले. अत्यंत गंभीर आजारामुळे जेम्सना लंडनला पाठविण्यात आले. परंतु वयाची केवळ चाळीस वष्रे पूर्ण झाली असताना १८४० साली लंडनमध्ये त्यांचे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com