– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
मुलांच्या भाषाशिक्षणातली पहिली समस्या म्हणजे शिक्षणाचा अयोग्य क्रम. भाषाशिक्षणाच्या चार पायऱ्या सांगितल्या जातात. (१) श्रवण (२) संभाषण (३) वाचन (४) लेखन.
घरात मुलं पहिली भाषा शिकतात ती केवळ श्रवण करून. जन्माला आल्यापासून दीड-दोन वर्षांत मुलं बोलायला लागतात. चुकत-माकत, पण शिकत-सुधारत अस्खलितपणे बोलतात. एक- दोन शब्दांपासून सुरू झालेला हा भाषेचा प्रवास पुढे लाखो शब्दांपर्यंत पोहोचतो. एक भाषा ओलांडून दोन- तीन भाषांपर्यंत सहजच जातो.
वेगवेगळ्या भाषांचं वातावरण समाजातून अनौपचारिकरीत्या मिळत असतं. घरात बोलली जाणारी घरभाषा ही कानावर पडणारी पहिली भाषा. मातृभाषेपेक्षाही घरभाषेचा प्रभाव मोठा असतो. आजकाल अनेक घरांमध्ये आईची आणि बाबांची भाषा वेगळी असू शकते. अशा वेळेस जी भाषा जास्तीत जास्त कानावर पडते, ती चटकन आत्मसात केली जाते.
परिसरात बोलली जाणारी परिसरभाषा हीदेखील सहजपणे ऐकली आणि बोलली जाते. टी.व्ही. आणि चित्रपटांमधून वेगळ्या भाषा कानावर पडतात. शेजारी, मित्र-मत्रिणींची वेगळी म्हणजे िहदी- गुजराती- कन्नड भाषा नीट ऐकली आणि बोलण्याचा प्रयत्न केला तर तीही येऊ शकते.
श्रवणाच्या पुरेशा संधी दिल्यानंतर संभाषण करायला भरपूर वेळ दिला पाहिजे. ज्या मुलांनी भरपूर वेळा भाषा ऐकली आहे आणि बोलली आहे, त्यांना आता तिसरं कौशल्यं शिकायचं आहे ते आहे वाचन. लेखन बहुतांशी शाळेवरच सोपवलेलं असतं. मात्र सर्वस्वी दुसरी भाषा शिकताना (उदा. इंग्रजी) सुरुवात कुठून केली जाते? तर लेखनापासून. आधी एबीसीडी शिकवायचं, ही पद्धत म्हणजे ‘आधी कळस’.. आणि पाया नाहीच! या पद्धतीची आहे.
मराठी भाषा शिकवायची सुरुवातही अशीच छोटय़ा धडय़ाचं- कवितेचं वाचन आणि गमभन लेखनापासून करतात. वास्तविक श्रवण आणि संभाषणाच्या खूप जास्त संधी पहिल्या पायरीवरच दिल्या पाहिजेत. मात्र त्याला फारशी जागाच ठेवलेली नाही. वर्गात जाणीवपूर्वक अनौपचारिक वातावरण ठेवलं तर दडपणाविना मुलं भाषा शिकतील. शाळा, भाषा शिकवणाऱ्या वेगवेगळय़ा क्लासमधून औपचारिक शिक्षण घेता येतं. पाठय़पुस्तकांची, परीक्षेत लिहिली जाणारी ही प्रमाणभाषा असते. ती नेहमीच्या वापरातल्या घरभाषेपेक्षा वेगळी असते. त्याचा सराव हळूहळू होत जातो. यातल्या वेगवेगळ्या छटा मुलांना ऐकून- बोलून चांगल्या समजतात.