डॉ. श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कधी आपला मेंदू बंद होऊन जातो. नवीन काही करावंसं वाटत नाही, कोणाला भेटावंसं वाटत नाही. आपण हे काय करतोय, असे प्रश्न डोक्यातून जात नाहीत. अनेक जण अशा अवस्थेतून जात असतात. ‘मेंटल ब्लॉक’ येत असतो. बहुतेक जण म्हणतात, असं वाटूनही काऽही करता येत नाही. काही करूच शकत नाही. जसं आहे तसं ढकलायचं.. खरं आहे! काम आणि कामच यात पुरतं गुंतल्यामुळे स्वत:ला ढकलावं लागतंच. न ढकलून सांगायचं कोणाला?

हे सगळं फक्त मोठय़ांच्या बाबतीत घडतं असं नाही. लहान मुलंही त्याच त्या चक्रात अडकलेली आहेत. तीच ती शाळा, तोच वर्ग, एकाच पद्धतीचा अभ्यास आणि हो, तीच ती बोलणी खाणं. सगळ्यांनी सारखं शिकवत राहणं, सांगत राहणं.

आपल्या मेंदूत असं घडतं त्यामागचं खरं कारण हे की, आपण रोज त्याच त्या प्रकारचं काम करत राहतो. नवीन काहीही नसलं की, अशा पद्धतीनं मेंदू बंद होतो. काम अजूनच आवडेनासं होतं. कामावर, स्वत:वर, माणसांवर राग काढला जातो.

पण काही माणसं त्याच परिस्थितीत स्वत:ला रिझवतात. आहे त्या गोष्टींकडेच वेगळ्या दृष्टीनं बघतात. लांबलचक भाषणं ऐकत मुलं हातानं फरशीवर रेघोटय़ांमधून चित्रं काढत बसतात.

बराच वेळ रांगेत उभं राहणं हे कंटाळवाणं काम. तसंच ‘रांग मोडू नका हो..’ असं लोकांना दिवसातून हजारदा सांगण्याचं कामही तितकंच कंटाळवाणं. हे काम करणाऱ्या एकाने मात्र या कामातही जान आणली होती. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून तो स्वत:चा आणि इतरांचा कंटाळा हलका करत होता.

अधिकाऱ्याचं काम तसं शिस्तीचं; पण एक अधिकारी रोज कार्यालयामधल्या फळ्यावर सुविचार किंवा लहानसा विनोद लिहीत होते. यामुळे त्यांना आणि इतरांनाही मजा येत होती.

भंगार गोळा करणारे एक जण मिळालेल्या वस्तूंतून स्वत:ची गाडी दर वेळी वेगळी आणि सुंदर सजवतात. बघणाऱ्याला आणि त्यांनाही छान वाटतं.

डोळ्यांना नवी दृश्यं दिसणं, ‘आज काय नवीन’ याची उत्सुकता वाटत राहणं, हसणं आणि हसवणं या सगळ्यामुळे काही वेळासाठी का होईना, बंद मेंदू उघडतो!

contact@shrutipanse.com