डॉ. श्रुती पानसे -contact@shrutipanse.com
सवय म्हणजे नक्की काय असते? रोज तीच गोष्ट करून अंगवळणी पडलेली एखादी कृती असं आपण म्हणू. एखादी वाईट किंवा चुकीची सवय म्हणजे नक्की काय? नको त्या पद्धतीनं मेंदूत घडलेले न्यूरॉन्सचे कनेक्शन. सवय लागत असतानाच ही वाईट सवय आहे हे लक्षात आलं असतं तर कनेक्शन झालंच नसतं. म्हणजे ही कनेक्शन्स होणं हे आपल्याच हातात होतं.
एखादी चांगली सवय म्हणजे योग्य पद्धतीनं घडलेले न्यूरॉन्सचं कनेक्शन. चांगल्या सवयींची कनेक्शन्स होऊन मेंदूत योग्य वायिरग होणं, आहे त्या वायिरगचं हार्डवायिरग होणं ही चांगली गोष्ट आहे. पण हे हार्डवायिरग वाईट सवयींचंही होतं, हे लक्षात घ्यायला हवं.
सवयी या चांगल्या असतात तशा वाईटही असतात. जशा त्या आपल्याला असतात, तशा दुसऱ्याच्याही असतात. पण ‘दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही’ असं म्हणतात. दुसऱ्याला त्याच्या वाईट सवयी सोडायला सांगणं हे अतिशय सोपं असतं, कारण तेवढं बोलून आपली जबाबदारी संपते. पण स्वत:ची सवय बदलणं, हे अवघड का वाटतं?
एखादी सवय वाईट आहे हे समजलं व पटलं, तरच ती सवय बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार. हे जितकं आवश्यक तितकंच चांगली सवय टिकवून ठेवणंही आवश्यक. वाईट सवय बदलणं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं झालेल्या न्यूरॉन जोडण्यांत बदल घडवून आणणं. हे फक्त आपणच करू शकतो. ते आपलं आपणच करायचं असतं.
काही वाईट सवयी लागलेल्या असतात. त्या बदलायच्या असतात. उदा. पसारा करणं, उशिरा उठणं, आळशीपणा करणं, जास्त विचार करणं, इतरांचाच विचार करणं, इत्यादी. हे बदलायचं असेल तर त्यासाठी स्वयंसूचना द्याव्या लागतील. त्या दिल्या की सवय मोडेल.
एखादं व्यसन सोडवायचं असेल, तर तज्ज्ञांची, घरच्या किंवा विश्वासातल्या माणसांची मदत घेऊन पायरीपायरीने व्यसनापासून मुक्त होणं हे कोणाला जमणार? ज्याला ते व्यसन लागलं आहे त्यालाच. व्यसनानं त्याला धरून ठेवलेलं नसतं, तर त्यानं व्यसनाला धरून ठेवलेलं असतं.
खरं तर नीट विचार केल्यास असं लक्षात येईल, की दुसऱ्या कोणात बदल घडवून आणण्यापेक्षा स्वत:ला सुधारणं हे सर्वात सोपं असतं. कारण आपापले न्यूरॉन्स हे आपल्याच हातात असतात!