जगातील पहिली यांत्रिक प्रवासी आगगाडी कार्यान्वित करण्याचे श्रेय ब्रिटिश अभियंता आणि अविष्कारक जॉर्ज स्टीव्हन्सन यांना दिले जाते. औद्योगिक क्रांती आणि शहरीकरण यांना त्यामुळे जोमाने चालना मिळाली.
१७८१ साली इंग्लंडमध्ये अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या जॉर्ज स्टीव्हन्सनना शालेय शिक्षण मिळू शकले नाही. बालवयातच त्यांना कोळसाखाणीत काम करावे लागले. मात्र शिक्षणाचे महत्त्व समजून वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी स्वशिक्षणास सुरुवात केली.
त्या काळी खाणीत अंतर्गत वाहतुकीसाठी जेम्स वॅट (१७३६-१८१९) यांनी शोधलेले वाफेवर चालणारे इंजिन वापरले जात असे. स्टीव्हन्सन यांनी त्यांच्या उपजत अभियांत्रिकी क्षमतेने १८११ मध्ये किलिन्ग्वर्थमधील खाणीत एक बिघडलेले बाष्पइंजिन दुरुस्त केले. त्या अनुभवावरून १८१४ मध्ये त्यांनी ‘ब्लचर’ नावाचे एक इंजिन तयार केले, जे एकूण ३० टन कोळसा भरलेले आठ डबे ताशी ६.४ किमी या वेगाने ओढू शकत होते.
त्या इंजिनमध्ये सातत्याने सुधारणा करूा तशी इंजिने त्यांनी अनेक खाणींना विकली, ज्यामुळे त्यांचे नाव पसरले. तरी १८२१ मध्ये एका निवेशकाला डाìलग्टन ते स्टॉक्टनदरम्यान यांत्रिक पद्धतीची प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवण्यास राजी केले. त्यासाठी स्टीव्हन्सननी ‘लोकोमोशन’ असे एक नवे इंजिन निर्माण केले. त्याच्या साहाय्याने २७ सप्टेंबर १८२५ रोजी ‘द एक्सपेरिमेंट’ नावाचा एक आसनस्थ प्रवासी डबा आणि ८० टन माल भरलेल्या गाडीचा तो १५ कि.मी. अंतराचा प्रवास दोन तासांत पूर्ण करून त्यांनी इतिहास घडवला. पुढे न्यू कॅसल येथे कारखाना टाकून त्यांनी १८३० मध्ये ‘रॉकेट’ नावाच्या ताशी ५७.६ किमी या वेगाने धावणाऱ्या बाष्पइंजिनाच्या मदतीने लिवरपूल-मँचेस्टर मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू केली. त्यासाठी स्टीव्हन्सननी स्टॅण्डर्ड गेज लोहमार्ग (१.४३५ मीटर) वापरला, जो आजही अनेक ठिकाणी वापरात आहे.
स्टीव्हन्सनच्या नावाने शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे संग्रहालये स्थापन झाली आहेत. २८ ऑक्टोबर २००५ रोजी चेस्टरफिल्ड या रेल्वे स्थानकावर त्यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
प्रतिकूल स्थितीवर मात करीत स्टीव्हन्सन यांनी अथक परिश्रम घेऊन रेल्वे तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत कार्य करून आपला अमोल ठसा उमटवला ही बाब खरोखरच अनुकरणीय आहे.
– डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
अमृता प्रीतम यांचे साहित्य..
अमृता प्रीतम यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. २८ कादंबऱ्या, २९ कवितासंग्रह, १५ कथासंग्रह, ‘रसिदी टिकट’ हे आत्मचरित्र आणि २३ इतर गद्य लेखन लिहिणाऱ्या अमृताजी एक महत्त्वाच्या पंजाबी लेखिका आहे. त्यांनी हिंदी, उर्दूतूनही लिहिले. त्यांच्या कादंबऱ्या, कवितांचे मराठीसह हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, सिंधी, बंगाली, मल्याळम आणि इंग्रजी अशा अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. खऱ्या अर्थाने भारतभर वाचकांपर्यंत पोहोचलेल्या त्या भारतीय लेखिका आहेत. भारत-पाकिस्तानातील पंजाबी साहित्य आंदोलनातील त्या एक महत्त्वाचा दुवा आहेत.
त्यांच्या ‘कागज ते कॅन्व्हास’ (मराठी अनुवाद- सुशील पगारिया) काव्यसंग्रहासाठी १९८१ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पण तोही सहजपणे नाही. अगदी पंजाबी साहित्य समितीनेही त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळू नये म्हणून राजकारण केलं होतं. प्रस्थापित समाजाची चौकट ओलांडून, प्रवाहाविरुद्ध पोहत वादळी आयुष्य जगणाऱ्या अमृताजींनी सतत अपेक्षा धरली ती निर्भेळ प्रेमाची. ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या संवेदनशील मनाला जे सत्य उमगलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं. त्या अखंड लिहीत राहिल्या. ‘लिहिणं म्हणजेच तिच जगणं, तिच्यासाठी जीवनच लिहितं..’असे अमृताजींबद्दल पती इमरोज यांनी म्हटले आहे.
अमृता प्रीतम यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ठंडियाँ किरण’ हा त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी १९३५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘अमृता लहरी’, ‘जिओन्दा जीवन’, ‘कस्तुरी’, ‘नागमणी’, ‘कागज ते कॅन्व्हास’, ‘पत्थर गीत’, ‘लाल धागे दा रिश्ता’ असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
त्यांच्या सुरुवातीच्या काव्यसंग्रहातील कवितांवर घरेलू, परंपरावादी प्रभाव दिसतो. पंजाबी लोकजीवन, संस्कृती चित्रण करणाऱ्या अशाच या कविता आहेत. नंतरच्या कवितात स्त्रीवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यानंतर फाळणीमुळे स्त्रीला भोगाव्या लागलेल्या बलात्काराच्या यातना, सर्वस्व उद्ध्वस्त झालेली परिस्थिती, मूत्यूचे दर्शन, दु:ख, विरह इ. चे भावपूर्ण पण उपरोधिक दर्शन त्यांच्या अनेक कवितांतून घडते. आपल्या कविता लेखनाविषयी, निर्मितीविषयी त्या कवितेत म्हणतात-
‘एक दर्द था,जो सिगरेट की तरह मैंने चुपचाप पिया
सिर्फ कुछ नज्में है,
जो सिगरेट से मैंने राख की तरह झाडी..’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com