पूर्वीची कौलारू घरे घ्या किंवा आताच्या आरसीसीचा वापर करून उभारलेल्या नवीन इमारती घ्या. सर्व भिंतींना गिलावा (प्लास्टर) दिला तरी रंग देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी फक्त चुना वापरून रंगसफेदी केली जायची. ती ठरावीक काळाने पुन:पुन्हा करावी लागे. जसजशा मानवाच्या इतर गरजा बदलत गेल्या तसतशा घरांच्या भिंतीही बदलल्या आणि त्यांच्या गरजाही बदलल्या. हवामान बदलाला तोंड देणे, वापरामुळे होणारा परिणाम म्हणून िभती खराब होणे आणि आता भिंतीच्या आतील सळ्या गंजतात त्याला प्रतिबंध करणे या उद्देशाने रंगाचा वापर केला जातो.
भिंतीला रंग लावण्यापूर्वी भिंत पूर्ण वाळलेली असली पाहिजे. तसेच त्यावर असलेली धूळही साफ केली पाहिजे. नाही तर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि रंग एकसारखा बसत नाही. भिंत वाळल्यावर रंग देणे आणि सँडपेपरने घासून त्यावरील धूळ काढून टाकणे या दोन्ही गोष्टी पूर्वतयारी म्हणून करायला हव्यात. याचबरोबर भिंतीला रंग लावण्यापूर्वी त्यावरील खड्डे, भोके बुजवणे, भेगा असतील तर त्या बुजवणे असे सर्व करणे गरजेचे आहे. याकरिता आता रंगापूर्वी लावण्यासाठी पुट्टी बाजारात उपलब्ध आहे. भिंतीचा पृष्ठभाग एकसारखा व गुळगुळीत असेल तर रंग सर्वदूर एकसारखा लावता येतो, हे लक्षात ठेवायला हवे.  
आतील भिंतीला लावल्या जाणाऱ्या रंगात काही रंग पाण्यात मिसळले जातात, तर काही तेल किंवा अन्य माध्यमांत मिसळले जातात. पाण्यात मिसळून लावल्या जाणाऱ्या रंगात डिस्टेम्पर या स्वरूपात मिळणाऱ्या रंगाचा समावेश होतो. त्यात ऑइलबाऊण्ड डिस्टेम्पर आणि अ‍ॅक्रिलिक डिस्टेम्पर असे प्रकार आहेत. यांपकी अ‍ॅक्रिलिक डिस्टेम्पर अधिक टिकाऊ आणि एकसारखा लागणारा रंग आहे, तर अ‍ॅक्रिलिक इमल्शन प्रकारच्या रंगाने भिंत रंगवली तर ती गुळगुळीत होते. या रंगाला डाग पडले तरी भिंत धुऊन ते काढता येतात. पाण्याखेरीज इतर द्रावकाचा वापर करून जे रंग उपलब्ध आहेत ते रंग लावल्यावर, भिंतीला एक प्रकारचे तेज प्राप्त होते आणि पृष्ठभागाला गुळगुळीतपणा प्राप्त होतो, यामुळे धुळीचे कण या िभतीवर अगदी कमी प्रमाणात चिकटतात.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – आधी कळस मग पाया
मानस, मला तुझ्याकडून एक फ्रँक उत्तर हवंय. प्रामाणिकपणे सांग, ‘मला माझं वागणं बदलायचंय, सुधारायचंय, असं म्हणतोस, प्रत्यक्ष किती बदललास? नुस्ता  वाचाळवीर आहेस. नशीब मी तुला थापाडय़ा म्हणत नाही. बाकी नुस्त्या बाता, मारतोस. हे बघ, तुला थोबाडीत मारल्यासारखं बोलत्येस, त्याबद्दल सॉरीबिरी म्हणत नाहीये. मला जाणून घ्यायचंय, तू असले घोळ का घालतेस? एकदा ठरवून टाक की मी आहे अस्साच राहाणार आहे!! मानसी उसळून मानसचा कान पकडून म्हणाली. ‘अग, हो हो! अशी अंगावर का येत्येस? मी हो म्हणजे, नाही म्हणजे हो म्हणजे बदलणारच आहे, तू आधी शांत हो पाहू! मी म्हणजे बदलणारच आहे गं!’’ मानसचा कान घट्ट धरून मानसी म्हणाली- मला खरं सांग, तुला स्वत:मध्ये होकारात्मक बदल करायला, परिवर्तन करायला इतका वेळ का लागतोय?
माझा कान सोड आधी, माझ्याकडे स्पष्टीकरण आहे. हे बघ माझं अंतर्मन बदलेल, माझ्यात आत्मविश्वास निर्माण होईल. मग माझ्यात बदल घडून येईल. मी आतून जेव्हा आमूलाग्र बदलेन तेव्हा आपोआपच माझं वागणं, बोलणं सगळ्यातच परिवर्तन झालेलं तुला दिसेल. तू जरा थांब, मला अंतर्मनात बदल करू मग बालमनात त्यानंतर माझं वर्तन बदलेल!!-  मानस म्हणाला.
मानस, हा सगळा अंतर्मनातला बदल कधी घडणारे, त्याला किती वेळ लागेल? म्हणजे तुला कसं कळेल की आपलं अंतर्मन बदलंलय? त्याची चाहूल तुला कशी लागेल? मानसीनं विचारलं. ‘मानसी, मला असे तिरकस प्रश्न विचारू नकोस. हळूहळू, पायरी पायरीने बदल घडतो.’ मानस म्हणाला. ‘त्याला वेळ लागणार ना!’ तो पुढे म्हणाला. मानस, तुझं म्हणणं खरंय पण ते अर्धसत्य आहे. तू आतून बदलशील, मग बाहेरून! हे तर्काला पटणारं आहे. पण अशा बदलाची वाट बघत बसावं लागतं. मानस, काही बदल बाहेरून आत येतात, हे लक्षात आलेलं नाहीये का तुझ्या? हे बघ, मी तुला उदाहरण देते. लष्करामधील साध्या शिपायापासून उच्च अधिकाऱ्यांकडे पाहिलं तर काही गोष्टी सहज लक्षात येतात. त्यांचं ताठ उभं राहाणं, दमदार चालणं, त्यांच्या ठाम हालचाली, स्थिर नजर, बोलण्यामधला नेमकेपणा आणि अर्थात आत्मविश्वास!! हो की नाही? मानसीच्या या प्रश्नाला मानसनं होकारार्थी मान डोलावली. मला सांग, लष्करातल्या प्रत्येक सैनिक आणि अधिकाऱ्याला घडवताना ते बाहेरून आत ही व्यक्तित्वविकास पद्धती उपयोगात आणतात. तुला काय वाटतं सव्‍‌र्हिसमधल्या माणसांना, तुम्ही आतून बदला, अंतर्मन अधिक होकारात्मक करा, होकारात्मक विचारांची जोपासना करा, मग आम्ही तुम्हाला उभं कसं राहायचं? चालायचं कसं? बोलायचं कसं? हे शिकवू.’
मानसला हसू फुटलं. ‘येडपट आहेस का तू मानसी? असं केलं असतं तर एकही सैनिक घडला नसता, सगळे आतून बदलायची वाट पाहात बसले असते!’ मानस, मी नाही तू येडपट आहेस. आपण आत्मविश्वासानं वागू लागलो, बोलू लागलो की आपोआप आतला आत्मविश्वास वाढतो, हे नवं मानसशास्त्र आहे. (खरं म्हणजे जुना विचार/सिद्धान्त पुढे आलाय) त्यानुसार, आतल्या बदलाची वाट पाहायची नाही. वागणं, बोलणं, वावरणं यामधली सफाई नि कौशल्य शिकून घ्यायचं की आपोआप आपल्या मनात होकारात्मक बदल घडतो. हे बघ आपण खूप वेळा ‘आधी कळस, मग पाया’ असं म्हणतो. ते फक्त आध्यात्मिक अर्थानं खरं नव्हे, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हा विचार समजून ताबडतोब त्या दिशेनं पावलं उचला! तेव्हा मानस, तुझ्या आत्मविकासाचे पहिलं पाऊल आज, आत्ता, नि इथेच उचल!
‘येस्सर!’ मानसीला सॅल्यूट ठोकून मानस म्हणाला. दोघेही हसले!!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

 प्रबोधन पर्व – मानसिक गुलामगिरीपासून दूर
‘‘माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो.. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते.. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो, त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते.’’  नरेंद्र दाभोलकर ‘समता-संगर’ (जून २०१४) या पुस्तकातील या लेखात तथाकथित बाबांच्या चमत्काराविषयी लिहितात – ‘‘कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे; पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या हे प्रेमस्वरूप क्षणाक्षणाला उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते? बाबांना भक्तांनी शरण यावे, असे अघोषित फर्मान असते. त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबांचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नैतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही.. स्वत:चे व समाजाचे प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यत सुटू शकतात याचे भान व्यक्तीला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद देतो. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलैयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे.’’

Story img Loader