पूर्वीची कौलारू घरे घ्या किंवा आताच्या आरसीसीचा वापर करून उभारलेल्या नवीन इमारती घ्या. सर्व भिंतींना गिलावा (प्लास्टर) दिला तरी रंग देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी फक्त चुना वापरून रंगसफेदी केली जायची. ती ठरावीक काळाने पुन:पुन्हा करावी लागे. जसजशा मानवाच्या इतर गरजा बदलत गेल्या तसतशा घरांच्या भिंतीही बदलल्या आणि त्यांच्या गरजाही बदलल्या. हवामान बदलाला तोंड देणे, वापरामुळे होणारा परिणाम म्हणून िभती खराब होणे आणि आता भिंतीच्या आतील सळ्या गंजतात त्याला प्रतिबंध करणे या उद्देशाने रंगाचा वापर केला जातो.
भिंतीला रंग लावण्यापूर्वी भिंत पूर्ण वाळलेली असली पाहिजे. तसेच त्यावर असलेली धूळही साफ केली पाहिजे. नाही तर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि रंग एकसारखा बसत नाही. भिंत वाळल्यावर रंग देणे आणि सँडपेपरने घासून त्यावरील धूळ काढून टाकणे या दोन्ही गोष्टी पूर्वतयारी म्हणून करायला हव्यात. याचबरोबर भिंतीला रंग लावण्यापूर्वी त्यावरील खड्डे, भोके बुजवणे, भेगा असतील तर त्या बुजवणे असे सर्व करणे गरजेचे आहे. याकरिता आता रंगापूर्वी लावण्यासाठी पुट्टी बाजारात उपलब्ध आहे. भिंतीचा पृष्ठभाग एकसारखा व गुळगुळीत असेल तर रंग सर्वदूर एकसारखा लावता येतो, हे लक्षात ठेवायला हवे.
आतील भिंतीला लावल्या जाणाऱ्या रंगात काही रंग पाण्यात मिसळले जातात, तर काही तेल किंवा अन्य माध्यमांत मिसळले जातात. पाण्यात मिसळून लावल्या जाणाऱ्या रंगात डिस्टेम्पर या स्वरूपात मिळणाऱ्या रंगाचा समावेश होतो. त्यात ऑइलबाऊण्ड डिस्टेम्पर आणि अॅक्रिलिक डिस्टेम्पर असे प्रकार आहेत. यांपकी अॅक्रिलिक डिस्टेम्पर अधिक टिकाऊ आणि एकसारखा लागणारा रंग आहे, तर अॅक्रिलिक इमल्शन प्रकारच्या रंगाने भिंत रंगवली तर ती गुळगुळीत होते. या रंगाला डाग पडले तरी भिंत धुऊन ते काढता येतात. पाण्याखेरीज इतर द्रावकाचा वापर करून जे रंग उपलब्ध आहेत ते रंग लावल्यावर, भिंतीला एक प्रकारचे तेज प्राप्त होते आणि पृष्ठभागाला गुळगुळीतपणा प्राप्त होतो, यामुळे धुळीचे कण या िभतीवर अगदी कमी प्रमाणात चिकटतात.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा