सी. टी. स्कॅन
सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन) या तंत्रज्ञानाचा उपयोग शरीराची चिरफाड न करता क्ष-किरणांच्या साहाय्याने आतील अवयव किंवा विशिष्ट भाग किंवा ऊती इत्यादींची प्रतिमा घेण्यासाठी केला जातो. एकाच भागाच्या वेगवेगळ्या कोनातून अनेक प्रतिमा घेतल्या जातात, ज्याचा उपयोग अचूक रोगनिदान करण्याकरिता होतो.
या चाचणीकरिता विशिष्ट रसायनांचा, ज्याला ‘डाय’ म्हणतात, त्यांचा वापर करतात. हे कोणतेही रंगद्रव्य नसते. ही रसायने ज्या भागात असतील, त्या भागात क्ष-किरण आरपार जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रक्तवाहिन्या, एखादा अवयव किंवा ऊती या भागांची प्रतिमा वेगळीच दिसते. आतील भागात निर्माण झालेली असाधारण स्थिती (रोगाच्या दृष्टीने) साधारण स्थितीपेक्षा वेगळी दिसण्यास या रसायनांचा उपयोग होतो. या रसायनांना ‘कॉन्ट्रास्ट एजंट’ही म्हणतात. यांच्यामुळे झालेला बदल हा तात्पुरता असतो.
हा ‘डाय’ शरीरात तीन प्रकारे देता येतो- तोंडावाटे, गुदद्वारावाटे (एनिमाच्या साहाय्याने) किंवा रक्तवाहिनीत (शीर किंवा रोहिणी) टोचून. शरीरात हा पदार्थ शोषला जातो आणि नंतर मलमूत्राद्वारे बाहेर टाकला जातो. कोणत्या भागाचा सीटी स्कॅन करावयाचा आहे, त्याप्रमाणे डायची निवड केली जाते.
आयोडीनयुक्त रसायन रक्तवाहिन्यांत, पाठीच्या कण्याच्या पोकळीत किंवा शरीरातील इतर पोकळीत इंजेक्शनच्या साहाय्याने टोचले जाते. तर, बेरिअम सल्फेट तोंडावाटे किंवा गुदद्वारावाटे दिले जाते. मुख्यत्वे अन्ननलिका, जठर, लहान व मोठे आतडे यांच्या प्रतिमा घेण्याकरिता तोंडावाटे दिले जाते, तर गुदाशयाच्या आधीचा मोठय़ा  आतडय़ाचा व गुदद्वारापर्यंतचा भाग तपासण्याकरिता गुदद्वारावाटे दिले जाते. काही वेळा बेरिअम सल्फेटबरोबर हवाही वापरली जाते, तेव्हा त्याला डबल कॉन्ट्रास्ट बेरिअम एनिमा म्हणतात. नुसती हवा ही कॉन्ट्रास्ट मीडिअम म्हणून वापरली जाते. विशेषत: सांध्याच्या पोकळीत हवा टोचण्यात येते, यामुळे हाडांवर आच्छादलेली कुर्चा सदृश्य होण्यास मदत होते.
म्हणजे थोडक्यात, सीटी स्कॅन करताना दिलेला डाय जरी रसायन असले तरी त्याची कोणतीही प्रक्रिया शरीराबरोबर होत नाही. फक्त जे रोगी मेटफॉर्मिन हे डायबेटीसवरील औषध घेत असतील, तर ते सीटी स्कॅनपूर्वी ४८ तास थांबविणे आवश्यक असते. तसेच, मूत्रिपडाचे कार्य पूर्ववत होईपर्यंत ते घेता येत नाही.
डॉ. नंदा सं. हरम (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
महाराष्ट्राला झालेली पढतमूर्खपणाची बाधा
‘पेशवाई कोसळल्यानंतर आरंभीचीं पन्नास र्वषे, राष्ट्राच्या पुनर्घटनेची दिशा महाराष्ट्रांत योग्य तीच होती.. नुसत्या स्वाभिमानावर उभारलेलें राजकारण पोकळ आणि बिनबुडाचें असतें हें त्या पिढीला कळून चुकलें होतें. पण त्यानंतर इंग्रजी शिकलेल्या नूतन पदवीधरांची जी पिढी पुढें आली ती पेशवाईची भीतिप्रद आठवण विसरलेली होती. मिल्मेकॉले आणि स्पेन्सर्जॉन्सन् यांचे ग्रंथ पढलेल्या या पिढीला इंग्रजांचें वैशिष्टय़ कशांत आहे या गोष्टीचें विस्मरण झालें.. सभा, सम्मेलनें, लेख-व्याख्यानें यांचा हलकल्लोळ उडवून दिला म्हणजे इंग्रज पळून जातील असें त्यांच्या बुद्धीला वाटत होतें कीं काय नकळे! तोफाविमानें व मोटारआगगाडय़ा राहोत, पण साध्या सुयाटाचण्या वा चाकूचमचे सुद्धां ज्यांना करतां येत नाहींत त्यांनीं स्वराजाच्या बाता झोंकणें किती शहाणपणाचें आहे याबद्दलचा त्या पिढीचा अविचार तिची तर्कशून्यता स्पष्ट दाखवितो.’’ त्र्यं. शं. शेजवलकर यांनी  ‘शेजवलकरांचे लेख (पुस्तक १ लें, १९४०)’ या पुस्तकात महाराष्ट्राची अतिशय परखड चिकित्सा केली आहे. ते पुढे म्हणतात – ‘‘हिंदुस्थानांतील इतर प्रांतांपेक्षां वर सांगितलेल्या पढतमूर्खपणाची बाधा महाराष्ट्राला अधिक झाली. कारण पेशवाईपासून महाराष्ट्रांत ब्राह्मणांचें जें अवास्तव प्राबल्य झालें होतें तें इंग्रजी राजवटींत प्रथम इंग्रजी शिकल्यामुळें तसेंच टिकलें होतें..  लेखनकलेच्या व छापखान्याच्या वाढीचा दुरुपयोग त्यांनीं हा पढतमूर्खपणा वाढविण्यांतच केला. काल्पनिक इतिहासाचें बंड महाराष्ट्रांत फार मोठय़ा प्रमाणावर फैलावलें. शुद्ध करमणूक व खोटें समाधान येवढाच असल्या लेखनाचा उद्देश असता तर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नसता, पण स्वराज्यनाशामुळें ज्यांच्या शहाणपणाचा व मुत्सद्देगिरीचा भ्रम पार उतरलेला होता त्यांना पुन: या खोटय़ा इतिहासानें झपाटलें. ब्राह्मणांच्या खालोखाल या भुताचा झपाटा मराठय़ांस बाधला.. शाळाकॉलेजें, मासिकेंवर्तमानपत्रें, चित्रशाळा -किताबखाने, असले पोटभरण्याचे उद्योग सुरू करून पुन: त्यांना देशसेवा म्हणण्याचा जो प्रकार महाराष्ट्रांत रूढ झाला त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्राला चांगलाच बाधला..’’

मनमोराचा पिसारा
बॉक्स मोठी करू..
अधूनमधून तुझी आठवण आली की, तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं. बोलायला वेळ मिळत नाही वगैरे काही नाही. स्वत:शी गप्पा मारायला वेळ काढता येत नसेल तर नक्कीच काही तरी गडबड असणार. म्हणजे कोणत्या तरी विषयावर, मी स्वत:ला कन्फ्रंट करायला तयार नाहीये असा त्याचा अर्थ होतो. स्वत:पासून पळून जाण्याला काही तरी कारण लागतं ना! स्वत:पासनं पळून गेलं की, आपलाच कम्फर्ट झोन तयार होतो. बघ, तू दिवसातून किती तरी वेळा ‘आय डोण्ट वाँट टु थिंक अबाऊट इट!’ असं म्हणतोसच ना.
मला वाटतं, तू स्वत:ला एका चाकोरीत अडकवून टाकलं आहेस. आयुष्यात सगळं कसं अचूक अटकळ बांधण्यासारखं, प्रेडिक्टेबल असलं पाहिजे असं तुला ठामपणे वाटतं. म्हणून दर रविवारी मिळेल त्या पेपरात स्वत:चं राशिभविष्य वाचतोस. जमल्यास कोणाला तरी पत्रिका दाखवतोस. ‘पुढे सगळं आलबेल असणार आहे!’ असं कोणी म्हटलं की, तुझं धास्तावलेपण तात्पुरतं संपतं. तुझा पत्रिकेवर विश्वास असो की नसो, मनाची समजूत काढायला, पत्रिका बऱ्या पडतात. कुंडलीतले ग्रह बघितलेस की, तुला सिक्युअर वाटतं. हादेखील तुझा सिक्युरिटी झोन आहे. त्यामुळे त्यामध्ये सुरक्षित वाटतं, तुझं आखीवरेखीव जीवन अधिक चाकोरीबद्ध होतं, असं नाही तुला वाटत?
बरं, अशी चाकोरी तुला घुसमटवून टाकत नाही का रे? ही चाकोरी अधिकाधिक अरुंद होते असं नाही तुला वाटत? इतकं कसं रे तुला कळत नाही? परवा, कोणी तरी म्हटलं, ‘म्हणे, आपण कधी आऊट ऑफ बॉक्स’ विचारच करत नाही.
मी म्हणतो, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयाला आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरजच काय? आपण राहावं आपलं बेस आपल्या बॉक्समध्ये! मी म्हटलंही त्याला तसं! त्यावर तो खांदे उडवून म्हणाला, काही लोकांना डबक्यात राहायला आवडतं! मला राग आला सणकन्, पण काही बोललो नाही. हळूच विचार आला मनात, ‘तो म्हणतो ते काही चूक नाहीये. कित्ती वेळा म्हणतो आपण तेच तेच रूटीन, तेच तेच लाइफ, त्याच त्या सास-बहूच्या सीरियल, चकटफू विनोद! कंटाळा आलाय!!’
मग वाटलं ओके, समजा मला माझ्या बॉक्स (चौकट)च्या बाहेर येण्याचं डेअरिंग करता येत नसलं आणि त्या बॉक्सचा कंटाळा आला तर काय करायचं?
अॅण्ड यू नो, दॅट वॉज मोमेंट ऑफ ट्रथ. मला वाटलं, बॉक्सच्या बाहेर येता येत नसलं तर निदान बॉक्स तरी मोठी करावी! आपल्या बॉक्समध्ये स्वत:ला विस्तारण्याचा अवकाश निर्माण करावा. स्वत:च्या क्षमतांचा फेरविचार करावा. जगण्याला नवं डायमेन्शन देण्याची धडपड करावी. मस्त वाटलं. मग सरळ एक कोरा कागद घेतला आणि लिहून काढल्या सर्व गोष्टी, मला कराव्याशा वाटतात अशा! एकदम आठवण आली की, मला भाषा शिकायला आवडतात. लहानपणी भूगोल आवडायचा. मानसशास्त्राचा अभ्यास करावासा वाटायचा. एकदा रेसला जायचं होतं आणि बरंच काही. यादी वाढत गेली. हे सगळं सोडून मी चाकोरीत अडकलो आणि सुरक्षिततेच्या बॉक्समध्ये बंद करून टाकलं होतं.
आता त्याच बॉक्समध्ये माझा अवकाश रुंद करतोय. खूप जागा होईल आता.
गंमत सांगू, बॉक्स रुंद करता येते या विचारानीच माझी बॉक्स आता मोठी झालीय. टॉप वाटतंय. बोलू या रे आपण, नेहमी.
तुझा,मी.
डॉ.राजेंद्र बर्वे- drrajendrabarve@gmail.com

Story img Loader