चारुशीला सतीश जुईकर

कॅल्साइट हे पृथ्वीवर सर्वत्र आढळणारे एक खनिज असून त्याचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) आहे कॅल्शियम कार्बोनेट. या खनिजाचे एक खास वैशिष्ट्य आहे. याचा उत्कृष्ट दर्जाचा पारदर्शक स्फटिक घेऊन कागदावरच्या एखाद्या ठिपक्यावर ठेवला, तर वरून पाहिल्यानंतर एका ठिपक्याचे दोन ठिपके दिसतात. आणि तो स्फटिक स्वत:भोवती फिरवला तर त्यातला एक ठिपका स्थिर राहतो आणि दुसरा त्याच्या भोवती गोल फिरताना दिसतो.

याचा अर्थ ठिपक्यापासून प्रत्येक किरण निघतो, तेव्हा विभाजन होऊन एका किरणाचे दोन किरण होतात. जो ठिपका स्थिर राहतो, तो ज्या किरणामुळे दिसतो, त्याला ‘सामान्य किरण’ (ऑर्डिनरी रे) म्हणतात, तर ज्या किरणामुळे त्याच्या भोवती फिरणारा दुसरा ठिपका दिसतो, त्याला असामान्य किरण (एक्स्ट्रॉऑर्डिनरी रे) म्हणातात. एका किरणाचे असे दोन किरणांत विभाजन होण्याच्या या गुणधर्माला द्विप्रमणन (बायरेफ्रजिंन्स) म्हणतात. खरे तर असे द्विप्रमणन अनेक खनिजांच्या स्फटिकांत होत असते. पण कॅल्साइटमध्ये त्याचा परिणाम जितका स्पष्ट दिसतो, तितका तो इतर स्फटिकांमध्ये दिसत नाही. याचे कारण कॅल्साइटच्या स्फटिकांमधल्या रेणूंची त्रिमितीय रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे कॅल्साइटला हा खास प्रकाशीय गुणधर्म प्राप्त झाला आहे.

कॅल्साइटचे स्फटिक निर्माण होताना तिथली भौतिक आणि रासायनिक परिस्थिती कशी आहे, त्याला अनुसरून कॅल्साइटचे स्फटिक विविध प्रकारचे आकार धारण करतात. चपटे, लोलकासारखे, टोकेरी किंवा सुईसारखे लांबट, असे ते ३०० पेक्षाही जास्त विविध आकारांत आढळतात; त्यामुळे कॅल्साइटला सर्वात जास्त प्रकारच्या स्फटिक रचनांचे खनिज मानले जाते. त्यांच्या आकारावरून कॅल्साइटच्या काही प्रकारांना ‘अश्वदंत स्फटिक’ (डॉग टुथ स्पार), ‘नखशीर्ष स्फटिक’ (नेल हेड स्पार), अशी नावे दिली गेली आहेत. कॅल्साइटचे जे स्फटिक रंगहीन आणि परिपूर्णपणे पारदर्शक असतात, त्या स्फटिकांना आइसलँड स्फटिक (आइसलँड स्पार) म्हणतात. आत्तापर्यंत नोंदवलेला सर्वात मोठा कॅल्साइटचा स्फटिक आइसलँडमध्ये आढळला होता. तो जवळपास ६ मीटर लांब, ६ मीटर रुंद, आणि ३ मीटर जाड इतका मोठा होता आणि त्याचे वजन २५० टनांहून आधिक होते.

संगमरवर हा रूपांतरित खडक मुख्यत: कॅल्साइटच्या छोट्या छोट्या स्फटिकांचा मिळून बनलेला असतो. संगमरवरात अनेक जगप्रसिद्ध बांधकामे केलेली आहेत. तसेच संगमरवरात शिल्पकाम केलेलेही आढळते. कॅल्साइटचे आणि माणसाचे नाते किती प्राचीन आहे, हे यावरून दिसते.

– चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org