कोणतीही भौतिक एककं ही लांबी, वस्तुमान आणि काळ अशा मूलभूत भौतिक राशींच्या एककांनी बनावीत, हा जर्मन वैज्ञानिक कार्ल फ्रेडरिक गाउस यांचा आग्रह होता. म्हणजे आज जी एककांची एस. आय. पद्धत वापरात आहे, त्या पद्धतीचा विचार गाउस यांनी १८३० सालीच केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाउस यांचा जन्म ३० एप्रिल १७७७ रोजी ब्रुन्सविक इथे झाला. भौतिकशास्त्राच्या स्थितिक विद्युत आणि प्रकाश या शाखांमध्येसुद्धा गाउस यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं. विज्ञानाबरोबरच संख्याशास्त्र, सांख्यिकी, विश्लेषणात्मक गणित, भूमिती अशा वेगवेगळ्या शाखांमधून गाउस यांनी मूलभूत कार्य केलं. गणिताचा वापर करून त्यांनी खगोलशास्त्रीय समस्यांचीही उकल केली.

भूमापनशास्त्रातही गाउस यांनी मोलाचं संशोधन केलं. ‘हेलीट्रॉप’ नावाचं परावर्तित सूर्यकिरणांवर आधारित त्यांनी भूमापन प्रक्रिया सोपी करणारं उपकरण बनवलं. गाउस यांनी विल्यम वेबर यांच्या साहाय्याने अनेक चुंबकीय उपकरणंसुद्धा विकसित केली.

शास्त्रज्ञांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांचं नाव भौतिक राशीच्या एककाला दिलं जातं. उदाहरणार्थ, बलाचं ‘न्यूटन’ हे एकक सर आयझ्क न्यूटन यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या शास्त्रज्ञाने जर एखादा स्थिरांक, समीकरण, नियम इत्यादी मांडले तर त्याला त्या शास्त्रज्ञाच्या नावाने ओळखलं जातं. कार्ल फ्रेडरिक गाउस यांच्या नावाने ओळखले जाणारे स्थिरांक, समीकरण, नियम, गुणधर्म आणि भौतिक राशी यांची यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये गाउस प्रिन्सिपल, गाउस-ए पोजिशन, गाउस-बी पोजिशन, गाउस-बॉनेट थिअरम, गाउस-कोडाझी इक्वेशन, गाउस युनिट्स, गाउस एरर कर्व, गाउस हायपर जॉमेट्रिक इक्वेशन, गॉसियन कॉम्प्लेक्स इंटीजर्स, गॉसियन कॉन्स्टंट, गॉसियन कव्‍‌र्हेचर, गॉसियन कर्व, गॉसियन डिस्ट्रिब्युशन, गाउस लॉ ऑफ अ‍ॅरिथमेटिक मीन, गाउस-लेजेंडर रुल, गाउस लेन्स सिस्टीम, गाउस मीन व्हॅल्यू थिअरम, गाउस मीटर, गाउस प्रिन्सिपल ऑफ लिस्ट कॉन्स्टंट, गाउस – सिडल मेथड अशा अनेकांचा समावेश आहे.

विज्ञानातल्या अशा अनेक शाखांमधून भरीव संशोधन कार्य केलेल्या गाउस यांना मात्र स्वत:ला वैज्ञानिक म्हणवून घेण्यापेक्षा ‘गणिती’ म्हणवून घेण्यात अभिमान वाटायचा.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

गुजराती कवी उमाशंकर जोशी

१९६७ चा ज्ञानपीठ पुरस्कार, सुप्रसिद्ध गुजराती कवी उमाशंकर जोशी आणि कन्नड कवी कु. वें. पुटप्पा यांना विभागून देण्यात आला. १९३५ ते १९६० या कालावधीतील भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सृजनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्य निर्मितीबद्दल प्रदान करण्यात आला.

उमाशंकर जोशी यांच्या ‘निशिथ’ या काव्यसंग्रहासाठी १९६७ चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय घटनांचे, विशेषत: महायुद्धाने उत्पन्न झालेल्या मानसिक आंदोलनाचे प्रतिबिंब त्यांच्या या कवितेत उमटलेले दिसले.

उमाशंकर यांनी काव्य, कादंबरी, नाटक, कथा, निबंध, समीक्षा इ. विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. ‘वासुकी’ आणि ‘श्रवण’ या टोपणनावानेही त्यांनी काही लेखन केले आहे.

उमाशंकर यांचा जन्म २१ जुलै १९११ ला गुजरातमधील ईडर जिल्ह्य़ातील ‘बामणा’ या गावी झाला. डोंगरातून खळखळ वाहणाऱ्या छोटय़ाशा नदीच्या किनाऱ्यावरील या गावात त्यांचे बालपण गेले. इथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. या खेडय़ातील जीवन, सण, उत्सव, भवतालचा निसर्गरम्य परिसर या साऱ्यातून  त्यांना उत्स्फूर्तपणे लेखनाची प्रेरणा मिळाली.

१९२७ मध्ये ते मॅट्रीक होऊन अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये आले. १९३० मध्ये कॉलेज सोडून, उमाशंकर सत्याग्रहात सहभागी झाले, तेव्हा त्यांना अटक करून साबरमतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेव्हा रात्र-रात्र ते आकाशातील ताऱ्यांकडे मंत्रमुग्ध होऊन बघत असत. तेव्हाच त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा मिळाली. १९३१ मध्ये ‘विश्वशांती’ चे लेखन केले. दोन महायुद्धांच्या मधल्या कालखंडावर लिहिलेली ही ५०० ओळींची कविता, गांधीजीच्या संदेशाचा युवा-हृदयातून आलेला प्रतिध्वनीच आहे. शांतीची स्थापना केवळ अहिंसा-प्रेम यांद्वारेच होऊ शकते. हेच त्यांनी या कवितेतून मांडले आहे.  पुढे १९३४ मध्ये मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि इतिहास, अर्थशास्त्र हे विषय घेऊन ते बी. ए. झाले. पुढे मुंबई विद्यापीठातूनच गुजराती आणि संस्कृत विषय घेऊन, प्रथम क्रमांकाने ते एम.ए. उत्तीर्ण झाले. गुजरातीशिवाय त्यांना हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली, इंग्रजी या भाषाही चांगल्या अवगत  होत्या.  या भाषांतील साहित्याचा त्यांचा व्यासंगही मोठा होता.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carl friedrich gauss