कुतूहल
भाषा, प्रांत, देश जसे बदलत जातात तशी तिथे आढळणाऱ्या सजीवांची व्यावहारिक नावंसुद्धा बदलत जातात. एकाच सजीवाला जगभरातून वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात असेल तर त्याची ओळख पटण्यामध्ये अनेक समस्या येतील. सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचाही मोठा गोंधळ उडेल.
सजीवांच्या नामकरणाची ही समस्या कार्ल लीनियस या स्वीडिश शास्त्रज्ञाने कित्येक वर्षांपूर्वीच ओळखली आणि सजीवांना नाव देण्याची एक पद्धती त्याने विकसित केली. या पद्धतीमध्ये सजीवाचं नाव लिहिताना नेहमी दोन शब्दांचा वापर केला जात असल्याने या पद्धतीला ‘बायनॉमिअल नॉमेनक्लेचर’ किंवा ‘द्विनाम पद्धती’ म्हणतात. ‘स्पीशिज फ्लँटेरम’ या आपल्या पुस्तकामध्ये त्याने या पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्याकाळी विद्वान लोक लॅटिन भाषेमधून संवाद साधत असल्याने या पद्धतीमध्ये लॅटिन नावांचा वापर केल्याचं आढळतं. गंमत म्हणजे कार्ल लीनियसचं मूळ नाव कार्ल व्हॉन लिनी असं होतं. पण, नामकरणाच्या द्विनाम पद्वतीची सुरुवात त्याने स्वत:पासून केली आणि आपलं नाव ‘कार्ल व्हॉन लिनी’ ऐवजी ‘कार्ल लीनियस’ असं दोन शब्दांमध्ये लिहायला सुरुवात केली.
त्याच्या मृत्यूनंतर सुमारे १८० वर्षांनी, म्हणजे १९५६ साली आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत शास्त्रज्ञांनी सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती एकमताने स्वीकारली. या द्विनाम पद्धतीतल्या दोन शब्दांपकी पहिला शब्द त्या सजीवाची जात म्हणजे ‘जिनस’ तर दुसरा शब्द त्या सजीवाची प्रजाती दर्शवतो. नावातला पहिला शब्द म्हणजे त्या सजीवाचं नाव असतं तर दुसरा शब्द हे विशेषण असतं. हा दुसरा शब्द त्या सजीवाच्या प्रजातीचं वर्णन करणारा किंवा तो सजीव जिथे आढळतो, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देणारा असतो. उदा. आपल्याला परिचित असलेल्या आंब्याचं शास्त्रीय नाव ‘मँगिफेरा इंडिका’ असं आहे, तर आपलं म्हणजे माणसाचं शास्त्रीय नाव द्विनाम पद्धतीनुसार ‘होमो सेपियन’ असं आहे. नामकरण करण्याच्या या विशिष्ट पद्धतीमुळे जागतिक स्तरावर सजीवांची ओळख आणि त्यांचा अभ्यास यांच्यात सुसूत्रता आली आहे.
– प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-२२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा