पशुपालन व्यवसाय किफायतशीर व्हायला हवा असेल आणि गायी, म्हशींपासून स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल तर त्यांच्या तपासण्या रोजच्या रोज करणे आवश्यक आहे. पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन या दोन्ही दृष्टिकोनांतून या तपासण्या व्हायला हव्यात.
उत्पादन देणारे पशू जास्तीतजास्त निरोगी राहायला पाहिजेत. यासाठी पशूंचे मल (शेण, लेंडी, लीद इ.) तसेच मूत्राचा रंग, वास, मल-मूत्राचे प्रमाण, मल वा मूत्र विसर्जन करत असताना पशूची स्थिती, मल-मूत्रात कृमी व जंतू आढळतात का या बाबींचे पशुवैद्यकीय दृष्टिकोनातून निरीक्षण करावे लागते. पशूच्या डोळ्यातून, नाकातून, कानातून, योनिमार्गातून काही स्राव बाहेर येतात का, हे पाहावे लागते. दूध काढण्याअगोदर, गाय-म्हैस पान्हवताना, पूर्ण पान्हा सोडल्यावर प्रत्येक सडातून येणारे दूध कणविरहित असावे लागते. तसे नसल्यास कासेचा सुप्त आजार असू शकतो. त्याचा पशूच्या तब्येतीवर, गर्भाशयावर, कासेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
पशुसंवर्धनाच्या दृष्टीने पाहता पशूंचे निवासस्थान असलेला गोठा स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे. त्यांचे पिण्याचे पाणी साठवतात ती जागाही स्वच्छ असावी. पाण्यात शेवाळ असू नये. पशूला खाण्यासाठी दिलेला चारा किती उरला आहे, यावरून पशूंनी व्यवस्थित खाल्ले आहे का, हे कळते. गाय-म्हैस माजावर आले आहेत का, याची योग्य काळात दिवसातून चार वेळा तपासणी होणे अत्यावश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी तर हे जास्त महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेता येते. त्या गाभण राहण्याचे प्रमाण जास्तीतजास्त राहते.
पशूंच्या अंगावर बाह्य कीटक बसले आहेत का, याचे निरीक्षण करणेही आवश्यक आहे. त्यांच्या कोणत्याही भागावर माश्या घोंघावताना दिसल्या तर तेथे जखम असण्याची शक्यता असते. लहानशी पू झालेली किंवा केसांत सहजी न दिसणारी जखमही माश्या शोधून काढतात.
याशिवाय पशूची चाल, तोंडातून गळणारी लाळ, पशूंचे दूध काढण्याचे यंत्र यांची सतत तपासणी करणे आवश्यक असते. या तपासण्या दररोज वेळोवेळी केल्या तर पशुपालन व्यवसाय निश्चितच जास्त फायदेशीर ठरतो.
जे देखे रवी..- कर्माची लवलव
शरीरात काहीतरी नेहमी शिजत असते. त्याला धगधग म्हणतात. मरण जवळ आले की, अजून थोडी धुगधुगी आहे, असे म्हणतात. कारण धगधग कमी असते. एका विशिष्ट तापमानाखाली सजीव आणि निर्जीव गोष्टीतली हालचाल किंवा धगधग संपूर्ण थांबते आणि विज्ञानाचे नेहमीचे नियम लागत नाहीत. चैतन्याच्या उष्णता नावाच्या प्रकाराने हे विश्व स्पंदन पावते. निर्जीव गोष्टीतही मूलकणांचे भ्रमण असते. तेही याच चैतन्याच्या जोरावर. माझे भ्रमण मला बंद करायचे आहे, असा भ्रम जेव्हा अर्जुनाला होतो तेव्हा त्याला गीता आणि ज्ञानेश्वरी म्हणतात.
शरीराने कसे थबकावे? डोळ्यांनी बघणे थांबवावे?
कानाने ऐकणे करावे बंद? श्वासोच्छवास होईल कसा थंड?
भूक आणि तहानेने जावे कुठे? पायांनी केवळ राहावे उभे?
येत राहणार विचारांच्या लाटा। स्वप्नांच्याही उमटणारच पाऊल वाटा।
या धगधगीला काय मार्गाने कामी लावायचे असा प्रश्न आहे. काही गोष्टी आपण नेहमीच करतो. उदा. अंघोळ. अंघोळ या शब्दात अंग ओले करणे असा अर्थ आहे. अंग ओले करण्याने बरे नक्कीच वाटते, पण मनाचे काय? पाच-दहा मिनिटे उल्हसित वाटते, मग परत विचारचक्र सुरू होते. माझ्या अगदी जवळच्या नात्यात एक गृहस्थ आहेत. पंचाहत्तर ते ऐंशी असतील. त्यांची दररोज दोन तास पूजा चालते. एका स्वामीचे हे भक्त आहेत. पूजा साग्रसंगीत. बहुतेक सगळी सामग्री घेऊन बसतात. निरनिराळी व्रते आणि तिथ्या असतात. बायको त्याच वयाची. ती दक्ष असते. कोठे काही लागले तर देते. संकष्टी, उपवास सगळे व्यवस्थित चालते. हे संध्याकाळी मठात जातात. पाऊस, ऊन, ऋतू कोठलाही असो हे जाणारच. बायको दर शुक्रवारी संध्याकाळी पाच मैत्रिणींना बोलावते आणि हळदीकुंकू करते आणि मसाल्याचे दूध मोठय़ा प्रेमाने देते. मग उद्याची तिथी काय हे बघत त्याच्या तयारीला लागते. यांच्यावर घनघोर संकटे आली, पण या कर्माच्या आविष्कारावर त्यांनी ती पेलली. याला आपल्यात नित्यकर्म म्हटले आहे. मला त्याचे मनापासून कौतुक वाटते. आणखी एक ओळखीचे कुटुंब आहे. हे कुटुंब कोठल्याही समारंभाचे, लग्नाचे, वाढदिवसाचे, कार्यक्रमाचे, मृत्युसभेचे किंवा श्राद्धाचे निमंत्रण आले तर कटाक्षाने हजर असतात. त्यांचे त्यासाठीचे समयोचित कपडेही दोन दिवस आधी तयार आणि कार्यक्रमात जेवण असेल तर घरातील चूल बंद. ही जी वरची कर्मे सांगितली त्याला आपल्यात नैमित्तिक कर्मे म्हणतात. ही करावीत आणि समाजाने त्यात सहभागी व्हावे, अशी कल्पना आहे. याने एकांडेपणा कमी होतो आणि मन विसावते. आधुनिक जगात या कर्मासाठी वेळच कुठे उरला आहे? माणसे उपभोगाच्या मागे धावत सुटली आहेत त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – वातविकार : भाग १
मलमूत्रादि वेग अडविणे किंवा बळेच करणे, यामुळे बहुधा सर्व रोग होतात. कफ पंगू आहे. पित्त पंगू आहे. मलमूत्र व धातूही पंगू आहेत. त्यांना वायूच शरीरात फिरवून रोग निर्माण करतो, असे शास्त्रवचन आहे. सुश्रुताचार्यानी वाताचे, वाताच्या स्वरूपाचे वर्णन; अव्यक्त असूनही सर्वव्यापी; रुक्ष, शीत, लघु, स्पर्श खर, तिर्थक गती असलेले, रजोगुण प्रबल, अचिंत्यशक्ती असलेले सांगितले आहे. शरीरातील स्पर्शाचे ज्ञान वायूमुळेच होते. सर्व दोष धातू मलादिकांची प्रेरकशक्ती, रोगांचा अधिपती वायूच आहे. एवढे असूनही वायू अनाकलनीय आहे, असे याचे वैशिष्टय़ आहे.
वातविकारांचा विचार करताना वातप्रकृतीचा अभ्यास हवा. या व्यक्तीचे खाणे, पिणे, धैर्य, स्मरण, बुद्धी, मैत्री, दृष्टी, गती व कृती अस्थिर असते. त्यांची भूक, बल, आयुष्य व झोप कमी असते. त्यांच्या एकूण आयुष्याबद्दल सांगणे अवघडच आहे.
महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पंचकर्म रुग्णालयाचे पहिले प्रवशित रुग्ण हे नूतन मराठी विद्यालयातील एक चित्रकला शिक्षक होते. विकार अर्धागवात ‘वातस्योपक्रम: स्नेह: स्वेद: संशोधनं मृदु: !’ याप्रमाणे त्यांच्याकरिता सर्व उपचार नेटाने केले. आमचे सहाध्यायी वैद्य चिं. ना. साठे सर्व काळजी घेत असत. पंधरा दिवसात शिक्षक चालावयास लागले. दोन महिन्यांनी शाळेत जावू लागले. कडक पथ्यपाणी पाळावयास सांगितले. त्यांच्या सौंच्या मते त्यांनी काहीच पथ्य पाळले नाही. त्यांना मधुमेह हे अर्धागाचे मूळ कारण होते. औषधेही बंद केलेली. पुन्हा वर्षभराने दुसरा आघात आला. त्यानंतर ते कधीच सावरले नाहीत. वातविकारात रुग्णाने लटपट करून चालतच नाही. रुग्ण, सहायक, औषधे व वैद्य या चतुष्पादांचे एकत्रित चांगले सहकार्य असेल तर वातविकारावर चांगली मात होते. प्रथम प्रवेशित रुग्ण व त्यांना आणणारे मित्रवर्य वै. चिं. ना. साठे यांना अभिवादन. या लेखमालेत धातुक्षय, उदरवात, अंगमर्द, मानेचे विकार कंपवात, अर्दित, वातकंटक, मुंग्या येणे या वातविकारांचा मागोवा घेत आहेत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २१ जून
१९२२ > ‘ग्रंथालयीन सूचिलेखन’, ‘ग्रंथालयीन वर्गीकरण’, ‘ग्रंथपालनाचे आप्त’ (व्यक्तिचित्रे), ‘मराठी ललित वाङ्मयाचे वर्गीकरण’ आदी पुस्तके लिहिणारे/ भाषांतरित करणारे ग्रंथालय चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचा जन्म.
१९२३ > कवी, कथाकार व अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म. आधुनिक मराठी कविता समृद्ध करणाऱ्या सदानंद रेग्यांनी आजच्या जगाशी सार्वकालिक ‘मी’चा विसंवाद आणि कालातीत मानवी विकार-वासना यांच्यावर बोट ठेवले. ‘अक्षरवेल’, ‘गंधर्व’, ‘वेडय़ा कविता’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर ‘काळोखाची पिसे’, ‘मासा आणि इतर विलक्षण कथा’ हे कथासंग्रह यांसह त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
१९२८ > कादंबरीकार नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे यांचे निधन. ‘वीरधवल’ सह २४ सामाजिक व १२ ऐतिहासिक कादंबऱ्या, १० नाटके, एक प्रहसन, ‘रंगभूमी’ हा लेखसंग्रह, ‘बोधशतक रत्नाकर’ (पद्य) आदी साहित्य त्यांच्या नावावर आहेत.
२००६ > कथाकार, ललितलेखिका आणि स्वातंत्र्यसैनिक शांता बुद्धिसागर यांचे निधन.
– संजय वझरेकर