दूरचित्रवाणीच्या पडद्याला प्रकाशमान करते ती त्यामागे दडलेली ‘सीआरटी’ म्हणजे कॅथोड रे टय़ूब! आणि त्यासाठी ‘सीआरटी’मध्ये फोस्फोर म्हणजे दीप्तिमान होणारं एक रसायन असतं! बऱ्याच वेळा हे रसायन म्हणजे ‘सीरिया’ म्हणजे सीरिअम ऑक्साइड हे सीरिअमचं संयुग असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीरिया या संयुगाचा आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा उपयोग हा भिंगाच्या क्षेत्रात! चष्मा किंवा प्रकाशाच्या संदर्भात होणाऱ्या प्रयोगांमध्ये भिंगांचा खूप वापर होतो. भिंग करताना लागणाऱ्या काचेमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असावे लागतात. अतिशय गुळगुळीत आणि स्वच्छ पृष्ठभाग, उत्तम पारदर्शकता, उच्च अपवर्तनांक असे सर्व गुणधर्म सीरियामध्ये असल्यामुळे, भिंगाच्या क्षेत्रात सीरिअमचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.

सीरिअम, अणुक्रमांक ५८! ‘लॅन्थॅनम’ नंतर येणारं, तसं बघायला गेलं तर 4f गटातलं पहिलं मूलद्रव्य, पण रेअर अथ्र्सच्या कुटुंबातला हा दुसरा सदस्य! त्याचं आकारमान ही जवळपास लॅन्थॅनम इतकचं. 4f   या कक्षेतला एक इलेक्ट्रॉन सोडला तर बाकी साऱ्या कक्षा लॅन्थॅनम सारख्याच! त्याचे बरेचसे रासायनिक आणि भौतिक गुणधर्मही लॅन्थॅनमसारखेच! तेव्हा सीरिअमला लॅन्थॅनमपासून विलग करण खूप कठीण! तरीही अपार प्रयत्न करून, वैज्ञानिकांनी शुद्ध सीरिअम मिळवलं आणि ते व्यवहारात उपयोगातही आणलं.

पन्नास टक्के सीरिअम, २५ टक्के लॅन्थॅनम आणि उरलेला भाग इतर लॅन्थॅनाइड्स, असं प्रमाण असलेलं ‘मिशमेटल’ हे संमिश्र, सिगारेट लायटर किंवा अन्य काही प्रकारच्या लायटर्समध्ये वापरतात. १९०३ साली सीरिअमचं लोखंडाबरोबर असणारं संमिश्रही अशाच प्रकारचे गुणधर्म असल्यामुळे, आता लायटर्समध्ये वापरलं जातं. सीरिअमचा ज्वलनांक कमी असल्यामुळे, त्याची लगेच ठिणगी उडते आणि म्हणूनच त्याचा लायटरसारख्या गोष्टीत उपयोग होतो. अतिशय उच्च तापमान पेलवण्याची क्षमता असलेलं सीरिअमचं अ‍ॅल्युमिनिअम बरोबरचं संमिश्र हेही अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये काही उपकरणं तयार करण्यासाठी गरजेचं असतं. सीरिअम ऑक्साइड उत्प्रेरक म्हणूनही वापरलं जातं. सीरिअम ऑक्साइडचे नॅनोकण डिझेलमध्ये मिसळले तर डिझेलचे पूर्ण ज्वलन होईल यावर संशोधन चालू आहे.

ओव्हनमध्ये अन्न शिजवल्यावर, त्याचा काही अंश ओव्हनमध्ये राहतो, तो स्वच्छ करण्याची प्रणाली ज्या ओव्हनमध्ये असते त्या ओव्हनमध्ये सीरिअम ऑक्साइडचा वापर केला जातो.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cerium chemical element
Show comments