चार्ल्स डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाशिवाय उत्क्रांतीवादाचे इतर सिद्धांतही ज्ञात आहेत. यापैकी एक उत्क्रांतीवाद हा डार्विनपूर्व काळातला असून तो जियाँ-बाप्टिस्ट लॅमार्क या फ्रेंच संशोधकाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मांडला. लॅमार्कची कल्पना म्हणजे ‘मिळवलेल्या गुणधर्माचे पुढल्या पिढीत संक्रमण’. यासंबंधी लॅमार्कने दिलेले जिराफाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. उंच फांद्यांवरची पाने खाण्यासाठी जिराफ मान सतत उंच करीत होते. या मानेच्या सततच्या वापराने जिराफांची मान लांब झाली. ही ‘मिळवलेली’ लांब मान पुढच्या पिढीत संक्रमित झाली. अशा रीतीने उत्क्रांती होत गेली. डार्विनने या सिद्धांतावर टीका करताना म्हटले, ‘‘लांब मानेचे आणि तोकडय़ा मानेचे जिराफ दोन्ही अस्तित्वात असतात. यापैकी लांब मानेचे जिराफ जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरतात. तोकडय़ा मानेचे जिराफ मात्र अन्न न मिळाल्यामुळे नष्ट होतात!’’
डार्विनच्या सिद्धांताच्या काही वर्षे नंतर ‘हय़ूगो दि व्ह्रिज’ या डच वनस्पती शास्त्रज्ञाने आपला उत्क्रांतीवादावरचा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. इ.स. १८८६ मध्ये ‘व्हय़ूगोला ईव्हिनिंग प्रिमरोज या फुलांचे निरीक्षण करताना लक्षात आले की, यातील काही नव्याने उगवलेल्या वनस्पती या मूळ लागवड केलेल्या वनस्पतींपेक्षा वेगळ्या आहेत. त्यावरून व्हय़ूगोला वनस्पतींच्या उत्क्रांतीच्या अभ्यासाची नवी पद्धत सुचली. या पद्धतीनुसार वनस्पतींची मुद्दाम लागवड करूनही अशा उत्क्रांतीचा अभ्यास करणे शक्य होते. त्यासाठी जुन्या पद्धतीप्रमाणे अस्तित्वात असलेल्या वनस्पतींचेच निरीक्षण करीत राहण्याची गरज नव्हती. या नव्या पद्धतीनुसार केलेल्या संशोधनात, ईव्हिनिंग प्रिमरोजच्या काही नमुन्यांत अचानक बदल घडून आल्याचे हय़ूगोला आढळले. या प्रकाराला त्याने उत्परिवर्तन (म्युटेशन) हे नाव दिले. या बदलावरून उत्क्रांती ही अशा आकस्मिक उत्परिवर्तनामुळे घडून येत असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. मूळ गुणधर्म बदलल्यानंतर तिच्यापासून, हे नवे गुणधर्म असलेल्या प्रजातीची म्हणजेच नव्या प्रजातीची निर्मिती होते. इ.स. १९०१ च्या सुमारास प्रसिद्ध झालेला, ‘व्हय़ूगो दि व्ह्रिज’चा हा सिद्धांत चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. डार्विनच्या मते उत्क्रांती ही हळूहळू व्हायला हवी, तर दि व्ह्रिज याच्या मते उत्क्रांती ही अचानक होते. आजच्या प्रचलित अनुवंशशास्त्राची सुरुवात करून देण्याच्या दृष्टीने दि व्ह्रिज याचा हा सिद्धांत महत्त्वाचा ठरला आहे.