कुतूहल: शरीरातील रासायनिक समन्वय
अनेक इंद्रिय संस्थांनी बनलेल्या आपल्या शरीरात आणि त्यातल्या पेशींमध्ये वेगवेगळ्या जीवनप्रक्रिया एकाच वेळी घडून येत असतात. एखाद्या चौकात चारही बाजूंनी एकदम वाहनं आली तर वाहतूक ठप्प होऊ शकते. म्हणूनच चौकामध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरतं. आपल्या शरीराच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. आपल्या शरीरात श्वसन, पचन, अभिसरण, उत्सर्जन अशा वेगवेगळ्या प्रक्रिया एकाच वेळी घडत असतात. त्यामुळे या प्रक्रियांचं नियंत्रण करणं आवश्यक ठरतं. शरीरामध्ये केलं जाणारं जीवनप्रक्रियांवरचं हे नियंत्रण चेतासंस्था आणि संप्रेरकं या दोहोंमार्फत केलं जातं.
रासायनिकदृष्टय़ा संप्रेरकं ही प्रथिनं किंवा स्निग्ध पदार्थाची बनलेली असून शरीरातल्या अंत:स्रावी ग्रंथींमध्ये ती तयार होतात. शरीराच्या निरनिराळ्या भागांत काम करणाऱ्यास विविध अंत:स्रावी ग्रंथी मिळून अंत:स्रावी संस्था बनते. या ग्रंथींना संप्रेरकं वाहून नेण्यासाठी नलिका नसतात म्हणून ही संप्रेरकं ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्रवली जातात. रक्तामार्फत ती संपूर्ण शरीरभर प्रवाहित होत असली तरी त्यांचा परिणाम मात्र केवळ विशिष्ट इंद्रियांवर किंवा अंत:स्रावी ग्रंथींवरच होतो. त्यांचा परिणाम होण्यासाठी ती अत्यंत कमी प्रमाणात पुरेशी असतात. संप्रेरकांमुळेच माणसासह इतर सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या परिस्थितीनुसार विविध जीवनप्रक्रियांमध्ये मेळ साधणं शक्य होतं.
आपल्या मेंदूत असणारी पीयूषिका किंवा पिटय़ुटरी ही अत्यंत महत्त्वाची अंत:स्रावी ग्रंथी मानली जाते. कारण या ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरकं शरीराची वाढ, विशिष्ट वयात येणारी परिपक्वता आणि शरीरातल्या पाण्याच्या पातळीचं प्रमाण कायम ठेवणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचं नियंत्रण तर करतातच, पण पीयूषिकेची काही संप्रेरकं इतर अंत:स्रावी ग्रंथींचं कार्य नियंत्रित करतात. उदाहरणार्थ, पीयूषिकेतून स्रवणारं अवटू उत्तेजक संप्रेरक हे अवटू म्हणजेच थायरॉइड ग्रंथींना थायरॉक्सिन तयार करण्यास उद्युक्त करतं. पण थायरॉक्सिन एका विशिष्ट प्रमाणात तयार झालं की रक्तातल्या थायरॉक्सिनच्या वाढलेल्या पातळीमुळे आपोआप अवटू उत्तेजक संप्रेरकांचं स्रवणं बंद होतं. या प्रकारच्या यंत्रणेमुळे गरज असेल तेव्हाच आणि तितकीच संप्रेरकं स्रवतात.

प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व:  जातिव्यवस्थेच्या सरहद्दीवरील आदिवासींपर्यंत जात्यन्तक क्रांती
‘‘भारतीय आदिवासी अल्पसंख्य आहेत, आफ्रिकन देशांप्रमाणे बहुसंख्य नाहीत. ईशान्येची आदिवासी राज्ये बाकी भारताप्रमाणे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. तरीही बाकी भारतातील सलग व बहुसंख्य आदिवासी प्रदेशांची स्वायत्ते राज्ये स्थापायचे लढे अपरिहार्य आहेत. हे प्रदेश बहुजमातीय आहेत. जमातभेद जातिभेदासारखे नसले, तरी जमातींच्या विषम विकासामुळे आदिवासीमुक्तीचा प्रश्न जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीशी जोडल्याशिवाय सुटणार नाही. खासी आदिवासी हे स्त्रीराज्यापर्यंत गेले असले, तरी भारतातील कोणताही आदिवासी प्रदेश गणावस्थेपर्यंत गेल्याचे आज दिसत नाही. आदिवासी जरी अतिशूद्रांत मोडत असले, तरी त्यांचे दलितांशी समीकरण करता येत नाही.’’ कॉ. शरद् पाटील ‘जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती’ (नोव्हेंबर २००३) या पुस्तकात लिहितात – ‘‘दलित जाती ज्याप्रमाणे जात्यन्तासाठी उठवण्यात आंबेडकरांना यश आले, तसे आदिवासी हे जातिव्यवस्थेच्या सरहद्दीवरील असल्यामुळे त्यांना जात्यन्तासाठी उठवता आलेले नाही. धुळे जिल्ह्य़ातील आदिवासींना महागुजराथमध्ये सामील करण्याविरुद्ध वा संयुक्त महाराष्ट्रासाठी मी उठवू शकलो नाही. त्यासाठी मला उकाई धरणाविरोधी चळवळच उभारावी लागली. व्हेरियर एल्विनने ‘ए फिलॉसॉफी फॉर नेफा’मध्ये दिलेले इशारे मार्गदर्शक आहेत. जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या किमान कार्यक्रमात आदिवासीमुक्तीचा खास विभाग ठेवावा लागेल. ख्रिश्चन झालेल्या आदिवासींना ‘हिंदू धर्मा’त घ्यायच्या पुण्याला झालेल्या विधीत पुरीचे शंकराचार्य म्हणाले की, जातिव्यवस्थेत तुमचे (अतिशूद्र म्हणून) जे पूर्वी स्थान होते तेच राहील. म्हणजे जात्यन्त झाल्याशिवाय आदिवासींना स्वातंत्र्य, समता व लोकशाही मिळणार नाही.. या जात्यन्तक क्रांतीचे अधिनेतृत्व सामाजिक व आर्थिक सर्वहारा जातवर्गाला शेतकरीजातवर्गाशी दोस्तीने करायचे आहे, हे अधिनेतृत्व क्रांत्युत्तर लोकशाही अधिनेतृत्वाच्या शासनात परिवर्तित झाल्याशिवाय..  या समाजाचे समाजवादी क्रांतीत संक्रमण होणार नाही.’’

मनमोराचा पिसारा: धरलं तर.. सोडलं तर..
मानस, मला एक सांग, माझं असं का रे होतं? म्हणजे आपण म्हणतो ना, ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं!!’ अस्सं माझं वेळोवेळी होतं. काही निर्णय घेतला तरी तो चुकीचा ठरतो. ‘हो म्हणावं तरी पंचाईत आणि नाही म्हटलं तरी!’. मानस थट्टा करीत मानसीला म्हणाला.
‘तुला बरी सुचते थट्टा! पण माझे मधल्यामध्ये हाल होतात. कामाला बाई असली तर तिचं करणं आवडत नाही आणि नाहीच ठेवली तर काम झेपत नाही. तिला कामाला ठेवलं तर ते न आवडल्यामुळे चिडचिड होते किंवा काम जास्त पडलं तर थकवा!’ ‘मानसी, अगदी, इस्राएल-पॅलेस्टाइनसारखी स्थिती निर्माण झालीय म्हणायची. यासाठी आपण जीनिव्हाला उभय राष्ट्रांची शिखरबैठक घेऊ या..’, मानस गंभीरपणाचा आव आणत म्हणाला.

‘तू ना, अजिबात सीरियसली ऐकत नाहीस, हसण्यावारी नेतोस . मानस, मोलकरणीचं फक्त उदाहरणादाखल म्हटलं. माझी एक मैत्रीण आहे, तिला अगदी अस्संच वाटतं- तिच्या लग्नाबद्दल. नवरा काही सपोर्ट करीत नाही म्हणून एकटं वाटतं आणि घटस्फोट घेतला तर एकटेपणाला बोलावणं धाडल्यासारखं झालं ना! तुला कळतं का, अरे, ऑफिसला जाणाऱ्या अनेक कर्मचारी स्त्रिया तर नेहमी असंच म्हणतात. नोकरीबद्दल असून अडचण नि नसून खोळंबा, असं होतं रे’
‘मानसी, अशी अडचणी/ खोळंबे आणि त्यामुळे होणारी मानसिक कुचंबणा प्रत्येकालाच कधी ना कधी सहन करावी लागते. अशा समस्या अनेकदा बाहेरच्या परिस्थितीमुळे आणि इतर लोकांमुळे उद्भवतात, असं आपण मानतो. कोणी तरी म्हणजे लोक, प्रसंग आपल्याला कोंडीत पकडतायेत असं वाटतं. ते खोटंही नसतं, पण मानसी कोणत्याही समस्येचं एक टोक बाहेर तर दुसरं आपल्यात असतं. बाहेरचं जग आणि आपण यांना जोडणारा दुवा म्हणजे आपलं मन!’ मानस म्हणाला.
‘मानस, उगीच हायफंडा मारू नकोस. हे बघ मी अडचणीत सापडलेय  ते माझ्यामुळे नाही इतर लोकांच्या स्वभावामुळे त्यांच्या लबाडीमुळे किंवा न बदलणाऱ्या परिस्थितीपायी. तुझं ना हे नेहमीचं आहे. जणू काही ती परिस्थिती मीच निर्माण केली आहे, अशी माणसं माझ्याच भोवती गोळा केली आहेत!!’  मानसी फटकारत म्हणाली. ‘हे बघ, तसं मी म्हणत नाहीये. म्हणजे यात तुझीच चूक आहे वगैरे. आपण लोकांकडे आणि परिस्थितीकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो, तोदेखील तितकाच महत्त्वाचा असतो. इंग्रजीत ब्यूटी लाइज इन द आइज ऑफ द बिहोल्डर असं म्हणतात. आपल्या सौंदर्यान्वेषी दृष्टीतच सौंदर्य सामावलेलं असतं. त्यामुळे तुझा दृष्टिकोन तपासून पाहिलास तर परिस्थिती, लोक वाटतात तितके वाईट नसतात. कारण धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं हा टिपिकल नकारात्मक विचार आहे.’ मानसी विचार करून म्हणाली, ‘खरंय, तू म्हणतोयेस तर त्यात तथ्य दिसतंय, पण आणखी काही तरी सांग ना म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल.’
‘मानसी, आपलं मन कधी कधी उगीच भांडत बसतं, मनातल्या मनात. कसलीही तडजोड न करता सदैव आपल्या मनासारखं घडलं पाहिजे, असं म्हणतं.  प्राप्त परिस्थितीत जर काही अटळ असेल तर ते स्वीकारून पुढे जायची तयारी नसते. आपल्याला एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीतून कोणती होकारात्मक गोष्ट मिळालेय, हे  आपण पाहात नाही. लोकांशी नाही की परिस्थितीशी नाही, पहिली तडजोड आपल्या मनाशी करावी लागते. त्यातल्या त्यात पटणारा निर्णय घ्यावा लागतो मग त्यातल्या काही नकारात्मक गोष्टी स्वीकाराव्या लागतात.’ मानसी क्षणभरात म्हणाली, खरंय मी नाही का तुला स्वीकारलं!!  ‘ऑ ऑ’, मानस म्हणाला.. दोघेही हसले!
डॉ.राजेंद्र बर्वे
 drrajendrabarve@gmail.com

Story img Loader