गेडोलिनिअम हे ‘डीडायमिअम’मधून वेगळ्या केलेल्या मूलद्रव्यांपैकी एक मूलद्रव्य. १८८६ साली स्विस रसायनतज्ज्ञ जीन चार्ल्स या वैज्ञानिकाने ‘डीडायमिअम’मधून गेडोलिनिअम वेगळं केलं असलं तरी त्याचा शोध मात्र त्याने १८८०मध्ये जीनीवा (स्वित्र्झलड) येथे लावला गेला. गॅडोलिनाइट (यीटरबाट ) आणि सिराइट या खनिजांतून मिळालेल्या वर्णपटाच्या साहाय्याने या मूलद्रव्याचा शोध लागला. खरं तर गॅडोलिनाइट या खनिजातील गॅडोलिनिअमचं प्रमाण फारच कमी असतं, पण वर्णपटासाठी ते पुरेसं होतं. पुढील संशोधनात डॉ. जीन चार्ल्स मॅरिग्नॅक यांनी सेरीअम या खनिजापासून गेडोलिनिअमचं ऑक्साइड वेगळं केलं. १८८६मध्ये पॉल एमिली या फ्रेंच शास्त्रज्ञाने शुद्ध स्वरूपात गेडोलिनिअम धातू मिळवला. गॅडोलिनाइट या खनिजावरून तसेच भूगर्भशास्त्रज्ञ जोहान गॅडोलिन यांच्या नावावरून या मूलद्रव्याला गेडोलिनिअम हे नाव देण्यात आले.

आवर्त सारणीतील सहाव्या आवर्तनातील गेडोलिनिअम हे मूलद्रव्य! लॅन्थॅनाइड गटातील हे मूलद्रव्य चंदेरी पांढऱ्या रंगाचे असून तन्यता या गुणधर्मामुळे त्याची बारीक तार काढता येते आणि वर्धनीयता या गुणधर्मामुळे पातळ पत्रे तयार करता येतात. गेडोलिनिअमचा विशेष गुणधर्म म्हणजे अत्यल्प प्रमाणातील या धातुमुळे लोखंड आणि क्रोमिअम यांचं ऑक्सिडीकरण होत नाही, म्हणजेच अत्यल्प प्रमाणातील या धातुमुळे लोखंड गंजत नाही. त्याचप्रमाणे गेडोलिनिअमच्या मिश्रणामुळे लोखंड आणि क्रोमिअम हे उष्णतारोधक बनतात. असं असलं तरी गेडोलिनिअम मूलद्रव्याचा दमट हवेशी संपर्क आला असता गेडोलिनिअम ऑक्साइड तयार होते. गेडोलिनिअम उत्तम क्षपणक आहे. त्यामुळे एखाद्या ऑक्साइडमधून ऑक्सिजन काढण्यासाठीही त्याचा उपयोग करतात.

चुंबकाच्या संमिश्रामध्येही गेडोलिनिअमचा वापर केला जातो. (डेटा स्टोरेज डिस्कमध्ये) तसेच एमआरआयमध्ये विशेषत: कर्करोगग्रस्त टय़ूमरच्या (अर्बुदाच्या) चिकित्सेत गेडोलिनिअमचा वापर केला जातो. गेडोलिनिअमचा हा धातू न्यूट्रॉन शोषतो. या गुणधर्माचा वापर अणुभट्टीत शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्याकरता करतात. या मूलद्रव्याचा मजेशीर गुणधर्म म्हणजे थंड पाण्याशी गेडोलिनिअमची अभिक्रिया होत नाही, परंतु उष्ण पाण्याशी मात्र संयोग होऊन गेडोलिनिअमचे हायड्रॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन वायू तयार होतो. तीन इलेक्ट्रॉन देऊन गेडोलिनिअमचे धन प्रभारित आयन तयार होतात. हे आयन अंधारात चकाकतात, या गुणधर्माला स्फुरदीप्ती असे म्हणतात.

शरद पुराणिक ,
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org