नोव्हेंबर २०१७ मध्ये लोकसत्तेच्या संपादकांनी विचारले, मूलद्रव्यावर वर्षभर कुतूहल सदर चालवणार म्हणता, पण त्या विषयावर २५० लेख लिहिण्याएवढी सामग्री तुमच्याकडे आहे ना? खरंतर आम्हाला मूलद्रव्र्यावरील लेख-संख्या मर्यादित ठेवावी लागली. त्याशिवाय संशोधकांबद्दलचे लेखही फारसे देता आले नाहीत.

संपादकांचं असंही मत होतं की, ही लेखमाला थोडीशी शालेयपद्धतीची वाटते, ती अभ्यसनीय नक्कीच आहे, पण वर्तमानपत्रात येणारी गोष्ट अभ्यसनीय असण्याबरोबर थोडी चित्तवेधकही असायला हवी. अर्थात असे बोलून संपादक आम्हाला सावध करीत असतात आणि ते त्यांचे कामच आहे. पण मराठी विज्ञान परिषद हे सदर गेली तेरा वष्रे चालवत असल्याने त्याचा अंदाज आता आम्हाला पुरेसा आला आहे. एवढेच नव्हे तर वाचकांच्याही आता मराठी विज्ञान परिषदेकडून विशिष्ट अपेक्षा असतात व त्या पुऱ्या करण्यात आम्ही त्यांच्या कसोटीला उतरत असावेत, नाहीतर लोकशाहीमध्ये वाचकांनी संपादकांना पत्रे लिहून हे सदर बंद करण्याची मागणी केली असती, आणि संपादकांनाही त्याची कल्पना असल्याने त्यांनी वर्ष २०१९ साठीही हे सदर चालू राहायला हवे म्हणून सांगितले आहे. या नवीन वर्षांतील लेखमालेचा विषय विज्ञानातील गाजलेल्या शोधांबद्दलचा आहे. त्याची अधिक माहिती उद्याच्या लेखात वाचायला मिळेल.

१९५० ते १९६०च्या दशकात ९२ मूलद्रव्ये होती ती आता ११८ झाली आहेत. म्हणजे गेल्या ६० वर्षांत मूलद्रव्यांच्या संख्येत २६ ने वाढ झाली आहे. जगातील शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करीत असतात आणि ते करीत असताना अनेक शोध हे जाता जाता लागत असतात. त्यातून नवनवीन मूलद्रव्ये जन्माला येतात. शिवाय ही संख्या ११८पर्यंत आली म्हणजे हा काही शेवट नाही. ही संख्या अशीच वाढत जाणार आहे. मानवाच्या गरजा पुरवण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. जुन्या गोष्टी संपतात किंवा कालबाह्य़ होतात आणि त्यांची जागा नवीन गोष्टी घेतात; या निसर्ग-नियमाचा यालाही अपवाद नाही.

वाचकांना हे सदर इतके आवडते की दरवर्षी आम्हाला या सदराचे पुस्तक बनवा म्हणून बऱ्याच लोकांची पत्रे, ई-मेल आणि फोन येत राहतात. पण पुस्तके बनवणे आम्हाला आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही आणि प्रकाशक प्रत्येक सदरासाठी पुढे येत नाहीत.

येतात त्यांनाही त्यांच्या त्यांच्या सवडीने पुस्तके छापावी लागतात, त्यामुळे सदर संपल्यावर ५-६ महिन्यांत पुस्तक बाहेर आले असे क्वचित घडते. सर्व वाचकांना नवीन वर्षांच्या आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन विषयावरील सदर वाचण्यासाठी शुभेच्छा!

– अ. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Story img Loader