‘कुतूहल’ हे सदर २००६ सालापासून सातत्याने चालू आहे. या सदरासाठी एक विषय ठरवून वर्षभर हे सदर चालवलं जातं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे २०१४ या वर्षी ‘कुतूहल’साठी ‘दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र’ हा विषय घेण्याचं ठरलं. या विषयात रोजच्या वापरातील वेगवेगळ्या रसायनांची ओळख, त्या रसायनांपासून असणारे धोके, त्या रसायनांचा वेगवेगळ्या दृष्टीनं होणारा वापर, इत्यादी मुद्दे वाचकांसमोर मांडून त्यांना रसायनांच्या दुनियेत सफर घडवून आणण्याचा मानस होता.
खूपदा आपण रसायन हा शब्द वापरत असतो, पण वेगळ्या अर्थानं. ‘फळांना हल्ली चवच नसते, कारण ती रसायन वापरून पिकवतात ना! रासायनिक खतांचा अति वापर केल्याने जमिनी नापिक बनल्या आहेत.’ अशा प्रकारचा संवाद आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे रसायनांचा वापर म्हणजे काहीतरी वाईट परिणाम असणारच अशी खूणगाठ आपल्या मनात बसली आहे. याच हेतूने लिहिलेलं की काय, एक पुस्तक ‘रसायनविरहित जीवनासाठी’ वाचनात आलं. मनात प्रश्न पडला, रसायनविरहित जीवन शक्य आहे? पाण्याला आपण ‘पाणी हेच जीवन’ आहे असं म्हणतो. केवळ मानवाच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा घटक नसून संपूर्ण सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. त्यामुळे पाणी हे रसायन आहे, हे पटायला जड जातं. पाण्याप्रमाणेच इतर अनेक पदार्थ आपल्या रोजच्या वापरात असल्याने त्यातही रसायनांचा समावेश आहे याची जाणीव नसते.
हे सदर सर्वसामान्यांना समजावं अशी अपेक्षा असेल तर रसायनशास्त्रातील रसायनांची रेणुसूत्रे, अणू-रेणूंची रचना, अभिक्रियेचे रासायनिक समीकरण यांचा समावेश न करता रोजच्या जीवनातील रसायनशास्त्र मांडायचं म्हणून लेखकांच्या समोर मोठं आव्हान होतं, हे सदर सुरू होण्याआधीच जाणवलं. या सदरासाठी तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या माजी कार्यवाह डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी ‘सर्वसामान्यांना समजावं’ हा मुद्दा बिलकूल बाजूला पडू दिला नाही. याचबरोबर सर्वसामान्यांना समजावं म्हणून त्यातील रसायनशास्त्राकडेही दुर्लक्ष केलं नाही.
हे सदर विज्ञान न शिकलेल्या व्यक्तीलाही उपयोगी वाटावं म्हणून नेहमीच्या वापरातील रसायनं घेण्यात आली. पण पुन्हा अडचण. या रसायनांच्या माहितीसाठी संदर्भ मिळणे कठीण, आणि त्यातही मराठीतून तर दुर्मीळ. आवश्यक रसायनांचा योग्य वापर करून आपण आपले जीवन सुसहय़ करू शकतो हे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या सदरातून गेले वर्षभर सातत्यानं केला गेला. या सगळ्या समस्यांवर मात करून अनेक लेखकांनी रसायनांची उपयुक्त माहिती देऊन हे सदर यशस्वी केलं असं वाचकांच्या प्रतिसादावरून नक्कीच म्हणता येईल. याचबरोबर वेळेअभावी काही महत्त्वाचे विषय राहून गेल्याचं मान्य करावंच लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा