राजेश बोबडे
‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासलेल्या समाजाला उन्नत करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. हिंदू धर्मात जन्मलेल्या डॉ. बाबासाहेबांनी या धर्मातील अनिष्ट प्रथा- परंपरांना विरोध करून हिंदू धर्माचा त्याग केला व दलित समाजाच्या उन्नतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा दिली,’’ अशी श्रद्धांजली डॉ. आंबेडकरांना अर्पण करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘हिंदू धर्माचे तात्त्विक स्वरूप अतिशय उज्ज्वल आहे, परंतु काही धर्ममरतडांकडून हिंदू धर्माला विकृत स्वरूप देण्यात आले व त्याची परिणती हिंदूंच्या धर्मातरात झाली. याविषयी हिंदू धर्ममरतडांनी गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे.’’
‘‘समाजात सदैव एकाचेच वर्चस्व राहू शकत नाही. जेव्हा वर्चस्वधारी समाजात आळस शिरतो तेव्हा अर्थातच आळसामुळे सेवाकार्यात अडथळा येतो आणि असा अडथळा आला की माणुसकीचा ऱ्हास होतो. माणसाचे गुण हेच माणसाचे मोठेपण आहे. माणसाची विवक्षित जात हे काही माणसाचे मोठेपण नाही आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठीच ‘सब के लिये खुला है मंदिर यह हमारा’ किंवा ‘जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही- अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी’ असे आम्ही प्रार्थनेद्वारे उपासना करत असतो. अस्पृश्यतेची भावना समाजाच्या हृदयातून जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत केवळ कायद्याने काहीही भागणार नाही. बदल हा अंत:करणातूनच झाला पाहिजे.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी..
‘‘मी स्वत: भारतीय व माझी जातही भारतीयच- अशी वृत्तीच आपल्या स्वभावात भिनली पाहिजे. म्हणूनच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या मध्यवर्ती बैठकीतून ‘माणूस’ म्हणविणाऱ्या सर्व प्राण्यांची जात ‘भारतीयच’ असा ठरावच आम्ही संमत करून टाकला आहे.’’ ‘हम हो पुजारी तत्त्व के’ ही आपली प्रार्थना आचरणात आणत गौतम बुद्धांच्या पंचविसाव्या जयंतीचे स्मरण म्हणून तुकडोजी महाराजांनी एक कोटी तासांचा समयदान यज्ञ केला. ते म्हणतात, ‘‘वस्तुत: मी बुद्ध संप्रदायीच आहे असे नाही; मी सर्वच संप्रदायांचा आहे, जो कोणी आपल्या व्यक्तित्वात गुरफटून न राहता समाजाचे कार्य करतो, कल्याण करतो त्याचा कोणताही संप्रदाय असो वा धर्म असो, तो मला मान्य आहे. ‘बहुजनसुखाय बहुजनहिताय’ हे भगवान बुद्धांचे सूत्र कोण अमान्य करेल?’’
‘‘भगवान बुद्ध मानवधर्माचे महान प्रचारक होते. त्यांचे गौरवगीत किंवा चरित्र पुराणाप्रमाणे ऐकायचे, त्यावर फुले वाहायची, पण त्यांच्या आदर्शाकडे मात्र डोळेझाक करायची या भक्तीला काही अर्थ उरत नाही. बुद्धांचा आदर्श डोळय़ापुढे ठेवून आपण सर्वांनी पाऊल पुढे टाकले पाहिजे. बुद्ध पंथ चालविण्यापेक्षा बुद्धांनी दिलेला ‘बहुजनसुखाय बहुजनहिताय’ हा मंत्र घराघरांत आचरणात आणला पाहिजे. महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धांजलीपर भजनात म्हणतात,
धन्य भीम भगवान! दलितजन-तारण आये थे हममें।
बडा किया उपकार देशपर, मानव उन्नत करने में।।
तुम्हे मिली प्रेरणा बुद्धसे, बुद्धसंघ बनवानेकी
मानवताकी मानव में शुभ मानप्रतिष्ठा लानेकी ।।
rajesh772@gmail.com