सुनीत पोतनीस

चाँग हे मलेशियात जन्मलेले, पण एका चिनी वंशाचे गायक आहेत. सध्या कर्नाटक संगीताचे अग्रगण्य गायक समजले जाणाऱ्या चाँग यांना त्यांचे गुरू डी. के. पट्टमाल यांनी ‘साई मदनमोहन कुमार’ हे नाव देऊन संगीताची दीक्षा दिली.

मूळचे चिनी असलेल्या चाँग सेन यांचे आईवडील श्री सत्य साईबाबांचे मोठे भक्त, मलेशियातील सत्य साई भक्तांच्या मंडळात ते नेहमी भजने गात. त्यांच्याबरोबर शाळकरी चाँगही तिथे जाऊन भजनं म्हणत असे. या भजनांमुळे भारत आणि भारतीय संगीताबद्दल आकर्षण निर्माण झालेल्या चाँगने मलेशियातल्या कर्नाटक संगीताच्या जाणकार विजयालक्ष्मी कुलवीरसिंघमकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यांच्याबरोबर चाँग एका संगीत कार्यक्रमासाठी चेन्नईला आले. या कार्यक्रमात चाँगची ओळख भरतनाटय़म नर्तिका उषा यांच्याशी झाली. उषांनी चाँग यांना संगीतकार सावित्री सत्यमूर्तीकडे वाद्यवादन शिकण्यासाठी पाठवले; परंतु चार-सहा महिने वीणावादन शिकूनही कर्नाटक संगीतातलं अभिजात गायकी शिकण्याचं चाँगचं स्वप्न पुरे होईना.

त्याच वेळी चाँगच्या हातात कर्नाटक संगीतातल्या दिग्गज गायकांविषयीचे एक पुस्तक आले. त्यात त्या वेळी हयात असलेल्या एम. एस. सुब्बालक्ष्मी, आर. वेदावल्ली आणि डी. के. पट्टामल यांच्याविषयी लेख वाचून ते सुब्बालक्ष्मींना जाऊन भेटले; पण त्या आजारी असल्याने पट्टामल यांना चाँगनी आपल्याला कर्नाटक गायकी शिकवण्याचे साकडे घातले. पट्टामल यांनी चाँगचा खणखणीत आवाज, स्वच्छ शुद्ध शब्दोच्चार याची चाचपणी करून त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. पुढे चाँग हे गुरू पट्टामल यांचे सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गणले गेले. २००६ मध्ये पट्टामल यांच्या निधनानंतर चाँग यांनी पट्टामलांची नात गायत्री यांच्याकडे शिक्षण चालूच ठेवले. आता चाँग ऊर्फ मदन मोहन यांचाही मोठा शिष्यगण तयार झालाय. चाँग यांच्या कर्नाटकी गायकीचे सादरीकरण देशविदेशात अनेक वेळा झाले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे ‘पंडित’ चाँग च्यू सेन आता कर्नाटकी गायकीच्या तरुण उदयोन्मुख कलाकारांमध्ये अग्रणी आहेत.

sunitpotnis@rediffmail.com