इटालीतील जिनोआ शहराच्या नागरिकांपकी ख्रिस्तोफर कोलंबस याचे नाव त्याने काढलेल्या सागरी मोहिमांमुळे अजरामर झाले आहे. जिनोआत १४५१ साली जन्मलेला ख्रिस्तोफोरो कोलोम्बो ऊर्फ ख्रिस्तोफर कोलंबस विशेष शिक्षण न घेता सागरी चाच्यांच्या टोळीत काम करीत होता. पुढे चाचेगिरी सोडून कोलंबस व्यापारी जहाजांवर खलाशाचे काम करू लागला. या काळात त्याने प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो याचे पौर्वात्य देशांच्या प्रवासवर्णनाचे पुस्तक वाचले होते आणि भारताविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. भारतात सागरी मार्गाने जाण्यासाठी कोलंबसने आपले काही अडाखे बांधले होते. पृथ्वी वाटोळी असल्याने इटालीहून पश्चिमेकडून सागरी मार्गाने गेल्यास भारतात पोहोचता येईल असा त्याचा अंदाज होता. त्या काळात खुश्कीने भारतात जाण्याच्या मार्गातले कॉन्स्टन्टिनोपल तुर्कानी घेऊन युरोपीयन व्यापाऱ्यांना भारताकडे जाण्याचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे पौर्वात्य देशांकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न अनेक दर्यावर्दी करीत होते. कोलंबसच्या सासऱ्यांची पोर्तुगालच्या राजाशी चांगली जवळीक होती. कोलंबसने पश्चिमेकडून सागरी मार्गाने भारतात पोहोचण्याची आपली योजना पोर्तुगालच्या राजासमोर मांडली; परंतु राजाने ती फेटाळून लावली. मात्र ही योजना १४९१ साली स्पेनची राणी इसाबेला हिने स्वीकारली. राणीने त्याला तीन मोठी जहाजे आणि ९० खलाशी देऊन ऑगस्ट १४९२ मध्ये या मोहिमेवर पाठविले. दोन महिन्यांनी ऑक्टोबरात, कोलंबस एका बेटावर पोहोचला आणि त्या बेटाला त्याने ‘सॅन सॅल्व्हादोर’ हे नाव दिले. त्यानंतरच्या बेटावर कोलंबसने लाकडी किल्ला उभारून वसाहत स्थापन केली. या वसाहतीला त्याने नाव दिले ‘हिस्पानिओला’. कोलंबसाच्या या पहिल्या मोहिमेनंतर राणीने आणखी तीन मोहिमांवर कोलंबसला पाठविले. या तीन मोहिमांमध्ये त्याने डॉमिनिका, सेंट कीट्स, जमेका, त्रिनिनाद, व्हेनेझुएला, पनामा वगरे बेटे शोधून काढली. कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वनस्पतींमधील अन्नप्रवास
हरितपेशींमध्ये तयार झालेले शर्करायुक्त द्रवरूप अन्न वनस्पतींच्या इतर सर्व भागांना ज्या पेशींद्वारे पाठवले जाते त्यांना ‘प्लोएम काष्ठ’ म्हणतात. या समूह पेशी झायलेम काष्ठ प्रमाणेच लंबाकृती असतात. वनस्पतींच्या द्रवरूप अन्नामध्ये शर्करेबरोबरच अमिनो आम्ल आणि इतर सेंद्रिय घटक असतात. विशिष्ट दाबाखाली होणाऱ्या या वहनास ऊर्जेची गरज असते. ऊसाच्या पानामध्ये सूर्यप्रकाशामध्ये तयार झालेली साखर पानाच्या शिरांमध्ये असलेल्या प्लोएम पेशींद्वारे खोडाकडे पाठवून तेथे साठवली जाते म्हणूनच आपल्याला ऊस गोड लागतो. वनस्पतींमध्ये पाण्याचा प्रवास एक दिशामुख असला तरी अन्नप्रवास मात्र गरजेनुसार सर्व दिशांना सुरू असतो. वनस्पतींच्या टोकाकडील पाने वरील बाजूस, खालची पाने मुळांना, तर मधली पाने खाली आणि वर अन्नरसाचा पुरवठा करतात. कुठल्याही वृक्षाच्या खालच्या फांद्या तोडल्या की मुळांची वाढ कमकुवत होऊन झाड खाली पडण्याची शक्यता वाढते. वृक्षाची साल काढली असता त्याखाली दिसणारे पिवळसर लाकूड म्हणजेच फ्लोएम काष्ठ. झाडाची साल या भागाचे रक्षण करते. वृक्षांना खिळे ठोकणे, तारांनी आवळणे यामुळे अन्नपुरवठय़ामध्ये अडथळा येतो. ताडी, माडी, आणि नीरा हे पाम कुळातील वनस्पतींचे अन्नरसच आहेत. कोयत्याने फ्लोएम काष्ठला जखम करून थेंब थेंब रूपात हे रस गोळा केले जातात. दुर्लक्षित उद्यानांमध्ये वाढणारी पिवळ्या रंगाची अमरवेल ही तंतुमय सपुष्प वनस्पती लहान झाडांच्या अन्नरसावरच जगते. रासायनिक खते दिलेल्या सर्व पिकांच्या अन्नद्रव्यात नत्राचे प्रमाण जास्त असते म्हणून किडीचा प्रभाव वाढतो. पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांचा गाभा तांबूस रंगाच्या झायलेम काष्ठाचा असतो. त्यापासून उत्कृष्ट दर्जाचे लाकूड मिळते. याचा गाभ्याचा बाहेरचा हलका, पिवळसर भाग म्हणजे फ्लोएम काष्ठ. यापासून हलक्या दर्जाचे लाकूड मिळते. अन्नरसाचा स्वाद आणि उरलेले कण अनेक कीटकांना आकर्षति करतात. म्हणून या लाकडास लवकर कीड लागते. फ्लोएम काष्ठाद्वारे होणाऱ्या अन्नरसामुळेच आपणास वनस्पतीपासून धान्य, फळे, कंदमुळे यामधून साखर पिष्टमय पदार्थ आणि मेद प्राप्त होतात.
– डॉ. नागेश टेकाळे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org