इटालीतील जिनोआ शहराच्या नागरिकांपकी ख्रिस्तोफर कोलंबस याचे नाव त्याने काढलेल्या सागरी मोहिमांमुळे अजरामर झाले आहे. जिनोआत १४५१ साली जन्मलेला ख्रिस्तोफोरो कोलोम्बो ऊर्फ ख्रिस्तोफर कोलंबस विशेष शिक्षण न घेता सागरी चाच्यांच्या टोळीत काम करीत होता. पुढे चाचेगिरी सोडून कोलंबस व्यापारी जहाजांवर खलाशाचे काम करू लागला. या काळात त्याने प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो याचे पौर्वात्य देशांच्या प्रवासवर्णनाचे पुस्तक वाचले होते आणि भारताविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. भारतात सागरी मार्गाने जाण्यासाठी कोलंबसने आपले काही अडाखे बांधले होते. पृथ्वी वाटोळी असल्याने इटालीहून पश्चिमेकडून सागरी मार्गाने गेल्यास भारतात पोहोचता येईल असा त्याचा अंदाज होता. त्या काळात खुश्कीने भारतात जाण्याच्या मार्गातले कॉन्स्टन्टिनोपल तुर्कानी घेऊन युरोपीयन व्यापाऱ्यांना भारताकडे जाण्याचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे पौर्वात्य देशांकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न अनेक दर्यावर्दी करीत होते. कोलंबसच्या सासऱ्यांची पोर्तुगालच्या राजाशी चांगली जवळीक होती. कोलंबसने पश्चिमेकडून सागरी मार्गाने भारतात पोहोचण्याची आपली योजना पोर्तुगालच्या राजासमोर मांडली; परंतु राजाने ती फेटाळून लावली. मात्र ही योजना १४९१ साली स्पेनची राणी इसाबेला हिने स्वीकारली. राणीने त्याला तीन मोठी जहाजे आणि ९० खलाशी देऊन ऑगस्ट १४९२ मध्ये या मोहिमेवर पाठविले. दोन महिन्यांनी ऑक्टोबरात, कोलंबस एका बेटावर पोहोचला आणि त्या बेटाला त्याने ‘सॅन सॅल्व्हादोर’ हे नाव दिले. त्यानंतरच्या बेटावर कोलंबसने लाकडी किल्ला उभारून वसाहत स्थापन केली. या वसाहतीला त्याने नाव दिले ‘हिस्पानिओला’. कोलंबसाच्या या पहिल्या मोहिमेनंतर राणीने आणखी तीन मोहिमांवर कोलंबसला पाठविले. या तीन मोहिमांमध्ये त्याने डॉमिनिका, सेंट कीट्स, जमेका, त्रिनिनाद, व्हेनेझुएला, पनामा वगरे बेटे शोधून काढली. कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा