सजीवांचे योग्य रीतीने वर्गीकरण करण्याच्या शास्त्राला टॅक्सॉनॉमी म्हटले जाते. हे वर्गीकरण सजीवांच्या गुणधर्मावरून केलेले असते. अगदी प्राचीन काळापासून सोयीसाठी वेगवेगळ्या वर्गीकरण पद्धती वापरल्या जात होत्या. इ.स.पूर्व चौथ्या शतकात अॅरिस्टॉटलनेही असे वर्गीकरण केले होते. आधुनिक वर्गीकरणाचे श्रेय हे अठराव्या शतकातला वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस याला दिले जाते. कार्ल लिनियसच्या अगोदरच्या संशोधकांनी वर्गीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती सुचवल्या होत्या, त्यांचा काही प्रमाणात वापर करून कार्ल लिनियसने वर्गीकरणाच्या स्वत:च्या पद्धतीची निर्मिती केली.
वर्गीकरणासंबंधीचे कार्ल लिनियसचे मुख्य योगदान दोन प्रकारचे आहे. यातले एक योगदान म्हणजे सजीवांचे पदानुक्रमावर (हायरार्की) आधारलेले वर्गीकरण. कार्ल लिनियसच्या अगोदरच्या काळापर्यंत सजीवांचे वर्गीकरण हे मुख्यत: सजीवांतील फक्त स्पष्ट फरकांवरच आधारलेले असायचे. लिनियसने मात्र सजीवांतले अल्प फरक लक्षात घेत, पदानुक्रमे पाच प्रकारांत वर्गीकरण केले. इसवीसन १७३५ मध्ये लिनियसने आपल्या ‘सिस्टेमा नॅच्युरे’ या छोटय़ाशा पुस्तिकेत प्रसिद्ध केलेली वर्गीकरणासाठीची ही पद्धत आजही अवलंबली जाते. फरक इतकाच की, वाढत्या संख्येत शोधल्या गेलेल्या सजीवांचा समावेश करण्यासाठी ही विभागणी आता पाचाच्याऐवजी सात प्रकारांत केली जाते. हे सात प्रकार म्हणजे – सृष्टी (किंग्डम), प्रभाग (डिव्हिजन), वर्ग (क्लास), गण (ऑर्डर), कूळ (फॅमिली), प्रजाती (जीनस) आणि जाती (स्पिसीज्). यातील सृष्टी म्हणजे प्राणी सृष्टी आणि वनस्पती सृष्टी. त्यानंतर पुढची विभागणी होतहोत, हे वर्गीकरण सजीवाच्या जवळ येऊन पोहोचते. सोयीसाठी या प्रकारांचे उपप्रकारही आता निर्माण केले गेले आहेत.
कार्ल लिनियसचे आजही वापरले जात असलेले दुसरे योगदान म्हणजे सजीवाचा उल्लेख करण्यासाठी वापरली जाणारी द्विनाम (बायनोमिअल) पद्धत. लॅटिन भाषेचा वापर करणाऱ्या या पद्धतीनुसार, सजीवाच्या नावातील पहिला शब्द हा प्रजातीदर्शक असतो. दुसरा शब्द हा जातीदर्शक असून त्याला जाती गुणनाम (स्पेसिफिक एपिथेट) म्हटले जाते. या पद्धतीनुसार भारतीय वाघ हा ‘पँथेरा टिग्रिस’ या नावे ओळखला जातो. कार्ल लिनियसने ही द्विनामी पद्धत १७५०-१७६० च्या दशकात वनस्पतींसाठी प्रथम स्पिसीज् प्लँटेरम या पुस्तकात, तर प्राण्यांसाठी प्रथम सिस्टेमा नॅच्युरे या पुस्तिकेच्या दहाव्या आवृत्तीत वापरली. कार्ल लिनियसच्या या योगदानाने प्रत्येक सजीवाला स्वत:ची ओळख मिळाली आहे.
– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org