‘‘साहेब, कितीही एजन्स्या बघा, अशा वायरी मिळणार नाहीत.’’ ‘एजन्स्या’ आणि ‘वायरी’? खटकलं की काही? पण बरोबर आहेत ही अनेकवचनं. वायर आणि एजन्सीसाठी मराठी प्रतिशब्द सुचवू शकतो आपण. पण जर हेच शब्द तद्भव करून घ्यायचे असतील तर ‘एजन्सीज’ आणि ‘वायर्स’ ऐवजी हेच म्हणायला हवं.
शब्दांच्या वर्गीकरणात तत्सम आणि तद्भव या संज्ञा अनुक्रमे ‘संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द’ आणि ‘संस्कृत शब्दांत काही बदल होऊन मराठीत रूढ झालेले शब्द’ यासाठी योजल्या जातात. पण आता या संज्ञा संस्कृतपुरत्या मर्यादित न ठेवता इतर कोणत्याही भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांसाठी विस्तारायला हव्या असं वाटतं.
तत्सम शब्दांची मराठीमधली स्थिती पाहू या. कवी, प्रीती, स्मृती, मंत्री असे संस्कृत ऱ्हस्वान्त शब्द हे अंत्य अक्षर दीर्घ लिहिण्याच्या मराठीतल्या नियमामुळे दीर्घान्त होतात; म्हणजे एकप्रकारे तद्भव होतात, पण तरी ते तत्सम मानले जातात. हेच शब्द जर सामासिक शब्दात प्रथमपदी आले तर पुन्हा मुळानुसार ऱ्हस्व लिहिले जातात. उदा. मंत्री आणि मंत्रिमंडळ. त्याचबरोबर विष, गुण, मंदिर, परीक्षा असे अनेक तत्सम शब्द मराठीच्या इकार-उकाराच्या नियमांना आणि सामान्यरूपाच्या नियमांना अपवाद ठरतात. ‘मूर्ती’ सारख्या काही तत्सम शब्दांची अनेकवचनंही मराठीप्रमाणे होत नाहीत. जे मराठी पद्धतीनुसार ‘मूर्त्या’ लिहितात, त्यांना हा अपवाद समजून घ्यावा लागतो. अर्थात भाषेसाठी नियम असायला हवेच, काही अपवादही राहणार, पण त्यात आवश्यक ते बदलही होत राहावे, अशी मागणी अभ्यासकांनी पूर्वीही केली आहेच, आता ती प्रकर्षांने जाणवत आहे. नियम बदलणं, ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे सोपं नाही, पण काहीतरी मार्ग शोधायला हवा.
जेव्हा एखादा शब्द तत्सम गणला जातो, तेव्हा तो मराठी लेखननियमांना अपवाद ठरतो, असं दिसतं. मग त्याचप्रमाणे आज मराठीत येणारे अनेक इंग्रजी शब्दही तद्भव न होता आपलं तत्समत्व राखून येत आहेत, हे आपल्या लक्षात येत आहे का? याबाबत अधिक चर्चा पुढच्या लेखात.
वैशाली पेंडसे-कार्लेकर
vaishali.karlekar1@gmail.com