धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅॅले’चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. यापूर्वी १४५६, १५३१, १६०८ या साली दिसलेला आणि १६८२ साली आपण पाहिलेला धूमकेतू एकच आहे, हे गणिताच्या साहाय्याने हॅले यांनी १७०५ साली सिद्ध केलं. हाच धूमकेतू पुन्हा १७५८ साली सूर्याजवळ येईल असंही भाकीत हॅले यांनी केलं. अर्थात, आपलं भाकीत खरं झालं की नाही ते पाहायला स्वत: हॅले जिवंत नव्हते, परंतु त्यांच्या भाकितानुसार १७५८ साली धूमकेतू मात्र दिसला. एडमंड हॅलेंच्या गौरवार्थ त्या धूमकेतूला हॅले यांचं नाव देण्यात आलं.
एडमंड हॅले हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते; तर ते नामांकित गणितज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ तसेच हवामानशास्त्रज्ञही होते. १६८६ साली हॅले यांनी व्यापारी वारे आणि मान्सून वारे यांचा अभ्यास करून काही तर्कशुद्ध अडाखे बांधले. सूर्यापासून उत्सर्जति होणारी उष्णता पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने वातावरण असमान तापतं. त्यामुळे वातावरणामध्ये हालचाल निर्माण होऊन वारे वाहतात, असा आडाखा हॅले यांनी मांडला. त्याचप्रमाणे त्यांनी हवेचा दाब आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यांतला संबंध दर्शविणारी सारणी तयार केली. आणि हा संबंध अक्षांशांनुसार बदलत असल्याचे त्यांनी दाखवून दिलं.
विषुववृत्तावर सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरण तापतं आणि हवा वर जाते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेश हे उत्तर आणि दक्षिण दिशेकडून हवा खेचून घेतात. ही उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून विषुववृत्ताच्या दिशेने खेचली जाणारी हवा म्हणजेच व्यापारी वारे. हॅले यांचा व्यापारी वाऱ्यांच्या निर्मितीविषयीचा हा सिद्धांत बऱ्याच प्रमाणात अचूक ठरला.
पण, व्यापारी वाऱ्यांच्या दिशांची निरीक्षणं मात्र या सिद्धांतानुसार नाहीत, असं आढळून आलं. व्यापारी वारे उत्तर किंवा दक्षिणेकडून नव्हे तर उत्तर गोलार्धात इशान्येकडून आणि दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून विषुववृत्ताच्या दिशेने वाहतात. अर्थात, व्यापारी वाऱ्यांच्या निर्मितीविषयीचा हॅले यांनी मांडलेला हा सिद्धांत म्हणजे वातावरणीय अभिसरणाबाबतीत आणि हवामानशास्त्राच्या प्रगतीतला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
– हेमंत लागवणकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
खांडेकर- ‘भारताचे’ मराठी लेखक
वैचारिक कादंबरीच्या परंपरेत भर घालणारी आणि ती परंपरा पुढे नेणारी, गांधीवादाचा प्रभाव दर्शविणारी अशी खांडेकरांची कादंबरी आहे- ‘क्रौंचवध’ (१९४२). खोल दार्शनिक दृष्टी आणि काव्यात्म शैली ही या कादंबरीची वैशिष्टय़े आहेत. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ‘ययाति’ (१९५२) आणि ‘अश्रू’ (१९५४) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.
‘ययाति’ची कथा खांडेकरांना ४५ वर्षे सतावीत होती. महाभारतातील ययातिची कथा नव्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या कादंबरीत केला आहे. या कादंबरीचं लोकांनी अपूर्व स्वागत केले. १९६० मध्ये या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार, राज्य पुरस्कार आणि १९७४ मध्ये ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे.
या प्रतिभासंपन्न थोर लेखकाला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, साहित्य अकादमीची फेलोशिप, १९६८- पद्मभूषण, १९७६ मध्ये शिवाजी विद्यापीठाने डी. लिट ही पदवी प्रदान केली होती.
अनेक प्रादेशिक भाषांतून त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या हिंदी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळम, सिंधी अशा देशी भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. गुजराती आणि तमीळ भाषेत सर्वाधिक अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्यांचे तमीळ अनुवाद वाचनाने तमीळ वाचकांची अशी समजूत आहे की, खांडेकर तामिळनाडूचेच आहेत. खांडेकरांच्या लेखनातील सुभाषितवजा अशी सुंदर सुंदर वाक्ये एकत्र करून या सुभाषितांचा एक संग्रह ‘सुवर्ण-रेणू’ या नावानं गुजराती भाषेत निघाला आहे. तो इतका प्रसिद्ध आहे की, त्याच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या निघाल्या आहेत. अशा प्रकारे भारताच्या नकाशावरील अनेक भाषांमध्ये खांडेकरांचं साहित्य पोहोचलं आहे.
जीवनवादी कादंबरीकार खांडेकर यांनी ‘ययाती’ या पुराणकथेला आधुनिक आशयाच्या अभिव्यक्तीचं माध्यम बनवलं. कामांध माणसामध्ये असणारी भीती, वासना आणि मनाची अस्थिरता ययातिमध्ये आहे. तरीही,कादंबरीतील ‘ययाति’ केवळ विकारवासनेने पीडित विलासीसम्राट नाही. तो एक पुण्यवान, पराक्रमी, धर्मकृत्यदक्ष, संवेदनशील, दानी सम्राटदेखील होता. तो अंतर्विरोध टिपणारी ही कादंबरी ‘ज्ञानपीठ’ची मानकरी ठरली.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com