तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांचे (तापमापक किंवा तापमापी) वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ- वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार : द्रव (किंवा वायू) भरलेली तापमापी, पाऱ्याची तापमापी, द्विधातुक (बायमेटॅलिक) तापमापी, रोध तापमापी (रेझिस्टन्स थर्मामीटर) थर्मीस्टर, थर्मोकपल, विकिरण तापमापी (रेडिएशन पायरोमीटर), इत्यादी.

ब- स्पर्शक आणि सुदूर : वरीलपैकी विकिरण तापमापीमध्ये, ज्या वस्तूचे तापमान मोजावयाचे त्या वस्तूला स्पर्शही न करता, काही अंतरावरूनही तापमानचे वाचन करता येते, तर बाकीच्या सर्व साधनांमध्ये ज्या वस्तूचे तापमान मोजावयाचे, त्या वस्तूला संवेदकाचा (सेन्सर) स्पर्श होणे आवश्यक आहे, म्हणून ती सर्व साधने स्पर्शक गटात मोडतात.

शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारी ज्वरमापी (क्लिनिकल थर्मामीटर) आपल्या सर्वाच्या परिचयाची आहे. या तापमापीमध्ये पारा वापरला असल्याने ते ‘पाऱ्याची तापमापी’ या गटात मोडते. आज वापरण्यात येणारी पारंपरिक ज्वरमापी साधारण ५ इंच किंवा १२.७ सेंटिमीटर लांबीची असते. ज्वरमापीमध्ये अत्यंत अरुंद पण एकसमान व्यासाची, काचेची, केशनलिकेसारखी नळी (Flint glass capillary) असते. नळीच्या एका टोकाला काचेचा फुगा जोडलेला असतो. यामध्ये (०.५ ग्रॅम वजनाचा) पारा भरला जातो. नळीचे दुसरे टोक व्यवस्थित बंद केले जाते. केशनलिका फुग्यालगतच्या वरच्या बाजूला आकुंचित केलेली असते. ही नाजूक केशनलिका एका जाड काचेच्या, थोडय़ा मोठय़ा बहिर्वक्र नळीमध्ये बंदिस्त केली जाते. यावर सेल्सिअस किंवा फॅरनहाईट या एककाने प्रमाणित केलेली मापनपट्टी लावली जाते. जाड काचेची बाहेरील नळी बहिर्वक्र असल्यामुळे तापमान मोजताना विशालकाचे (मॅग्नीफायर) काम करते, त्यामुळे तापमान पाहणे सोपे जाते.

शरीराचे तापमान मोजताना, ज्वरमापीचा काचेचा फुगा असलेला चंदेरी भाग आपण बगलेत घट्ट दाबून धरतो (क्वचित प्रसंगी जिभेखालीही मोजमाप केले जाते.) आपल्या शरीराच्या उष्णतेमुळे (तापमानामुळे) फुग्यातील पारा काचेच्या केशनलिकेतून आकुंचित केलेल्या भागातून वर ढकलला जातो. एक-दोन मिनिटांनी आपण तापमापी बगलेतून बाजूला घेतली, तरीही आकुंचित भागामुळे पारा सहजासहजी काचेच्या फुग्यात परत जात नाही आणि आपल्याला तापमानाचे वाचन करता येते.

तापमापी झटकली की पारा परत फुग्यात जातो. या ज्वरमापीची तापव्याप्ती साधारणत: २५० सेल्सिअस ते ४२० सेल्सिअस किंवा ९४० फॅरनहाईट ते १०८० फॅरनहाईट अशी असते. तापमापीवर आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७.५० सेल्सिअस (९८.६० फॅरनहाईट) वेगळी खूण करून दर्शवलेले असते.

अनुपमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

डॉ. इंदिरा गोस्वामी : लेखणीच उद्धारक बनली!’ 

२००० चा  ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात डॉ. इंदिरा गोस्वामी  यांनी आसामी भाषा, लेखन याविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्या म्हणतात, ‘‘.. एके काळी आसामवर बर्मामधील आहोम किंवा शोम जनजातीतील लोकांचं राज्य होतं. ते इर्राबाडीच्या प्रदेशातून हिमालयातील निसरडय़ा वाटेने आसाममध्ये आलेले होते. त्यांनी या प्रदेशावर सहाशे वर्षे राज्य करीत इथली संस्कृती आणि साहित्य समृद्ध केलं. आहोम शासनकाळात आसाममध्ये इतिवृत्त लेखन हाच प्रमुख साहित्यिक आकृतिबंध बनला होता. ही इतिवृत्त कथेप्रमाणे वाचली जात. आहोम शासकांचा जीवनवृत्तान्त आणि त्यांच्या शासनातील घटना या लेखनातून जिवंतपणे वर्णन केल्या जात.

आसामी भाषेचा प्रवाह निर्विघ्नपणे वाहत राहिलेला नाही. ब्रिटिश शासनाच्या कार्यकाळात तो प्रवाह थंडावला. अमेरिकी बाप्तिष्ट मिशनऱ्यांनी आसामी भाषेला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले.

आता आसामी साहित्य झेप घेण्याच्या अवस्थेत आहे. यापूर्वी ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले  आसामी साहित्यिक डॉ. बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांनी आपल्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी आसामी जनतेने केलेला त्याग, बलिदान यांचं वर्णन केलेलं आहे.

मी शालेय वयातच लेखनाला सुरुवात केली होती. लेखनाने मला आश्रय दिला. एका नाशापासून माझं रक्षण केलं आणि मृत्युयोगापासून माझा बचाव केला. काश्मीरमध्ये सुश्ना नदीच्या पुलाच्या बांधकामावरील एका दुर्घटनेत माझ्या पतीचा मृत्यू अवघ्या २६ व्या वर्षी, भर तारुण्यात झाला. त्या निराशाजनक स्थितीला तोंड देण्यासाठी मी स्वत:ला लेखनामध्ये झोकून दिलं.. लेखनाच्या माध्यमातून स्वत:च्या रागावर मी ताबा मिळवू शकले, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. लेखणी हीच माझ्यासाठी अनिवार्यपणे उद्धारक बनली. आपल्या लेखनाच्या माध्यमातून मी आपल्या कर्मभूमीचा जो भाग आजपर्यंत अंधारात खितपत पडला होता, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. आपल्या लेखनात मी शक्यतोवर प्रत्यक्षानुभव लिहिण्याचा प्रयत्न करते. मी अनुकरण करीत नाही. लोकांशी सरळ संपर्क साधून मी माहिती मिळवते. काही विशिष्ट भाग लिहिण्यासाठी मी काही दिवस मांसाच्या व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि कसायांच्या वस्तीतही राहिले. मी आसामच्या वर्तमान स्थितीवरही काही कथा लिहिल्या आहेत.

माझं एक स्वप्नही आहे. माझ्या गावागावांतून शांती निर्माण व्हावी. साहित्यावर आसामी लोकांचं प्रेम आहे, साहित्याच्या सभेपर्यंत पोहोचण्यासाठी ते रात्रभर चालू शकतात, भरून वाहणारी नदी पोहून येऊ शकतात. ही साहित्यसभा एक महान साहित्य संस्था आहे आणि आसामी लोकांची आपली संस्था आहे.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clinical thermometer