शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांना खारफुटी परिसंस्थेची परिपूर्ण माहिती देणे आणि त्यांच्या मनात या परिसंस्थेसाठी आपुलकी निर्माण होऊन खारफुटी परिसंस्था संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यात त्यांचादेखील मोलाचा सहभाग मिळू शकेल या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या वनविभागांतर्गत स्थापन केलेल्या खारफुटी कक्षाच्या (मँग्रोव्ह सेल) वतीने नवी मुंबईतील ऐरोली येथे पाच एकर जमीन व ३५ एकर खारफुटीवर ‘किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा’ची स्थापना केली आहे. एप्रिल २०१७ मध्ये या केंद्राचे रीतसर उद्घाटन झाले.
केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठाणे खाडीतील अद्भुत निसर्गदर्शन घडवणारा एक स्क्रीन आहे. केंद्रात प्रवेश करताच रोहित पक्ष्यांचे व गवतावर बसलेल्या बेडकांचे पुतळे आणि रंगीबेरंगी माशांचे तळे आपले स्वागत करतात. केंद्रातील पहिली इमारत म्हणजे बालवैज्ञानिकांना आकर्षित करणाऱ्या, ‘टॅक्सिडर्मी’ पद्धतीने जतन केलेल्या खऱ्याखुऱ्या पक्ष्यांची आणि खरेदीप्रेमींसाठी जैवविविधतेशी निगडित उत्पादनांची आहे. या के ंद्रात कांदळवन अधिवासाचे वेगवेगळे पैलू दाखवणारे तीन कक्ष आहेत. ठाण्याच्या खाडीत आढळणाऱ्या कांदळ प्रजाती, तसेच अभयारण्याचा विस्तार व स्थान सांगणारा त्रिमितीय (थ्री-डी) नकाशा हे पहिल्या कक्षात पाहावयास मिळतात. याच कक्षात भरती ते ओहोटीच्या प्रभागात सापडणारे जीव रेखाटलेले आहेत. याशिवाय त्यांच्या आवाजासह चित्रित केलेले अनेक पक्षी येथे दिसतात.
पुढील कक्ष सागरी जैवविविधतेचा आहे. इथे सुरमई, बोंबील यांसारख्या प्रचलित माशांसह डॉल्फिन, व्हेल यांसारख्या सागरी जीवांचीही माहिती व आवाज आहेत. समुद्रतळाशी अधिवास असणारे प्रवाळ, तारामासा यांसारख्या प्रजातींची ओळख करून देणारा फलक आहे. तिसऱ्या कक्षात कांदळवन, खाडी व समुद्र यांतील समृद्ध जैवविविधतेला असणारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोके, तसेच त्यावर मात करण्याचे काही सोपे उपाय दाखवणारी प्रदर्शनी आहे. केंद्राच्या परिसरात कांदळ रोपवाटिका, खेकडय़ांचे तळे, शोभिवंत माशांचे उबवणी केंद्र अशी काही आकर्षणे आहेत. के ंद्रातून खाडीपर्यंत जाण्याकरिता बोर्डवॉक व जेट्टी असे दोन मार्ग आहेत. बोर्डवॉक संपूर्ण बांबूपासून बनवलेला असून कांदळवनातून वाट काढत खाडीचे दर्शन घडवतो. या जेट्टीवरून खाडीतील जैवविविधता पाहण्यासाठी बोट सफारीची सोयही १५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झाली. निसर्ग परिचय के ंद्रात पाहिलेली जैवविविधता येथे प्रत्यक्ष पाहता येते. रोहित (फ्लेमिंगो) पक्षी हे या बोट सफारीचे विशेष आकर्षण. दरवर्षी स्थलांतर काळातील मोठय़ा संख्येने येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंमुळेच या खाडीला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
– सायली गुप्ते
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई</strong> २२ office@mavipamumbai.org