– सुनीत पोतनीस
भरकटलेले पोर्तुगीज जहाज १० ऑगस्ट १५०० रोजी मादागास्करच्या किनाऱ्यावर लागल्याने पाश्चात्त्यांना या बेटाचे अस्तित्व उमगले. तेव्हा या बेटावरील लहान राज्यांपैकी इमेरिना वंशाच्या राज्यकत्र्याचे राज्य अधिक प्रबळ होते. भारत व पूर्वेकडच्या देशांमधील हिंद महासागर मार्गाने येणारी व्यापारी जहाजे पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर लागत. त्या वेळी मादागास्करची पूर्व किनारपट्टी हे सागरी डाकू व चाचे यांचे अड्ड्यांचे ठिकाण झाले होते. १७ व्या शतकात आफ्रिकेतून गुलामांचा व्यापार वाढल्यावर मादागास्करचा इमेरिना राजाही अरब व युरोपीय व्यापाऱ्यांना गुलाम पुरवू लागला. आठव्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी मादागास्करच्या वायव्य प्रदेशात वस्ती करून त्यांची व्यापारी ठाणी प्रस्थापित केलीच; पण या प्रदेशात इस्लामचा प्रसार केला, तसेच अरबी खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र यांचे ज्ञानही इथल्या लोकांना दिले.
सन १५०८ पर्यंत पोर्तुगीजांची दहा-बारा कुटुंबे तिथे स्थायिक होऊन पुढे १६१३ मध्ये पोर्तुगीजांच्या गोव्यातील व्हाइसरॉयच्या प्रयत्नांनी मादागास्करातील पहिली मोठी पोर्तुगीज वसाहत स्थापन झाली. या वसाहतीतील लोकांनी आणि त्यातल्या मिशनऱ्यांनी या प्रदेशातल्या मूळच्या मालागासी लोकांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून ख्रिस्ती धर्माचा विस्तार केला. या धर्मांतरातून मादागास्करच्या एका प्रदेशाचा राजासुद्धा सुटला नाही! ही पोर्तुगीज वसाहत या बेटाच्या दक्षिण किनारपट्टीवर स्थापन झाली. मग फ्रेंचांनीही त्यांची व्यापारी ठाणी पूर्व किनारपट्टी प्रदेशात १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम उभारली.
१५ व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थापन झालेले इमेरिना राज्य हे मूळचे मोझाम्बिकचे सर्वात प्रबळ राज्य. त्यांनी मादागास्करचा निम्माअधिक प्रदेश आपल्या अमलाखाली आणला होता. १८१७ साली तत्कालीन इमेरिना राजाने ब्रिटिशांशी एक करार केला. या करारान्वये ब्रिटिशांनी या राज्याला संरक्षण आणि काही आर्थिक मदत देऊन त्या बदल्यात मादागास्करमध्ये काही व्यापारी सवलती स्वत:साठी मिळवल्या. अशा प्रकारे ब्रिटिशांचा या प्रदेशात प्रवेश झाला. ब्रिटिशांसह काही मिशनरीही इथे आले. त्यांनी इथे शाळा सुरू करून रोमन मुळाक्षरांमध्ये येथील प्रचलित मालागासी भाषा बसवली.
sunitpotnis94@gmail.com