निसर्गाने सभोवार मांडलेला रंगांचा उत्सव तर मानव केव्हापासून बघत आला आहे. आकाशाची निळाई, पानांची हिरवाई, उगवती-मावळतीची लालिमा डोळय़ांना दिसतेच; पण मनातही उतरते. नकळत या रंगांशी आपले एक भावनिक नाते जुळते. म्हणून निळा रंग शांतपणा देतो. हिरवा रंग सृजनाचा आनंद देतो. लालिमेचा रंग आशा पालवतो. सर्व रंग डोळय़ांना व डोळय़ांमुळे दिसतात, हे खरे; पण ते मानवी व्यक्तिमत्त्वाचे अभिन्न अंग बनलेले असतात. म्हणूनच तर सतत सान्निध्यात येणारे हे रंग आपण इतके गृहीत धरतो की, ‘रंगांचंही शास्त्र असायला पाहिजे, रंग परिमाणबद्ध असायला पाहिजेत’ असा विचारच कधी मनात डोकावत नाही!

रंगमापन आणि तपशील हे शास्त्रबद्ध झाल्याशिवाय रंगाचे अचूक सृजन वा निर्मिती कशी होणार? आजकालच्या ‘ग्राहक हाच देव’ मानला जाणाऱ्या काळात तर अशा शास्त्राची गरज अधिकच जाणवते. रंगाला शास्त्ररूप द्यायचे तर प्रथम रंगाची व्याख्या करून रंग समजून घेणे आवश्यक आहे. ते एकदा समजले की ‘रंगाचे आकलन’ होण्यासाठी कारणीभूत असणारे सर्व घटक प्रमाणित करून रंगाला शास्त्रीय अचूकपणा देता येईल.

‘माणसाला दिसतो तोच रंग’ हे तरी कितपत खरे? आणि मुळात रंग म्हणजे काय?

 एखाद्या वस्तूचा अगर पदार्थाचा रंग ठरवायचा असेल, तर त्या वस्तूवर प्रथम प्रकाश पडावयास हवा. हा प्रकाश दृश्य तरंगांनी (दृश्य प्रकाश) युक्त हवा. दृश्य प्रकाशाचा काही भाग (तरंग) रंगीत वस्तू अगर पदार्थ शोषून घेतो आणि उर्वरित प्रकाश वस्तूपासून परावर्तित होतो. जर पदार्थाने कुठलाही प्रकाश भाग शोषलाच नाही तर मूळ दृश्य प्रकाशासारखाच पदार्थाचा रंग म्हणजे पांढरा रंग दिसतो. एखादा विशिष्ट प्रकाश भाग शोषला गेला की वस्तूपासून दूर जाणाऱ्या प्रकाशात पदार्थावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तुलनेत त्या तरंगाची कमतरता असते; आणि म्हणून पदार्थाचा रंग शोषित रंगाचा पूरक (कॉम्प्लिमेंटरी) रंग असतो.

येथे एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की दृश्य प्रकाश वेगवेगळय़ा तरंगांच्या मिश्रणाने बनलेला असतो आणि विशिष्ट रंगाच्या तरंग लहरी निश्चित असतात. जसे, निळा रंग ४०० ते ४२० नॅनोमीटर (एनएम) हिरवा ५०० ते ५३० नॅनोमीटर इत्यादी. वस्तूचा रंग जर पिवळा दिसत असेल तर याचा अर्थ त्या वस्तूने येणाऱ्या दृश्य प्रकाश लहरींतून निळय़ा रंगाच्या लहरी शोषून घेतल्या.

डॉ. विनीता दि. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद    

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org